युवा पिढीला भ्रष्ट करणार्‍या क्रिकेट स्पर्धा !

नोंद

‘अमूल्य वेळ वाया घालवणारा इंग्रजी खेळ म्हणजे क्रिकेट होय ! या खेळामुळे वेळ, पैसा यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होतोच, शिवाय आता हा खेळ व्यसनाला प्रोत्साहन देणारा ठरत असल्याचे एका शहरात आयोजित केलेल्या स्पर्धेतून लक्षात येते. दादर येथील नायगावमध्ये क्रिकेट स्पर्धांच्या नावाखाली पारितोषिके म्हणून उघडपणे मद्य आणि ‘बिअर’च्या विविध आस्थापनांच्या बाटल्या देण्याचे अन् जिंकणार्‍या समूहास एक बकरी, तसेच इतरांना ग्रामीण कोंबड्या देण्याचे आमीष दाखवण्यात आले आहे. यासाठी २ सहस्र ५०० रुपये एवढी वर्गणीही आकारण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी लावलेली ही पत्रके नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहेत. देशातील ७० टक्के लोकसंख्या ही युवावर्गातील आहे. या युवावर्गाच्या खांद्यावर राष्ट्राच्या उत्कर्षाचे दायित्व आहे. एकीकडे युवावर्गाच्या डोळ्यांत भावी महासत्ता भारताचे स्वप्न पाहिले जात असतांना दुसरीकडे मात्र उघडपणे त्यांना मद्याचे व्यसन आणि तमोगुणी मांसाहाराचे वेड लावण्यात येत आहे. त्यामुळे ‘युवावर्गाला भ्रष्ट होण्यापासून कोण वाचवणार ?’, अशी चिंता काही नागरिक व्यक्त करत आहेत.

क्रिकेटच्या स्पर्धांचे आयोजन आणि बक्षिसे, हा तसा नवा विषय नाही. बहुतांशी राजकीय नेत्यांकडून गेल्या ७१ वर्षांत जनहितार्थ कामे न केली गेल्यामुळे स्वत:ची कोरी असलेली पाटी झाकण्यासाठी युवकांना क्रिकेटमध्ये गुंतवून त्यांची मते लाटण्याचे प्रकार चालू असतात. गावागावांत मुख्यमंत्री चषक, आमदार, खासदार चषक वगैरे स्पर्धा चालू असतात. ही नेतेमंडळी त्यांना आर्थिक साहाय्य करत असतात.

समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या ज्येष्ठ नेते मंडळींकडे खरे तर युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे दायित्व असते. अनुभवी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातूनच भावी पिढी घडत असते. सध्या मात्र असे अपप्रकार होत असतांना ज्येष्ठ नेते मंडळींकडून ते रोखण्यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. पूर्वीच्या काळी गुरुकुलातील ऋषिमुनींच्या मार्गदर्शनाने सुसंस्कारित झालेले राजे पुढे समाजाला योग्य दिशा देत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही मावळ्यांना एकत्र करून धर्मरक्षणाचे महत्कार्य केले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेक राष्ट्रपुरुषांनी युवकांना राष्ट्रहितार्थ झटण्याचे आवाहन विविध माध्यमांतून केले. सध्याची नेतेमंडळी मात्र मतांचे स्वार्थी राजकारण करण्यातच गुंग आहेत. त्यामुळे असे अपप्रकार रोखण्यासाठी आता सतर्क नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा. युवकांचे प्रबोधन करायला हवे. यासह युवावर्गाला सुसंस्कारित करण्यासाठी शालेय शिक्षणापासूनच धर्मशिक्षण देण्यासाठी शासनावर दबाव आणायला हवा. धर्मशिक्षण मिळाल्याने सुसंस्कारित झालेला युवावर्ग

स्वत:हून अशा व्यसनी आणि तमोगुणी प्रलोभनांकडे पाठ फिरवेल, हे निश्‍चित !’

– श्री. नीलेश देशमुख, सानपाडा, नवी मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF