हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई आणि कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार !

जैविक कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शासकीय रुग्णालयांच्या अधिकार्‍यांवर गुन्हे नोंद करा !

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. अमर सुपाते यांना निवेदन देतांना (१) वैद्य उदय धुरी आणि (२) श्री. नरेंद्र सुर्वे

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – पेण आणि अलिबाग येथील शासकीय रुग्णालयातील जैविक कचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याला उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी तक्रार हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई अन् कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली. या वेळी समितीचे प्रवक्ता वैद्य उदय धुरी, श्री. नरेंद्र सुर्वे आणि श्री. सतीश सोनार उपस्थित होते.

श्री. जगदीश पाटील यांना निवेदन देतांना (उजवीकडून) वैद्य उदय धुरी आणि श्री. नरेंद्र सुर्वे

अधिकार्‍यांच्या प्रतिक्रिया

१. डॉ. अमर सुपाते, प्रधान वैज्ञानिक अधिकारी : आपण हा विषय घेतल्याविषयी आपले अभिनंदन ! खासगी रुग्णालयांकडून या नियमांचे आम्ही काटेकोर पालन करून घेत असतो; पण सरकारी रुग्णालयांकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करू आणि कारवाई करू.

२. श्री. जगदीश पाटील, कोकण विभागीय आयुक्त : खासगी रुग्णालयांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांकडून पिळवणूक केली जाते. त्यांच्याविषयी अनेक तक्रारी येत असतात. सरकारी रुग्णालयांना नियमांचा काही त्रास नसतो.


Multi Language |Offline reading | PDF