उच्च न्यायालयाकडून शासनाला शपथपत्र प्रविष्ट करण्याचा आदेश

साईबाबा संस्थानच्या गैरव्यवस्थापनाच्या विरोधात लढा देणारे संजय काळे यांच्या घरावर काही उपाहारगृह व्यावसायिकांनी अवैधरित्या मोर्चा काढल्याचे प्रकरण

नगर, २८ मार्च (वार्ता.) – साईबाबा संस्थानच्या गैरव्यवस्थापनाच्या विरोधात प्राणपणाने लढा देणारे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. संजय काळे यांच्या घरावर काही उपाहारगृह व्यावसायिक अवैधरित्या मोर्चा काढणार होते. हा मोर्चा पोलिसांनी अडवला. काही कालावधीनंतरही पोलिसांनी हा मोर्चा काढणार्‍यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे श्री. संजय काळे यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. त्याची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने ‘सदर मोर्चाच्या संदर्भात बैठक घेण्यापासून ते मोर्चा काढण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर शासनाने शपथपत्र प्रविष्ट करावे’, असा आदेश २७ मार्च या दिवशी दिला. न्यायालयात अधिवक्ता प्रज्ञा तळेकर आणि आजिंक्य काळे यांनी श्री. संजय काळे यांची बाजू मांडली.

याविषयी अधिक माहिती अशी की,

१. ९ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानच्या विश्‍वस्त मंडळाच्या पुनर्विचार याचिकेवर निकाल दिला. याविरोधात काही उपाहारगृहचालक, व्यावसायिक आणि राजकीय विश्‍वस्त साईबाबा संस्थानच्या एका खोलीत जमले.

२. या सर्वांनी श्री. संजय काळे यांना जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्याचे ठरवले आणि मोर्चा निघाला. कोपरगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी हा मोर्चा एका पुलावर अडवला आणि मोर्चेकरांना परत पाठवले.

३. त्याच रात्री पोलिसांनी श्री. संजय काळे यांना नोटीस बजावत ‘बंदुकधारी पोलीस घेतल्याविना घराच्या बाहेर पडू नका’, असे सांगितले. यानंतर पोलिसांनी १५ दिवसांत श्री. काळे यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेतले.

४. वरील मोर्चा काढणार्‍यांच्या विरोधात शासनाने अथवा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे श्री. संजय काळे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

५. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात शासनाला ‘उपाहारगृह व्यावसायिक आणि विश्‍वस्त यांनी संस्थानच्या खोलीत बैठक घेण्यापूर्वी अनुमती घेतली होती का ? श्री. संजय काळे यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी अनुमती घेतली होती का ? तसेच ज्या लोकांनी श्री. संजय काळे यांच्या घरावर मोर्चा काढला त्यांच्यावर पोलिसांनी कोणती प्रतिबंधात्मक कारवाई केली’, या सूत्रांवर ५ एप्रिलपर्यंत शपथपत्र प्रविष्ट करण्याचा आदेश दिला.


Multi Language |Offline reading | PDF