‘राजकीय किंवा धार्मिक कारणेच आहेत’, या अंधश्रद्धेतून बाहेर येऊन दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण करा ! – उद्धव ठाकरे

मुंबई, ३० मार्च (वार्ता.) – अनेकदा आरोपी घरातच दडलेले असतात आणि तेच आरोपी पोलीस आणि न्यायालय यांच्यावर आगपाखड करून अन्वेषण यंत्रणांची दिशाभूल करतात. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अन्वेषण यंत्रणा आणि सरकार यांच्यावर संशय घेणार्‍या याचिकाकर्त्यांच्या हेतूविषयी शंका घेण्यास वाव आहे. ‘राजकीय किंवा धार्मिक कारणेच आहेत’, या अंधश्रद्धेतून बाहेर येऊन दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत ३० मार्च मधील ‘दैनिक सामना’च्या अग्रलेखामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले. हा धागा पकडून या हत्या प्रकरणाच्या अन्वेषणातील भंपकपणा आणि न्यायव्यवस्थेतील गलथानपणा यांवर या अग्रलेखातून शरसंधान करून वस्तूस्थिती मांडण्यात आली आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,

१. पानसरे-दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण होत नाही, या एका कारणासाठी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री अकार्यक्षम ठरू शकत नाहीत. केवळ दाभोलकर-पानसरे हेच नाहीत, तर लाखो गरीब आजही न्यायापासून वंचित आहेत. न्यायालयाच्या पायर्‍या झिजवून त्यांचे आयुष्य संपले; तरीही त्यांना न्याय मिळाला नाही, म्हणून आमची न्यायालये बधीर किंवा अकार्यक्षम आहेत, असा आरोप आम्ही करणार नाही. न्यायालयापुढे दंडवत घालून आम्ही हे सांगत आहोत.

२. न्यायालयाचे आंधळेपण मुकाट्याने मान्य करायचे आणि देईल तो निर्णय स्वीकारायचा, असे परंपरेने चालू आहे. मार्कंडेय काटजू यांसारख्या न्यायमूर्तींचा चटोरपणाही मान्य करावा लागतो; कारण डोळस जनतेने आंधळ्या न्यायदेवतेचा न्याय मान्य केला नाही, तर न्यायदेवतेचा अवमान होतो आणि अवमान करणारा कितीही मोठा असला, तरी त्यास आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहून न्यायालय देईल ती शिक्षा मान्य करावी लागते.

३. एवढेच नव्हे, तर न्यायव्यवस्थाही भ्रष्टाचाराने आतून-बाहेरून पोखरली आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलायला हवीत, असा ‘हातोडा’ आता मद्रास उच्च न्यायालयानेच हाणला आहे. न्यायालयानेच न्यायालयावर ओढलेले हे ताशेरे आहेत. म्हणजे न्यायव्यवस्थेवरही जळमटे आहेत आणि ती दूर करण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयच म्हणते आहे.

४. गरिबांना न्याय मिळत नाही आणि अनेकांना न्याय विकत मिळतो, या भ्रमातून जनतेला बाहेर काढले नाही, तर न्यायव्यवस्थेवरील विश्‍वासाला तडे जातील अन् देशाला ते परवडणारे नाही. हे सर्व करण्याचे दायित्व मुख्यमंत्र्यांचे नाही.

‘सनातन संस्था’ ही हिंदूंची ‘जैश-ए- महंमद’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला !

‘दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणाचे धागेदोरे सापडले’, ‘आरोपी पकडले’, अशा बोंबा मारून काही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी मिळवली. अगदी ‘सनातन’ नामक संस्था ही हिंदूंची ‘जैश-ए- महंमद’ असून त्यांच्या आश्रमातील साधक हेच खरे आतंकवादी आहेत आणि त्यांच्या घराघरांत बॉम्ब किंवा हत्यारे सिद्ध करण्याचे कारखाने आहेत’ हे सुद्धा दाखवून झाले. पोलिसांनी माकडांना पकडून त्यांच्याकडून लांडगा असल्याचे वदवून घेतले, तरीही या प्रकरणातील संभ्रम कायम आहे.


Multi Language |Offline reading | PDF