भोळ्या भावाने सतत देवाच्या अनुसंधानात असणार्‍या आणि दृष्टीदोष असूनही ‘सनातनचे कार्य घरोघरी पोचावे’, या तळमळीने सेवा करणार्‍या पुण्यातील सौ. संगीता पाटील समष्टी संतपदी विराजमान ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ८५ वे पुष्प गुंफले !

‘पुण्यातील सौ. संगीता महादेव पाटील यांनी बालपणापासून अत्यंत खडतर आयुष्य जगतांना देवावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. त्यांच्या भोळ्या भावामुळे देवही त्यांच्या प्रत्येक हाकेला जणू धावून येत होता. आजारपणामुळे त्यांना अंधत्व आले आणि साधना करू लागल्यानंतर त्यांना मोठी अनुभूती आली, ती म्हणजे त्यांना थोडे थोडे दिसू लागले. आपण संत जनाबाई, संत सखूबाई यांच्या गोष्टींमध्ये ऐकतो ना की, प्रत्यक्ष देवच त्यांच्या साहाय्याला येत होता. तसेच सौ. पाटीलकाकूंच्या संदर्भातही घडले आहेे.

त्यांचे कौतुक म्हणजे बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी सेवेची तीव्र तळमळ आणि सनातनचे कार्य समाजापर्यंत पोचवण्याचा ध्यास यांमुळे डोळे अधू असूनही त्या प्रसारसेवा करतात. त्या देवाचीच सोबत घेतात आणि गर्दीच्या रस्त्यावरून एकट्याच चालत जाऊन घरोघरी प्रसार करतात. अंधुक दिसत असल्याने त्यांना वाचन इत्यादी करता येत नाही. असे असले, तरी त्यांना शास्त्रीय भाषेत सूत्रांचे विश्‍लेषण करता येते.

आतापर्यंत मी अनेक भक्तीयोगी पाहिले; पण भक्तीयोगाशी अद्वैत झालेल्या, भगवंताशी अखंड अनुसंधान असलेल्या पाटीलकाकू एकमेव आहेत ! भक्तीयोगी असूनही त्या व्यष्टीसह समष्टी साधनाही करत आहेत. शारीरिक, आर्थिक इत्यादी सर्व प्रकारच्या अडचणी असूनही त्या यासंदर्भात कधी कोणाशी तक्रारीच्या स्वरूपात बोलल्या नाहीत आणि त्यांच्यावर अडचणींचा कधी परिणामही झाला नाही. त्या स्थितीतही त्यांची भगवंतावरील श्रद्धा अतूट राहिली.

अखंड भावस्थिती आणि सेवेची तीव्र तळमळ यांमुळे सौ. संगीता महादेव पाटील ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८५ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या आहेत.

अशा पू. काकू सनातन संस्थेला दिल्याविषयी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती व्हावी’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

पू. काकूंच्या यजमानांमध्येही साधकत्वाचे अनेक गुण आहेत. पू. काकूंच्या संतपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मोलाची साथ दिली. यामुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्याविषयी मी त्यांचे अभिनंदन करतो.

‘पू. काकू आणि त्यांचे पती यांनी रामनाथी आश्रमात कायमचे रहाण्यासाठी लवकरात लवकर यावे’, अशी मी त्यांना विनंती करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘ही धारिका वाचतांना अतिथी कक्षात पुष्कळ सुगंध दरवळत होता आणि भावजागृती होत होती. अशी अनुभूती प्रथमच आली.’

– सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (३०.३.२०१९)

(भोसरी) पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) यांच्या रूपातून सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ८५ वे पुष्प गुंफले गेले ! सनातनचा संतवृक्ष हा दिवसेंदिवस अधिकच बहरत आहे. सर्व साधकांना संतांच्या कृपावर्षावात न्हाऊन निघण्याची अमूल्य संधी भगवंत देत आहे. भगवंताच्या या अपार प्रीतीविषयी कृतज्ञता !

पू. (सौ.) संगीता पाटील यांच्या संत सन्मान सोहळ्यानिमित्त आजचा रंगीत विशेषांक आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ईश्‍वराने असे अद्वितीय संतरत्न सनातनला दिले, यासाठी त्याच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !


Multi Language |Offline reading | PDF