नित्य साधना केल्याने मनुष्य सात्त्विक बनतो आणि याचा समाज, वातावरण अन् जग यांनाही लाभ होतो ! – संजीव कुमार, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

नवी देहली येथील राष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञान’ या विषयावरील संशोधन सादर

राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर करतांना श्री. संजीव कुमार

नवी देहली – ‘सध्याच्या कलियुगात, सर्वसाधारण भारतीय व्यक्तीची तिच्या पूर्वजांमध्ये असलेली ‘सूक्ष्मातील कळण्याची क्षमता’ लुप्त झाली आहे. रज-तम स्पंदनांच्या सततच्या प्रभावामुळे व्यक्तीवर शारीरिक, मानसिक, तसेच आध्यात्मिक स्तरावर अनिष्ट परिणाम होतो. जर मानवाला सूक्ष्म स्पंदने ओळखता आली असती, तर त्याचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन अधिक योग्य असता. सातत्याने साधना केल्याने मानवातील सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता जागृत होते. यामुळे तो आध्यात्मिकदृष्ट्या अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. नियमितपणे साधना केल्यामुळे व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊन ती सात्त्विक बनते. याचा समाज, वातावरण आणि जग यांना लाभ होतो’, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. संजीव कुमार यांनी केले. ते ‘संस्कृत आणि प्राच्य विद्या अध्ययन संस्थान, जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय (जे.एन्.यु) आणि ‘इंद्रप्रस्थ अध्ययन केंद्र’, नवी देहली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारत मंथन’ या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. ही परिषद ३० मार्च या दिवशी जे.एन्.यु.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत श्री. संजीव कुमार यांनी ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञान : आधुनिक युगासाठी उपयुक्तता’ हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले असून श्री. शॉन क्लार्क हे त्याचे सहलेखक आहेत.

विविध आधुनिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे मानवातील सूक्ष्म प्रणालींचे संशोधन !

श्री. संजीव कुमार पुढे म्हणाले की, प्राचीन काळापासून भारत ज्ञानाच्या समृद्धीसाठी जगप्रसिद्ध आहे. ही समृद्धी केवळ वेद, उपनिषदे यांपुरती मर्यादित नसून वैज्ञानिक विषयांतही आहे, उदा. गुरुत्वाकर्षण, शून्याचा सिद्धांत, प्रकाशाची गती इत्यादी सिद्धांतांचे प्रतिपादन सहस्रो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनीच केले होते. वैज्ञानिक ज्ञान आणि सिद्धांत यांच्या व्यतिरिक्त भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये कुंडलिनी आणि तिची चक्रे, अशा अनेक सूक्ष्म ज्ञानांचाही ऊहापोह आढळतो. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा संशोधन विभाग सध्या ‘डी.डी.एफ्.ए.ओ.’ (Computer-Aided Screening and Functional Diagnosis) आणि ‘GDV camera Bio-Well’ यांसारखी काही आधुनिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे मानवातील या सूक्ष्म प्रणालींचे संशोधन करत आहे.

धार्मिक विधींमध्ये तुपाचा दिवा वापरण्याचे महत्त्व आधुनिक यंत्राद्वारे स्पष्ट !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने मेणबत्ती आणि तुपाचा दिवा यांच्या संदर्भातही एक संशोधन केले आहे. जगभरात ‘पॅराफिन वॅक्स’पासून बनवलेल्या मेणबत्त्यांचा विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सर्रास वापर केला जातो. भारतात मात्र प्राचीन काळापासून विविध सण आणि धार्मिक विधी यांमध्ये तुपाच्या दिव्यांचा वापर केला जातो आणि त्यामागे एक महत्त्वाचे कारणही आहे. यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘पेटवलेली मेणबत्ती’ आणि ‘प्रज्वलित तुपाचा दिवा’ यांतून वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांच्या अभ्यासाविषयी केलेल्या एका वैज्ञानिक प्रयोगाबद्दल श्री. संजीव कुमार यांनी विस्ताराने माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘या प्रयोगासाठी ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’ या ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक प्रणालीचा उपयोग करण्यात आला. या प्रणालीद्वारे कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती यांमधून वातावरणात प्रक्षेपित होणारी सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांद्वारे दर्शवली जातात. पेटत्या मेणबत्तीच्या ‘पिप’ छायाचित्रात मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने होती. याउलट प्रज्वलित तुपाच्या दिव्याच्या ‘पिप’ छायाचित्रात मोठ्या प्रमाणात सकारात्मक स्पंदने दिसली.’’

भारतीय संस्कृतीची महानता स्पष्ट करणारे संशोधन !

‘‘या प्रयोगातून जरी असे दिसले, तरी सूक्ष्म स्पंदनांचे सत्य विश्‍लेषण केवळ सूक्ष्म-परीक्षणाद्वारेच होऊ शकते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन गटामध्ये सूक्ष्म-स्पंदने जाणू शकणार्‍या व्यक्ती आहेत. त्या वस्तू किंवा व्यक्ती यांमधून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांचे अवलोकन करू शकतात. या स्पंदनांची त्यांनी काढलेली चित्रे आध्यात्मिक क्ष-किरणांसारखे (X-ray) कार्य करतात. पेटवलेल्या मेणबत्तीच्या सूक्ष्म चित्रात पुष्कळ नकारात्मक स्पंदने, तर प्रज्वलित तुपाच्या दिव्यातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने दिसून आली. त्यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये मेणबत्तीला स्थान नाही; परंतु सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्‍या तुपाच्या दिव्याचा पुरस्कार केलेला आहे’’, असेही श्री. कुमार म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF