मराठवाड्यात मार्च मासातच पाण्यासाठी नागरिकांची वणवण !

७० वर्षे पाणीप्रश्‍नही सोडवू न शकणारी निरर्थक लोकशाही हटवून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक !

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकाही पक्षाने पूर्णपणे पाणीटंचाईची समस्या सोडवलेली नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळा आला की, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे पाणीटंचाई निर्माण होते. पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि पाणीटंचाईवरील अन्य परिणामकारक उपाययोजना अद्यापही व्यवस्थित राबवल्या गेलेल्या नाहीत, असेच प्रतिवर्षी भेडसावणार्‍या भीषण पाणीटंचाईच्या प्रश्‍नामुळे सिद्ध होत आहे.

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ – कौशिकपद्धति

अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.

संभाजीनगर येथे  ८ दिवसाआड पाणी मिळते !

संभाजीनगर – शहरातील ११५ पैकी ५४ पेक्षा अधिक वसाहतींना मागील काही दिवसांपासून ८ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या शहरातील काही प्रभागांना ४ दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पैठण येथील जायकवाडी धरणातून शहरात पाणी आणण्यात येते. हे अंतर ६० किलोमीटर आहे. जायकवाडी धरणाची पाणीपातळी मागील आठवड्यात मृतसाठ्यात गेली आहे. मृतसाठ्यात २ वर्षे पुरेल एवढे पाणी असले, तरी महापालिकेला आपत्कालीन पंप चालू करून पाणी आणावे लागते. शहराची आवश्यकता २०० एम्एल्डीची असतांना महापालिका केवळ १२५ एम्एल्डी पाणीपुरवठा करत आहे. शहरातील २५० पेक्षा अधिक वसाहतींना महापालिका ९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. उन्हाचा पारा वाढताच शहरात पाण्याची मागणीही वाढली आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नसल्याने नागरिकांना पैसे मोजून खासगी टँकर मागवावे लागत आहेत.

जालना येथे १० दिवसाआड पाणी मिळत असल्याने लोकांचे हाल !

जालना – शहरवासियांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शहराची मदार असलेल्या घाणेवाडी जलाशयाने तळ गाठला आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराला जायकवाडी येथील पाणीपुरवठा योजनेवरच अवलंबून रहावे लागत आहे. जायकवाडी जलाशयातील पाण्याची पातळी शून्य टक्क्यांपेक्षा अल्प झाली आहे. त्यामुळे तेथून प्रतिदिन होणार्‍या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात १० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. तो आता साधारणपणे १५ दिवसांतून एकदा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. जालन्यासह जिल्ह्यात पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले असून ३३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ४०० पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

परभणी येथे १३ दिवसाआड पाणी मिळत असल्याने लोकांचे हाल !

परभणी – महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. भर उन्हाळ्यात परभणीकरांना १३ दिवसांतून १ वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. वसमत रस्त्यावरील राहाटी येथील बंधार्‍यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी सिद्धेश्‍वर प्रकल्पात पाणी आरक्षित करण्यात आले आहे. १.५ दलघमी क्षमता असलेल्या राहाटी बंधार्‍यात सिद्धेश्‍वर धरणाचे पाणी घेऊन ते परभणी शहरवासियांना दिले जाते. आतापर्यंत ३ वेळा सिद्धेश्‍वर प्रकल्पातून पाणी घेण्यात आले आहे. सध्याही बंधार्‍यात पाणी उपलब्ध आहे; मात्र महापालिकेची ही नळ योजना ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होत नाही. शहरातील जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. परिणामी १३ दिवसांतून केवळ एक वेळा शहरवासियांना पाणी मिळत आहे. नागरिकांकडे १३ दिवसांपर्यंत पाणी साठवण्याची साधने उपलब्ध नसल्याने टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरासाठी युआयडीएस्एस्एम्टी ही पाणीपुरवठा योजना संमत झाली असून योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या तरी शहरवासियांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

बीड येथे ६ दिवसाआड पाणी !

बीड – उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून बीड शहराची तहान भागवण्यासाठी ‘माजलगाव बॅक वॉटर योजना’ आणि शहरालगत असलेल्या बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ऑक्टोबरपासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. सध्या ६ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. २ लाख ३ सहस्र ४२० इतकी शहराची लोकसंख्या असून प्रतिदिन २३ एम्एल्डी पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या माजलगाव आणि बिंदुसरा धरणातील पाणी जुलैपर्यंत पुरेल, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

हिंगोली येथे ३ दिवसाआड पाणी !

हिंगोली – शहरात ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सिद्धेश्‍वर धरण सध्या मृतसाठ्यात गेले असले तरीही हिंगोली शहराला पुरेल इतके पाणी आहे. हिंगोली येथे ८ ते १० वर्षांपासून नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तरीही शहरातील विविध भागांना ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सिद्धेश्‍वर धरण मृतसाठ्यात गेले असले तरीही दीडशे दलघनमीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

नांदेड येथे २ दिवसाआड पाणीपुरवठा !

नांदेड – ६ लाख ५० सहस्र लोकसंख्या असलेल्या नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. शहरात २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विष्णूपुरीत केवळ १६ दलघनमी म्हणजे २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यात सध्या होत असलेल्या उपशाचे प्रमाण लक्षात घेता शहराला केवळ मासभर पुरेल इतकेच पाणी आहे. यात अवैध पाणीउपसाही चालू असल्याने हे पाणी अधिक न्यून होणार आहे. अवैध पाणी उपशावर महापालिका, तसेच जिल्हा प्रशासन कोणतेही नियंत्रण ठेवू शकलेले नाही. त्यासाठी स्थापन केलेली पथके केवळ कागदावरच राहिली आहेत. शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेतूनही पाणी दिले जात आहे.

धाराशीव येथे १० दिवसाआड पाणी मिळत असल्याने लोकांचे हाल  !

धाराशीव – शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तेरणा आणि रूईभर या दोन्ही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण मदार आता उजनी प्रकल्पावर आहे. आजघडीला धाराशीवकरांना १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे. ‘उजनी’तून प्रतिदिन ५ ते ६ ‘एम्एल्डी’ पाणी उचलले जात आहे. वितरण व्यवस्थेच्या विस्तारीकरणाचे काम चालू असल्याने धरणामध्ये ८०० ते ९०० दलघनमी पाणीसाठा असला, तरी १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ‘उजनी प्रकल्पा’त मुबलक पाणी असल्याने उन्हाळ्यात शहराला पाणी अल्प पडणार नाही, असे नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील ओव्हाळ यांनी सांगितले, हे आश्‍चर्यकारक आहे.

लातूर येथे ८ दिवसाआड पाणी मिळते !

लातूर – मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत २२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून शहरासाठी प्रतिदिन ३८ एम्एलडी पाणी उचलले जात आहे. शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून हे पाणी जूनअखेरपर्यंत पुरेल, असा विश्‍वास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर होणारी तूट अल्प केली असून शहरातील जलवाहिनीची गळतीही अल्प केली आहे. शिवाय शहरातील नागरिकांना नळाला तोट्या बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मांजरा प्रकल्पावर लातूर, कळंब, अंबाजोगाई, धारूर, मुरूड आदी शहरांना पाणीपुरवठा केला जातो.


Multi Language |Offline reading | PDF