हिंदूंनो, हिंदूंच्या बहुसंख्य देवळांची दुःस्थिती जाणून ती पालटण्यासाठी कृतीशील व्हा !

मंदिरे वाचवा, धर्म वाचवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘देऊळ’ म्हणजे साक्षात् भगवंताचे निवासस्थान ! देवळे ही हिंदूंना चैतन्याचा स्रोत आणि आध्यात्मिक शक्ती पुरवणारी केंद्रे आहेत. देवळांतील पावित्र्य आणि सात्त्विकता यांमुळे भाविकांना आध्यात्मिक लाभ होतो. ८ व्या शतकापासून मोगलांसारख्या परकीय आक्रमकांनी आणि पुढे इंग्रजांनी जेव्हा भारताला लुटण्यासाठी भारताच्या भूमीवर आक्रमणे केली, तेव्हा प्रामुख्याने देवळांमुळेच या भूमीत हिंदु धर्म टिकून राहिला. आज मात्र देवळांची दुःस्थिती झाली आहे. धर्माचे अधःपतन झाले, तर राष्ट्राचेही अधःपतन होते. ‘हिंदूंनी देवळांची दुःस्थिती जाणून घ्यावी आणि धर्मकर्तव्य म्हणून ती पालटण्यासाठी कृतीशील व्हावे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. बहुसंख्य देवळांची सध्याची दुःस्थिती !

१ अ. देवळे सुरक्षित नसणे : देवळांत होणार्‍या चोर्‍या आणि देवळांतील मूर्तींचे भंजन यांचेे प्रमाण सध्या वाढले आहे. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे साई मंदिर आदी मंदिरे तर आतंकवाद्यांच्या सूचीत अग्रस्थानी (‘हिटलिस्ट’वर) आहेत.

१ आ. शासनाने देवळे अधिग्रहित करणे : सध्या कर्नाटक शासनाच्या कह्यात ३२ सहस्रांहून अधिक, तर केरळ शासनाच्या कह्यात १ सहस्र ३०० हून अधिक देवळे आहेत. आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि ओडिशा येथील राज्यशासनांनीही हिंदूंची शेकडो देवळे अधिग्रहित केली आहेत. महाराष्ट्र शासनानेही काही सुप्रसिद्ध देवळे अधिग्रहित केली आहेत. या अधिग्रहणाचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे गंभीर आहेत.

१ आ १. देवनिधी आणि देवभूमी यांची लूट होणे

अ. मुंबई (महाराष्ट्र) येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोट्यवधी रुपये राजकारण्यांच्या न्यासांना (ट्रस्टना) वाटण्यात आले आहेत.

आ. कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील श्री महालक्ष्मी मंदिर, तसेच तुळजापूर (महाराष्ट्र) येथील श्री भवानी मंदिर यांची सहस्रो एकर भूमी धनिक आणि राजकीय नेते यांनी स्वतःच्या संस्थांसाठी कवडीमोलाने घेतली आहे.

इ. कर्नाटक शासनाने वर्ष १९९७ ते वर्ष २००२ या काळात शासन-अधिग्रहित देवळांमध्ये जमा झालेल्या ३९१ कोटी रुपयांपैकी २२५ कोटी रुपये चर्च आणि हज यात्रा यांसाठी दिले.

ई. आंध्रप्रदेश येथील शासन-अधिग्रहित तिरुपती बालाजी मंदिरात ४५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाला. या घोटाळ्याच्या वर्ष २००८ मधील चौकशीचा अहवाल अद्याप जनतेसमोर आलेला नाही.

१ आ २. देवळांची देखभाल नीट न होणे : अनेक देवळांमध्ये दिवाबत्तीचीही सोय नाही. अनेक देवळांचा जीर्णोद्धार करणे आवश्यक असतांनाही शासन त्यांना त्यासाठी एक पैसाही देत नाही. कर्नाटक राज्यशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे वर्ष २०११ ते २०१६ या कालावधीत त्या राज्यातील शेकडो शासन-अधिग्रहित मंदिरे बंद ठेवावी लागली.

१ आ ३. देवळांच्या प्रथा-परंपरा मोडणे

अ. पंढरपूर (महाराष्ट्र) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये धर्मशास्त्र डावलून महिला पुजार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच तेथील पूजेतील काही शास्त्रोक्त विधी बंद करण्यात आले आहेत.

आ. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात, तसेच केरळ येथील शबरीमला मंदिरात धर्मपरंपरा मोडून महिलांना प्रवेश देण्यात आला आहे.

१ आ ४. हिंदूंच्या देवळांत अहिंदूंच्या नेमणुका होणे

अ. कर्नाटक येथील श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात सेवेसाठी मुसलमान व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती.

आ. तिरुपती मंदिरात ख्रिस्ती कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

१ आ ५. ‘व्ही.आय.पी.’ दर्शनाची अयोग्य पद्धत चालू असणे : शिर्डीचे साई मंदिर, आंध्रप्रदेशमधील तिरुपती मंदिर आदी ठिकाणी १०० रुपयांपासून ५,००० रुपयांपर्यंत पैसे भरून ‘व्ही.आय.पी.’ दर्शनाची व्यवस्था केली जाते; मात्र असे पैसे देऊ न शकणार्‍या भाविकांना न्यूनतम (किमान) ४ – ५ घंटे (तास) रांगेत उभे राहिल्यावर दर्शन मिळते.

१ आ ६. हिंदूंच्या देवळांच्या परिसरात अन्य पंथाचा प्रसार केला जाणे : तिरुपती मंदिराच्या परिसरात ख्रिस्ती पंथाचा प्रसार केला जातो.

१ इ. देवळांत स्वच्छतेचा अभाव असणे : अनेक देवळांमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसतो. प्रसादाच्या रिकाम्या झालेल्या पिशव्या, फळांच्या साली, नारळाच्या शेंड्या, निर्माल्य आदी टाकण्यासाठीही तेथे सोय नसते.

१ ई. देवळांतील कर्मचारी उद्धट असणे : बहुसंख्य देवळांत कर्मचार्‍यांची भरती करतांना ‘ते देवाचे भक्त आहेत का ?’, हे विचारात घेतले जात नाही. भक्तीभाव नसलेल्या अशा कर्मचार्‍यांचे वर्तन बर्‍याचदा उद्धटपणाचे असते. भाविकांवर ओरडणे, त्यांना अकारण ढकलणे, महिला भाविकांशी असभ्य वर्तन करणे आदी कृत्ये त्यांच्या हातून घडतात.

१ उ. देवळात येणार्‍या दर्शनार्थ्यांकडून होणार्‍या काही चुका

१. देवळात तोकडे कपडे परिधान करून जाणे

२. दर्शनाच्या रांगेतील शिस्त मोडणे

३. मोठ्या आवाजात घंटा वाजवणे

४. देवळाच्या आवारात मोठ्याने बोलणे, गप्पा मारणे आणि देवळाच्या संदर्भात अपशब्द बोलणे

५. सहलीला आल्यासारखे वागणे, उदा. देवळाच्या आवारात खाणे-पिणे, खेळणे, भ्रमणभाषवर (मोबाईलवर) छायाचित्रे काढणे

६. जत्रोत्सवाच्या वेळी जुगार खेळणे

१ ऊ. देवळांच्या परिसरात आणि तीर्थक्षेत्री मद्य अन् मांस यांची विक्री होणे, तसेच तीर्थक्षेत्री अवैध धंदे चालू असणे

१. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सर्रास मद्य आणि मांस यांची विक्री होते. त्यामुळे त्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य अल्प होत आहे. त्या विरोधात वारकरी संप्रदाय, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत.

२. तीर्थक्षेत्रांचे रूपांतर पर्यटनस्थळांमध्ये करून पैसा मिळवण्याच्या राज्यकर्त्यांच्या हट्टामुळे काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य आणि मांस यांच्या विक्रीसह अमली पदार्थांची विक्री, वेश्याव्यवसाय आणि अवैध धंदेही चालू आहेत.

२. बहुसंख्य देवळांच्या दुःस्थितीची काही कारणे

२ अ. हिंदूंना धर्मशिक्षण दिले न जाणे

१. पूर्वीच्या काळी घराघरांतून वडीलधार्‍यांकडून मुलांना धर्मशिक्षण दिले जात असे. त्यामुळे मुलांवर लहान वयातच चांगले संस्कार होत असत. आजच्या विज्ञानाच्या युगात बहुतांश घरी असे चित्र पहायला मिळत नाही. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे.

२. इंग्रजांनी भारतातील प्राचीन ‘गुरुकुल शिक्षणपद्धत’ नष्ट केल्यामुळे इंग्रजी राजवटीत हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे बंद झाले. स्वातंत्र्यानंतर शाळा-महाविद्यालयांतून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास आरंभ करणे आवश्यक होते; मात्र धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आजवरच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले आहे.

३. स्वातंत्र्यानंतर मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही.

२ आ. बुद्धीप्रामाण्यवादी आणि तथाकथित पुरोगामी यांनी धर्म आणि देवळे यांच्याविषयी अपप्रचार करणे : बुद्धीप्रामाण्यवादी आणि तथाकथित पुरोगामी यांचा धर्म, देवळे आदींविषयी कोणताही अभ्यास नसतो. ते कोणतीही साधना करत नाहीत; मात्र ‘धर्म म्हणजे अफूची गोळी आहे !’, ‘देवळे बांधण्यापेक्षा शौचालये बांधा !’, अशी धर्मद्रोही विधाने करतात. त्यामुळे सामान्य भाविक भ्रमित होतो आणि त्याच्या मनातील धर्माविषयीची श्रद्धा डळमळीत व्हायला लागते. (बुद्धीप्रामाण्यवादी आणि तथाकथित पुरोगामी करत असलेल्या अशा अपप्रचाराविषयीचे विवेचन सनातनचा ग्रंथ ‘आधुनिक विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ !’ यात केले आहे.)

२ इ. भोंदू साधू-संतांमुळे समाजमनात संत आणि धर्म यांच्याविषयी अयोग्य प्रतिमा निर्माण होणे : ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ।’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत. अशा खर्‍या संतांऐवजी लोकेषणा आणि वित्तेषणा यांच्या आहारी गेलेले, स्वतः धर्माविषयी अज्ञानी असूनही हिंदूंना त्याविषयी मार्गदर्शन करून त्यांना संभ्रमित करणारे आणि स्वत:च्या अयोग्य वर्तणुकीने साधू-संतांच्या प्रतिमेला बट्टा लावणारे तथाकथित साधू-संत अन् स्वामी यांचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा भोंदू साधू-संतांमुळे सर्वसामान्य हिंदूंमध्ये संत आणि धर्म यांच्याविषयी अयोग्य प्रतिमा निर्माण होते. [ सविस्तर विवेचनासाठी सनातनची ग्रंथमालिका ‘खरे आणि भोंदू साधू-संत (४ खंड)’ वाचावी.]

२ ई. हिंदूंनी धर्माचरण आणि साधना न करणे : धर्मशिक्षणाचा अभाव, हिंदु धर्माविषयी होत असलेला अपप्रचार आदींमुळे सध्याच्या काळात बहुतांश हिंदू धर्माचरण आणि साधना करत नाहीत. त्यामुळे देवळांचे महत्त्व त्यांच्या लक्षात येत नाही.

२ उ. हिंदूंनी देवळांच्या रक्षणाचे धर्मकर्तव्य पार न पाडणे : बहुतांश हिंदूंना देवळांचे महत्त्वच लक्षात येत नाही, तर ते देवळांच्या रक्षणाचे धर्मकर्तव्य काय पार पाडणार ? त्यामुळेच राज्यकर्ते आणि प्रशासन यांनी देवळे पाडण्याचा निर्णय घेतला, तरी त्याला संघटितपणे फारसा विरोध होतांना दिसत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे, वर्ष २०१० मध्ये कर्नाटकमध्ये ५ सहस्र देवळे पाडण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला आणि त्यानुसार शेकडो देवळे पाडली गेली.

(क्रमशः वाचा पुढील रविवारी)


Multi Language |Offline reading | PDF