जयदीप कवाडे यांच्या निषेधार्थ नागपूर येथे महिलांचे मूक निषेध आंदोलन

केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचे प्रकरण

जयदीप कवाडे यांना अटक आणि सुटका

नागपूर – महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांच्या वक्तव्याचा भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी महिलांनी कपाळावर मोठे कुंकू लावून आणि तोंडावर पट्टी बांधून संविधान चौकात मूक निषेध आंदोलन केले. जयदीप कवाडे यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर नोंद घेतली असून त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगासमवेतच महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि लगेच जामिनावर सुटकाही झाली. (गेल्या काही वर्षांपासून विधीमंडळ, सार्वजनिक कार्यक्रम, सभा आणि प्रचार यांमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह, वादग्रस्त विधाने, अश्‍लील टीका काही लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येत असतांना त्यांच्यावर जुजबी कारवाई करण्यात येते अथवा समज देऊन सोडून देण्यात येते. यामुळे हे प्रकार थांबतच नाहीत. यासाठी टीका करणारे असे लोकप्रतिनिधी आणि नेते यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा दिल्यासच अशा वक्तव्यांना आळा बसू शकतो ! – संपादक) येथील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचार सभेत कवाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

१. ‘स्मृती इराणी मस्तकावर पुष्कळ मोठे कुंकू लावते. माहिती घेतल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते. स्मृती इराणी लोकसभेत नितीन गडकरी यांच्या मांडीला मांडी लावून बसते आणि संविधान संशोधन करण्याची भाषा करते’, अशा शब्दांत कवाडे यांनी हीन पातळीवर टीका केली होती.

२. या संदर्भात भाजपच्या महिला नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर ३ एप्रिल या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी आश्‍विन मुद्गल यांनी संबंधितांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या भरारी पथकाचे प्रभारी मदन सुभेदार यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंद केली.

भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या संविधान चौकात काळ्या साड्या नेसून आल्या होत्या. ‘माझ्या कुंकवाचा अवमान मी सहन करणार नाही’, असे फलक हातात घेऊन त्यांनी ‘मूक निषेध’ केला.

महापौरांकडून पोलिसांत तक्रार !

महापौर सौ. नंदा जिचकार यांनी कवाडे, तसेच काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. ‘कवाडे यांच्या भाषेमुळे भारतीय स्त्री संस्कृतीचा अवमान करण्यात आला आहे. पटोले यांनी अशी भाषा वापरणार्‍या कवाडे यांची पाठ थोपटली आणि त्यांनीही या वक्तव्याचे समर्थनच केले. त्यामुळे या दोघांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी’, असे त्यांनी तक्रारीत म्हटले. भाजपच्या वतीने शहरातील २५ विविध पोलीस ठाण्यांतही वरील दोघांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. यानंतर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी जयदीप कवाडे यांनी क्षमायाचना केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF