हिंदूंनो, धर्मविरोधी भूलथापांना बळी न पडता धर्मशास्त्र समजून घेऊन गुढीपाडवा साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – गुढीपाडवा अर्थात् चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा ! ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून सत्ययुगाचा प्रारंभ केला म्हणून हा दिवस नववर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा केला जातो. २०१९ या वर्षीच्या गुढीपाडव्याला हिंदु कालगणनेनुसार सृष्टीची निर्मिती होऊन १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२१ व्या वर्षाचा आरंभ होत आहे. कुठे जेमतेम २ सहस्र वर्षे पूर्ण होत असलेल्या इतर कालगणना आणि कुठे हिंदूंची श्रेष्ठ अशी अगाध कालगणना ! यांची तुलना होऊ शकत नाही. वेदांमध्ये ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ म्हणजे १२ मासांचे एक वर्ष असावे, असे म्हटले आहे. याच हिंदु कालगणनेनुसार वर्षारंभदिवस म्हणजे ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ ! चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. १ जानेवारी या दिवशी वर्षारंभ करण्याचा काही इतिहास नाही. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकीही एक आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसाची कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे हिंदूंनी आपल्या गौरवशाली परंपरेविषयी कृतज्ञता व्यक्त करत, धार्मिक परंपरांचे आचरण करत नववर्षारंभ करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

श्री. सुनील घनवट

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. काही धर्मविरोधी मंडळी जाणीवपूर्वक ‘छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचे शीर भाल्याला लावून फिरवले, यानिमित्त ब्राह्मणांनी गुढीपाडवा चालू केला’, असा जातीयवादी आणि अत्यंत खोटारडा प्रचार करून समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंना कुठेही धर्माचे शिक्षण मिळत नसल्याने दुर्दैवाने काही हिंदु बांधव या अपप्रचाराला बळीही पडत आहेत. त्यांनी पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

अ. सहस्रो वर्षांपूर्वीच्या महाभारतातील आदिपर्वात श्‍लोक १८ ते २२ मध्ये गुढी उभारण्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

आ. ‘अधोर्ध्व गुढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥ संकल्पविकल्पांचे लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥’ असे संत ज्ञानेश्‍वरांनी ११ व्या शतकांत लिहलेल्या ओव्यांत म्हटले आहे.

इ. ‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची ।’ असे १४ व्या शतकात संत चोखामेळा म्हणतात.

असे अनेक संदर्भ आज उपलब्ध आहेत. हे लक्षात घेता ३५० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढीपाडवा चालू झाला, हा प्रचार धादांत खोटा आहे, हे सिद्ध होते.

२. गेली काही वर्षे या अपप्रचाराला हिंदू भुलले नाहीत; म्हणून आता ‘गुढीच्या जागी भगवा ध्वज उभारा’, असा नवा अपप्रचार चालू झाला आहे. भगवा ध्वज गुढीपाडव्यालाच नव्हे, तर ३६५ दिवस हिंदूंनी आपल्या घरावर लावायला हवा; मात्र गुढीच्या जागी भगवा ध्वज लावा, हा प्रकार ‘गुढीपाडवा’ बंद करण्याचेच कारस्थान आहे. त्यामुळे ‘गुढी उभारा, त्यासह वर्षभर भगवा ध्वज घरावर लावा’, असे समितीने म्हटले आहे.

३. गुढीच्या संदर्भातील धार्मिक कृत्यांविषयीही अपप्रचार केला जातो. उदा. तांब्या उलटा ठेवणे अशुभ असते, साडी टांगणे म्हणजे अब्रू टांगणे आदी. मुळात ज्यांना हिंदूंच्या धार्मिक परंपरा मान्य नाहीत, धार्मिक विधींनाच विरोध आहे, अशांनी ‘शुभ-अशुभ’ यांविषयी बोलणे हाच मोठा विनोद आहे.

‘हिंदूंनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता धर्मपरंपरांचे श्रद्धापूर्वक पालन करावे’, असे समितीने या पत्रकात म्हटले आहे.

विविधतेने नटलेल्या भारतात विविध नावांनी साजरा केला जातो ‘गुढीपाडवा’ !

महाराष्ट्रात गुढीपाडवा नावाने, तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांत ‘उगादी’, आसाममध्ये ‘बीहू’, मणीपूरमध्ये ‘चेईरावबा’, उत्तरप्रदेशमध्ये ‘चैत्रप्रतिपदा’, तर पंजाबमध्ये ‘बैसाखी’ नावाने हा सण साजरा होतो. हिंदूंनो, गुढीपाडव्याविषयी या जातीद्वेषमूलक प्रसाराला दाद न देता हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करा ! धर्मशास्त्र समजून घेऊन धर्माचरण करा. हिंदु सण-उत्सव मोठ्या उत्साहात अन् आनंदात साजरे करा.

याविषयी अधिक माहितीसाठी https://www.sanatan.org/mr/gudipadwa या मार्गिकेला भेट द्या.

संभाजी ब्रिगेडच्या अपप्रचाराला न जुमानता गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करा ! –  ह.भ.प. बंडातात्या कराडकर

पुणे – गुढीपाडवा हा हिंदूंचा पवित्र आणि आनंददायी सण असतांनाही घातक संभाजी ब्रिगेडने हिंदूंचे सण-उत्सव बंद व्हावेत; म्हणून हिंदु सणांविषयी खोटा प्रचार करून हिंदूंना फितवण्याचे काम चालू केले. ‘गुढी उभारणे अशुभ आहे’, असा भ्रम ते समाजामध्ये निर्माण करत आहेत. ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी या सणाचा संबंध जोडून लोकांची दिशाभूल करत आहेत. हिंदु धर्माचा उच्छेद करण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून प्रसार केला जात असून तो निखालस खोटा आहे. त्याला कोणी बळी पडू नये आणि गुढीपाडव्याचा सण प्रथेप्रमाणे आनंदात साजरा करावा, असे आवाहन वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. त्याविषयीचा एक ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असून यामध्ये ह.भ.प. बंडातात्या यांनी गुढीपाडव्यानिमित्त संभाजी ब्रिगेडकडून केल्या जाणार्‍या अपप्रचारांचे खंडण केले आहे.

अपप्रचार : धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या झाल्याने ब्राह्मण समाजाकडून आनंदोत्सव म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.

खंडण : वर्ष १६८९ मध्ये फाल्गुन कृष्ण पक्ष अमावास्येच्या पहाटे औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली; पण त्या वर्षी महाराष्ट्रात कुठेही गुढी उभी केली गेली नाही, तसेच कुठेही पुरणपोळीचा स्वयंपाक झाला नाही. धर्मनिष्ठ राजाचा मृत्यू झाल्याने सर्व प्रजेला दुःख झाले होते; मात्र त्याच्या दुसर्‍या वर्षीपासून ही प्रथा पूर्वपरंपरेनुसार चालू राहिली. आजही घरातील एखादी व्यक्ती गुढीपाडव्याच्या आधीच्या काळात मृत पावली असेल, तर गुढी उभी केली जात नाही. इतकेच नव्हे, तर संपूर्ण वर्षाच्या कालावधीत कोणतेही सण साजरे केले जात नाहीत.

अपप्रचार : गुढीसह असणारी साडी वार्‍याने हलणे म्हणजे स्त्रीची विटंबना !

खंडण : गुढीला कोणतेही नूतन वस्त्र नेसवले, तरी चालते. गुढीला साडीच नेसवली पाहिजे, असे नाही. त्यामुळे ‘साडी इतस्ततः उडते’, असे म्हणणे, हा दावा खोटा आहे.

अपप्रचार : गुढीला पालथा तांब्या लावणे अशुभ !

खंडण : तांब्या पालथा आहे; म्हणून अशुभ आहे, असे मानायचे कारण नाही. तांब्या (कलश) घरात पालथा असेल, तर तो अशुभ मानला जातो; पण तो एखाद्या काठीवर किंवा घुमटावर पालथा ठेवला, तर तो शुभ मानला जातो. त्याला कळस म्हणतात. अशा कळसाचे दर्शन हिंदु धर्मात अत्यंत मंगलमय मानले जाते.

त्यामुळे गुढीपाडव्याच्या संदर्भात संभाजी ब्रिगेड सांगत असलेली तिन्ही कारणे बोगस (खोटी) आहेत. प्रत्यक्षात संभाजी ब्रिगेडला हिंदूंचे सगळे सण बंद करायचे आहेत. ही संघटना परधर्माला धार्जिण आणि हिंदु धर्माच्या विरुद्ध आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते कोणताही सण घरात साजरा करत नाहीत. सनातन धर्माचा पाईक म्हणून मी प्रांजळ आवाहन करतो की, खोट्या प्रचाराला बळी न पडता प्रत्येकाने आनंदाने गुढी उभी करावी आणि हा सण पारंपरिक प्रथेप्रमाणे उत्साहात साजरा करावा.


Multi Language |Offline reading | PDF