व्हॅटिकनमध्ये नवीन लैंगिक शोषणविरोधी कायदा कार्यान्वित करणार

लैंगिक शोषणाच्या वाढत्या तक्रारींनी ‘व्यथित’ झालेल्या पोप फ्रान्सिस यांनी उचलले पाऊल !

व्हॅटिकनला उशिरा सुचलेले शहाणपण ! या कायद्याची कार्यवाही करून पाद्रयांकडून होणारे लैंगिक शोषण थांबले जाईल, याची निश्‍चिती कोण देणार ?

व्हॅटिकन (रोम) – पोप फ्रान्सिस यांनी २९ मार्च या दिवशी व्हॅटिकनमधील कर्मचारी आणि राजनैतिक अधिकारी यांच्यासाठी नवीन लैंगिक शोषणविरोधी कायदा जारी केला आहे. आता चुकीचे वर्तन करणार्‍या आरोपींची माहिती तात्काळ व्हॅटिकनच्या अधिवक्त्यांना देता येणार आहे. जगभरातील कॅथलिक चर्चसाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. व्हॅटिकनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असून त्यासाठी वेगळे कायदे करण्याचे प्रावधान आहे. संयुक्त राष्ट्रसंघातही या देशाचा प्रतिनिधी आहे.

१. पोप फ्रान्सिसने व्हॅटिकन आणि चर्चकडून चालवण्यात येणार्‍या विद्यालयांसाठीही बाल संरक्षणविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

२. गेल्या वर्षी चर्च धर्मगुरूंवर लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषणाचे आरोप झाले. त्यानंतर कॅथलिक चर्चच्या मुख्यालयाने या कायद्याद्वारे मुलांना संरक्षण देण्याचे धोरण बनवले आहे. त्यासाठी मुलांना ‘एक असुरक्षित व्यक्ती’ असा दर्जा देण्यात आला आहे. एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा शारीरिक अथवा मानसिक विकाराने पीडित आहे, जी वैयक्तिक स्वातंत्र्य वापरण्यास सक्षम नाही, तसेच एखाद्या व्यक्तीत ‘गुन्हा घडत आहे’, हे समजून घेऊन त्याला विरोध करण्याची क्षमता मर्यादित आहे, अशांचा समावेश ‘असुरक्षित व्यक्ती’, या परिभाषेत करण्यात आला आहे.

३. अशा प्रकरणात आरोप सिद्ध झालेल्या व्यक्तींना ५ सहस्र युरोपर्यंत (३ लाख ९० सहस्र रुपयांपर्यंत) दंड अथवा ६ मास कारावास, अशी शिक्षा देण्याचे अधिकार व्हॅटिकनच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. या शिवाय पीडितांना वैद्यकीय, मनोवैज्ञानिक आणि कायदेशीर साहाय्य करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी पीडित व्यक्तीला ती सज्ञान झाल्यापासून २० वर्षांपर्यंत तक्रार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now