गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

कुठलाही सण आला की, त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करतच असतो; मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची माहिती घेऊ.

अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान)

शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते. ‘ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत ब्रह्मदेवाची किती वर्षे झाली; कोणत्या वर्षातील कोणते आणि कितवे मन्वंतर चालू आहे; या मन्वंतरातील कितवे महायुग अन् त्या महायुगातील कोणते उपयुग चालू आहे, या सर्वांचा उल्लेख देशकालकथनात असतो. ‘आपण फार मोठे आहोत’, असे प्रत्येकाला वाटत असते; पण ‘आपण किती लहान अन् सूक्ष्म आहोत’, याची कल्पना या विश्‍वाच्या अफाट काळावरून येते. यामुळे माणसाचा गर्व नाहीसा होतो.

तोरण लावणे

स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधतात; कारण लाल रंग शुभदर्शक आहे.

संवत्सर पूजा

प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करतात. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वाहतात. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्‍या श्रीविष्णूची पूजा करतात. ‘नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः ।’, हा मंत्र म्हणून त्याला नमस्कार करतात. नंतर ब्राह्मणाला दक्षिणा देतात.

दान देणे

याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत, उदा. पाणपोईद्वारा उदकदान. याने पितर संतुष्ट होतात. ब्राह्मणाला दक्षिणा देतात. शक्य झाले तर इतिहास, पुराणे इत्यादी ग्रंथ ब्राह्मणाला दान देतात.

शुभेच्छापत्रे

आपण जानेवारी मासाच्या प्रारंभी नववर्षाची शुभेच्छापत्रे आपल्या नातेवाइकांना आणि मित्रांना पाठवत असतो. त्याऐवजी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस शुभेच्छापत्रे पाठवणे चालू करावे; कारण हा खरा वर्षारंभाचा दिवस आहे.

गुढी उभारणे

१. गुढी सूर्योदयानंतर लगेचच उभारायची असते. अपवादात्मक स्थितीमध्ये (उदा. तिथीक्षय) पंचांग पाहून गुढी उभारावी.

२. मोठ्या वेळूच्या (बांबूच्या) उंच टोकास पिवळ्या रंगाचे भरजरी कापड बांधतात. त्यावर साखरेच्या गाठी, कडुनिंबाची कोवळी पाने, आंब्याची डहाळी आणि लाल फुलांचा हार बांधून वर चांदीचा किंवा तांब्याचा कलश यांनी सजवून गुढी उभी केली जाते. गुढी उभी करतांना ती मुख्य द्वाराच्या बाहेर परंतु उंबरठ्यालगत उजव्या अंगाला (घरातून पाहिल्यास) भूमीवर उभी करावी. गुढी अगदी सरळ उभी न करता पुढील अंगाला (बाजूस) थोडीशी कललेल्या स्थितीत उभी करावी. गुढीपुढे सुंदर रांगोळी घालावी.

३.   गुढीची ‘ब्रह्मध्वजाय नमः।’, असे म्हणून संकल्पपूर्वक पूजा करावी.

पंचांगश्रवण

ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा उपाध्यायाकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात.

कडुनिंबाचा प्रसाद

इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडुनिंबात प्रजापति लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद खातात. कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून प्रसाद सिद्ध करावा आणि तो सर्वांना वाटावा.

भूमी नांगरणे

गुढीपाडव्याच्या दिवशी भूमीत नांगर धरावा. नांगरण्याच्या क्रियेने खालची माती वर येते. मातीच्या सूक्ष्म-कणांवर प्रजापति-लहरींचा संस्कार होऊन बीज अंकुरण्याची भूमीची क्षमता अनेक पटींनी वाढते. शेतीची अवजारे आणि बैल यांच्यावर प्रजापति-लहरी उत्पन्न करणार्‍या मंत्रासह अक्षता टाकाव्या. शेतात काम करणार्‍या माणसांना नवीन कपडे द्यावे. या दिवशी शेतात काम करणारी माणसे आणि बैल यांच्या भोजनात पिकलेला भोपळा, मुगाची डाळ, तांदूळ, पुरण इत्यादी पदार्थ असावेत.


Multi Language |Offline reading | PDF