जिवावरचा प्रसंग पायावर निभावल्यावरही वयाच्या ७१ व्या वर्षी धर्मप्रसाराची सेवा करण्याची जिद्द आणि अभिलाषा धरून परात्पर गुरुदेवांकडे ‘धर्मकार्याथर्र् पुनःपुन्हा जन्म होऊ दे’, असे मागणे मागणारे बेळगाव येथील श्री. यशवंत कणगलेकर !

बेळगाव येथे ‘सनातन सत्यदर्शन’ या विशेषांकांच्या वितरणाची सेवा करत असतांना श्री. यशवंत कणगलेकर यांना एका ट्रकने धडक दिली आणि त्या ट्रकचे चाक त्यांच्या पायावरून गेले. एवढा मोठा अपघात झाल्यावर आणि उतारवय असूनही त्यांना धर्मप्रसाराची अतिशय तळमळ अन् जिद्दही आहे. परात्पर गुरुदेवांवर त्यांची अढळ निष्ठा आहे. त्यासाठीच परात्पर गुरुदेवांकडे ‘केवळ हा जन्मच नव्हे, तर पुढील अनेक जन्म धर्मकार्यार्थ मिळावेत आणि धर्मकार्यार्थच खर्ची पडावे’, असे मागणे मागणारा सनातन संस्थेतील गुरुचरणी समर्पित असा हा एक अनोखा जीव ! ‘यातून सर्वच साधकांना धर्मकार्यार्थ प्रेरणा मिळावी’, हीच भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणी प्रार्थना !

‘१६.९.२०१८ या दिवशी मी आणि श्री. अक्षय भंडारी बेळगाव येथे ‘सनातन सत्यदर्शन’ या विशेषांंकांच्या वितरणाची सेवा करत असतांना एका छोट्या ट्रकने ट्रक मागे घेत (रिव्हर्स) असतांना मला धडक दिली आणि मी उजव्या हातात अंक घेऊन खाली पडलो. क्षणार्धात ट्रकचे मागचे चाक माझ्या उजव्या पायावरून गेले. तीन मासांनंतर मला आता काठी घेऊन चालता येऊ लागले आहे. ‘गुरुकृपेने माझे रक्षण कसे झाले ?’, याविषयीची माझ्या लक्षात आलेली काही सूत्रे पुढे दिली आहेत.

१. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !’, हा ग्रंथ वाचत असतांना ग्रंथातील शेवटच्या पानावर असलेली गुरु गोविंदसिंहांची प्रार्थना आवडणे आणि ‘आपल्यालाही धर्माच्या लढ्यात सहभागी होण्याची संधी मिळावी’, असे वाटणे

१५.९.२०१८ या दिवशी मी ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !’, हा ग्रंथ वाचत होतो. काही कारण नसतांना माझे लक्ष ग्रंथाच्या शेवटच्या पानावरील ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या ध्येयप्राप्तीसाठी गुरु गोविंदसिंहांप्रमाणे प्रार्थना करूया’, या सूत्राकडे आकर्षित झाले. ती प्रार्थना अशी होती, ‘हे भगवान शंकरा, तू मला असा वर दे की, ज्यामुळे मी कधीही शुभ कर्म करण्यापासून कचरणार नाही, रणभूमीवर शत्रूला कधीही घाबरणार नाही आणि ज्यायोगे मी निश्‍चयपूर्वक युद्ध करून ते अवश्य जिंकेन. स्वतःच्या मनाला शिकवता शिकवता मी तुझे नित्य गुणगान करत राहीन आणि जेव्हा माझ्या आयुष्याचा अंतिम क्षण येईल, तेव्हा युद्धभूमीवर धर्माचे रक्षण करत करतच मी प्राण त्यागीन.’ ही प्रार्थना मला फार आवडली. ‘खरोखरच आपल्याला धर्माच्या लढ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल का ?’, असा विचार माझ्या मनात घोळू लागला.

२. ट्रकचा चालक ट्रक मागे घेत असतांना त्या ट्रकची धडक बसणे, त्यामुळे खाली पडल्यावर त्या ट्रकचे एक चाक पायावरून जाणे आणि ट्रकच्या दुसर्‍या चाकापासून डोके २ फुटांवर राहिल्यामुळे केवळ गुरुकृपेने थोडक्यात वाचणे

१६.९.२०१८ या दिवशी आम्ही ‘सनातन सत्यदर्शन’ विशेषांकाचेे १०० अंक घेतले. ‘शंभर जणांना भेटून प्रसारमाध्यमे सनातनची अपकीर्ती कशी करत आहेत आणि सनातनवर बंदी आणण्याचे षड्यंत्र कसे चालू आहे ?’, याविषयी त्यांना सांगून ‘सनातन सत्यदर्शन’ विशेषांंक द्यायचा’, असे ठरवून मी आणि श्री. अक्षय भंडारी एपीएम्सी (APMC) या व्यापारी संकुलाकडे निघालो. रविवार असल्यामुळे व्यापारी संकुलात विशेष गर्दी नव्हती. आम्ही व्यापारी संकुलात प्रवेश केला आणि पहिलाच अंक घेऊन मी एका दुकानाकडे जाऊ लागलो. तेवढ्यात अक्षयने एक ट्रक मागे (रिव्हर्स) येत असलेला पाहिला. ‘मला धावता येणार नाही’, हे लक्षात घेऊन अक्षयने ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला; पण ट्रकच्या चालकाला ‘आम्ही मागे आहोत’, हे दिसले नाही. मला काही कळण्यापूर्वीच ट्रकचा धक्का लागून मी खाली पडलो आणि ट्रकचे मागचे चाक माझ्या उजव्या पायावरून गेले अन् ट्रक थांबला. माझे डोके ट्रकच्या दुसर्‍या चाकापासून केवळ २ फुटांवर होते. त्यामुळे केवळ पायावर निभावले.

३. ‘परात्पर गुरुदेवांनी धर्मयुद्धात सहभागी करून घेतले’, या विचारांनी भावजागृती होऊन आनंदाश्रू येणे

माझ्या उजव्या पायातील चपलेच्या चिंधड्या झाल्या होत्या. मी तसाच पडून राहिलो होतो. माझा नामजप गतीने होत होता आणि ‘परात्पर गुरुदेवांनी मला धर्मयुद्धात सहभागी करून घेतले’, या विचाराने माझा भाव जागृत झाला होता. माझ्या सभोवती गर्दी जमलेली पाहून ट्रकचा चालक खाली उतरून माझी क्षमा मागू लागला. सगळ्यांनी मिळून मला उचलून ट्रकमध्ये घातले. ते मला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. जखमेवर मलमपट्टी झाल्यावर माझ्या डोळ्यांतील अश्रू पाहून ट्रकचा चालक मला पंख्याने वारा घालून ‘काही हवे का ?’, असे विचारत होता. त्याला वाटले, ‘मला फार त्रास होत आहे’; पण मला मुळीच वेदना होत नव्हत्या. ‘माझी प्रार्थना गुरुचरणी रुजू झाली’, या विचाराने मला पुष्कळ आनंद होत होता. ते आनंदाश्रू होते.’

४. मन शांत असणे आणि नामजप संथ लयीत होणे

रुग्णालयातून चौगुलेकाकांच्या चारचाकी गाडीतून मी घरी आलो. मी घरी पोचेपर्यंत मला झालेल्या अपघाताविषयी घरी कुणाला कल्पना नव्हती. गाडीतून मला उतरता येत नव्हते; म्हणून अंजेश आणि सत्यकाम (माझे पुत्र) या दोघांनी मिळून मला उचलून घरी आणले. त्या वेळी माझे मन शांत होते आणि नामजप संथ लयीत चालू होता.

५. एवढ्या मोठ्या अपघातात कुठेही हाड मोडले नसल्याचे पाहून आधुनिक शल्यकर्म तज्ञांंनाही (आर्थोपेडिक सर्जन यांनाही) पुष्कळ आश्‍चर्य वाटणे

संध्याकाळी आम्ही हाडाच्या आधुनिक शल्यकर्म तज्ञांकडे (आर्थोपेडिक सर्जनकडे) गेलो. त्यांनी सकाळी रुग्णालयात बांधलेली पट्टी न सोडता प्रथम ‘क्ष’ किरण पडताळणी करण्यास सांगितले. ट्रकचे चाक पायावरून जाऊन हाड कुठेही मोडले नसल्याचे पाहून आधुनिक शल्यकर्म तज्ञांना पुष्कळ आश्‍चर्य वाटले; मात्र जखम खोलवर झाल्यामुळे त्यांनी आधारासाठी पट्टी बांधली (बँडेज केले). मला ‘वॉकर’ घेऊन किंवा लंगडी घालत चालता येत होते. ‘स्नानगृहात माझे मला जाता येते’, याचाच मला आनंद वाटत होता. अंजेशच्या आजोबांनी (आधुनिक वैद्य दीक्षित यांनी) सांगितले, ‘‘एवढ्या मोठ्या अपघातात कुठेही हाड मोडले नाही, हीच भगवंताची कृपा आहे. पावलाचे स्नायू दुखावले आहेत. ते बरे व्हायला ३ मास लागतील.’’ त्यांचे म्हणणे तंतोतंत खरे ठरले. १६.१२.२०१८ पासून मला काठी घेऊन चालता येऊ लागले.

६. वाईट शक्तींनी वाहनाद्वारे ३ वेळा केलेले आक्रमण

साधनेतील गेल्या २० वर्षांच्या काळात वाईट शक्तींनी माझ्यावर ३ वेळा आक्रमण करून मला दुखापत करण्याचा प्रयत्न केला.

६ अ. पहिला प्रसंग : घरासमोर आमची ‘ओम्नी’ गाडी उभी होती आणि घरासमोरील चढावावर सनातन संस्थेची ‘ट्रॅक्स’ उभी केलेली होती. ‘ट्रॅक्स’ ही गाडी चालक गाडीत नसतांना खाली घसरत आली आणि ओम्नी अन् ‘ट्रॅक्स’ या २ गाड्यांमध्ये माझा उजवा पाय चिरडला गेल्यामुळे ३ आठवडे मला झोपून रहावे लागले होते.

६ आ. दुसरा प्रसंग : मी गोव्यात एके ठिकाणी शिबिराला गेलो होतो. तेथून परात्पर गुरुदेवांच्या सत्संगाला जाण्यासाठी गाडीची वाट पहात होतो, तेव्हाही गाडी मागे घेणार्‍या (‘रिव्हर्स’) ‘ट्रॅक्स’ने मला उडवून नाल्यात फेकले होते. त्या वेळी गुरुकृपेने मला इजा झाली नव्हती.

६ इ. तिसरा प्रसंग : ट्रक मागे घेतांना ट्रकने धडक दिली आणि त्याचे चाक माझ्या उजव्या पायावरून गेले.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

प्रत्येक वेळी आक्रमण करणार्‍या शक्तीपेक्षा संरक्षण करणारी गुरुशक्ती श्रेष्ठ ठरली. इतक्या वेळा आक्रमण होऊनही आता काठी घेऊन का असेना, मला चालता येत आहे. ‘माझा सेवा करण्याचा तोच उत्साह आजही कायम आहे’, हीच परात्पर गुरुदेवांची माझ्यावर असलेली मोठी कृपा आहे. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! शेवटी एकच मागणे आहे.

‘हे गुरुनाथा,

सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षू नको गुणवंता अनंता ।
रघुनायका, मागणे हेची आता ॥ – समर्थ रामदासस्वामी

‘किंबहुना यासाठी मी पात्र नसेन; म्हणून मला दूर लोटू नकोस. धर्मरक्षणाच्या कार्यात मला निश्‍चयपूर्वक उभा कर. हे करतांना मला मरण आले, तरी धर्मकार्यार्थ पुनःपुन्हा जन्म घेता येऊ दे. गुरुनाथा, मागणे हेची आता !’

– श्री. यशवंत कणगलेकर, बेळगाव (१८.१२.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 


Multi Language |Offline reading | PDF