प्रत्यक्ष वैद्यकीय व्यवसाय चालू करण्यापूर्वीच शिकाऊ आधुनिक वैद्यांना (‘इन्टर्न्स’ना) भ्रष्टाचाराची शिकवण देणारी खासगी वैद्यकीय महाविद्यालये !

‘रुग्णालयाच्या सर्वच विभागांत बनावट कागदपत्रे सिद्ध करण्याची एक यंत्रणा कार्यान्वित असते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत ‘इन्टर्नशिप’ करणार्‍या शिकाऊ डॉक्टरांना (‘इन्टर्न्स’ना) प्रत्यक्ष वैद्यकीय व्यवसाय चालू करण्यापूर्वीच अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराची शिकवण मिळते. आधुनिक वैद्य म्हणून कारकीर्द चालू करण्यापूर्वीच जर अशा प्रकारचे शिक्षण मिळत असेल, तर पुढे जाऊन ते समाजाची सेवा प्रामाणिकपणे करू शकतील का ?

१. ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’च्या वतीने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रत्येक सहा मासांनी किंवा एका वर्षाने सर्वेक्षण करण्यात येणे आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालये ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’च्या सर्वेक्षण निकषांची पूर्तता करू शकत नसल्याने खासगी महाविद्यालयांनी अनेक गैरमार्गांचा अवलंब करणे

‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’च्या (‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या) वतीने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रत्येक सहा मासांनी किंवा एका वर्षाने सर्वेक्षण केले जाते. त्यात ‘महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा आहेत का ?’, हे तपासले जाते, उदा. ‘विद्यार्थ्यांना रुग्ण तपासणीचा सराव करता येण्यासाठी रुग्णालयातील प्रत्येक विभाग आणि अतीदक्षता विभाग यांत आवश्यक ती रुग्णसंख्या आहे का ? प्रतिदिन रुग्णालयाच्या ‘बाह्य रुग्ण विभागा’त (‘ओपीडी’त) येणार्‍या रुग्णांची संख्या पुरेशी आहे का ? ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’च्या नियमांनुसार प्रयोगशाळा आणि ‘क्ष किरण (एक्स रे)’ तपासणी विभागात आवश्यक सुविधा आहेत का ?’, आदी सूत्रांची तपासणी केली जाते. बहुतांश खासगी वैद्यकीय महाविद्यालये ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’च्या सर्वेक्षण निकषांची पूर्तता करू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या कायम राखण्यासाठी ही खासगी महाविद्यालये अनेक गैरमार्गांचा अवलंब करतात. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे संस्थापक अथवा संचालक रुग्णालयातील विभागप्रमुखांपासून ते शिकाऊ आधुनिक वैद्यांपर्यंत सर्वांनाच या (गैर)कार्यात सहभागी करून घेतात.

आधुनिक वैद्य उज्ज्वल कपाडिया

२. ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’च्या सर्वेक्षण निकषांनुसार वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी तेथील रुग्णालयात न्यूनतम काही रुग्ण भरती होणे आवश्यक असणे आणि ही संख्या पुरेशी नसल्यास महाविद्यालयाने रुग्णांची बनावट कागदपत्रे सिद्ध करणे

‘बनावट कागदपत्रे (केस पेपर्स) सिद्ध करणे’, हा यांतीलच एक अपप्रकार आहे. ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’च्या सर्वेक्षण निकषांनुसार वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी तेथील रुग्णालयात प्रत्येक मासात न्यूनतम काही रुग्ण भरती होणे आवश्यक असते. ही संख्या पुरेशी नसल्यास महाविद्यालय रुग्णांची बनावट कागदपत्रे सिद्ध करते, उदा. ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’च्या नियमानुसार महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागात प्रत्येक मासात १ सहस्र रुग्ण भरती होणे आवश्यक असेल आणि प्रत्यक्षात ६०० रुग्ण भरती झाले असतील, तर सर्वेक्षणाच्या दरम्यान होणारी कारवाई टाळण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय त्या मासासाठी ४०० रुग्णांच्या भरतीची बनावट कागदपत्रे सिद्ध करते.

३. ‘आवश्यक रुग्णसंख्या आणि प्रत्यक्ष रुग्णसंख्या यांतील भेद शोधणे आणि तो (भेद) रुग्णांची बनावट कागदपत्रे सिद्ध करून भरून काढणे’, हा भ्रष्ट कारभार महाविद्यालयातील शिकाऊ आधुनिक वैद्यांनी त्यांच्या विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली करणे

सर्वेक्षणापूर्वी महाविद्यालयाच्या वैद्यकीय शाखेचे प्रमुख (डीन) रुग्णालयातील विविध विभागांच्या प्रमुखांना नियमानुसार आवश्यक रुग्णसंख्या आणि प्रत्यक्ष रुग्णसंख्या यांतील भेद शोधण्यास अन् तो (भेद) रुग्णांची बनावट कागदपत्रे सिद्ध करून भरून काढण्यास सांगतात. महाविद्यालयातील शिकाऊ आधुनिक वैद्य (‘इन्टर्न स्टुडंट्स’) हा भ्रष्ट कारभार त्यांच्या विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली करतात.

४. बनावट कागदपत्रे सिद्ध करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया

शिकाऊ आधुनिक वैद्यांना एकतर रुग्णालयाच्या नोंदणी (रेकॉर्ड) विभागात प्रतिदिन जावे लागते. तेथे त्यांना (बनावट) रुग्णांची वैयक्तिक माहिती देऊन कोरी कागदपत्रे देतात आणि त्यांत त्यांना रुग्ण तपासणी केल्याची खोटी माहिती भरण्यास सांगतात किंवा त्यांना एकाच वेळी ४० ते ५० कोरी कागदपत्रे देतात, ज्यात (बनावट) रुग्णांची वैयक्तिक माहिती असते आणि त्यांना काही दिवसांची समयमर्यादा देऊन (बनावट) रुग्ण तपासणी केल्याची खोटी माहिती भरण्यास सांगतात. अशा वेळी शिकाऊ आधुनिक वैद्य अशी बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी तो गठ्ठा त्यांच्या राहत्या खोलीवर घेऊन जातात आणि त्यांच्या वेळेनुसार आरामात भरतात. प्रत्येक वर्षी एका शिकाऊ आधुनिक वैद्याला अशी १०० पेक्षा अधिक बनावट कागदपत्रे सिद्ध करावी लागतात. बनावट कागदपत्रे भरतांना ते रुग्णाचा पूर्वेतिहास, प्रयोगशाळेतील चाचणीचे अहवाल, निदान, उपचार यांविषयी बनावट माहिती भरतात.

त्याचसमवेत ‘पुढच्या तपासणीसाठी कधी यायचे आणि कोणाला भेटायचे ?’, हेही त्यात खोटेच भरले जाते. काही वेळा खोटी माहिती भरतांना काही रुग्णांचे शस्त्रकर्म करण्यात आल्याचेही दर्शवले जाते. या बनावट कागदपत्रांतील वैद्यकीय तपशील शिकाऊ आधुनिक वैद्य भरतात आणि इतर सूत्रे ‘नोंदणी विभागा’तील लिपिक कर्मचारी भरून ती पूर्ण करतात. जर एखाद्या शिकाऊ आधुनिक वैद्याने अशा प्रकारची बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यास नकार दिला, तर त्याला वा तिला विविध प्रकारे धमकावले जाते अथवा बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी सुट्टी दिली जाते. शिकाऊ आधुनिक वैद्य काही वेळा कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या बाहेरील लोकांचे (‘एजंट्स’चे) साहाय्य घेऊन ही कागदपत्रे पूर्ण करतात.

५. बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी शिकाऊ आधुनिक वैद्यांना दाखवली जाणारी प्रलोभने आणि कामात दिल्या जाणार्‍या सवलती

अ. ५० बनावट कागदपत्रे सिद्ध करा आणि १५ दिवसांची सुट्टी घ्या.

आ. ठराविक संख्येत बनावट कागदपत्रे सिद्ध करा आणि विभागातील कोणतेही काम करू नका.

इ. बनावट कागदपत्रे घरी घेऊन जाऊन ती पूर्ण करून आणा. त्या काळात विभागात उपस्थिती लावली जाईल.

६. काही शिकाऊ आधुनिक वैद्यांनी या प्रलोभनांना आणि सवलतींना न भूलता हा अपप्रकार करण्यास विरोध केल्यास त्यांना धमकावले जाणे अथवा भीती दाखवली जाणे

अ. रुग्णालयातील विभागात २४ घंटे उपस्थित रहाण्यास सांगणे

आ. रात्रीच्या वेळीही रुग्ण तपासणीसाठी बोलावणे

इ. वरिष्ठांकडून विविध प्रकारांनी छळ केला जाणे

ई. शिकाऊ आधुनिक वैद्यांचा संबंधित विभागातील नेमणुकीचा कालावधी वाढवणे (प्रत्येक विभागात शिकाऊ आधुनिक वैद्यांची १५ दिवसांसाठी अथवा १ मासासाठी नेमणूक केलेली असते. वरिष्ठ आधुनिक वैद्यांना ‘त्याने या कालावधीत अपेक्षित असे काम केले नाही’, असे वाटले, तर त्या विभागात अजून काही दिवस त्याच्या नेमणुकीचा कालावधी वाढवतात. त्यामुळे त्याने काम चांगले केले असले, तरी केवळ बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यास नकार दिल्यास ‘काम व्यवस्थित करत नाही’, असा खोटा शेरा देऊन त्याच्या नेमणुकीचा कालावधी वाढवतात.)’

– आधुनिक वैद्य उज्ज्वल कपाडिया (मार्च २०१९)

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

आरोग्य साहाय्य समिती

चांगल्या डॉक्टरांना आणि परिचारिकांना नम्र विनंती

तुम्हालाही वैद्यकीय शिक्षण घेतांना असे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीला खालील पत्त्यावर कळवा.

आपण सेवा करत असलेल्या रुग्णालयात असे प्रकार घडत असल्यास ते उघड करण्यासाठी आम्हाला साहाय्य करा. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल.

आपले अनुभव कळवण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]


Multi Language |Offline reading | PDF