पसार संशयितांची माहिती देणार्‍यांना ५० लक्ष रुपयांचे बक्षीस !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !

  • अन्वेषण पथकातील अधिकार्‍यांची संख्याही ७ वरून १४ केली !

कोल्हापूर, २८ मार्च (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पोलिसांच्या म्हणण्यानुसार पसार असलेले विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणार्‍यांना शासनाने ५० लक्ष रुपयांचे बक्षीस (प्रत्येकी २५ लक्ष रुपये) घोषित केले आहे. यापूर्वी शासनाने २६ फेब्रुवारी २०१७ या दिवशी १० लक्ष रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. मुंबई उच्च न्यायालयाने विशेष पोलीस पथकाच्या (एस्.आय.टी.) अन्वेषणावर नापसंती व्यक्त केल्यानंतर गृह मंत्रालयाने ही रक्कम वाढवली. याचसमवेत पथकातील अधिकार्‍यांची संख्याही ७ वरून १४ करण्यात आली आहे. (कॉ. पानसरे हत्या प्रकरण सध्या कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर कुटुंबियांमुळे अनिश्‍चित कालावधीसाठी स्थगित आहे. खटला चालत नसल्याने या प्रकरणात ज्यांना पूर्वी अटक करण्यात आले, त्यांनी किती काळ डोक्यावर दोषी असल्याचे खोटे ओझे घेऊन जगायचे ? तसेच एस्.आय.टी.ने इतका काळ अन्वेषण करून नेमके काय साध्य केले ?, ते कोणत्या निष्कर्षाप्रत आले हेही समोर आले पाहिजे. समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट खटल्याप्रमाणे या प्रकरणातील संशयितही उद्या निर्दोष सुटल्यास सदोष अन्वेषणाचे दायित्व कुणाचे ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF