संत, देवता, वाङ्मय यांच्यावर टीका करणार्‍यांच्या विरोधात सरकारने कठोर कायदा करावा, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ

चैतन्यमय वातावरणात पार पडलेले श्रीक्षेत्र पैठण येथील ‘भव्य वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा’ !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांना सन्मानपत्र प्रदान

हिंदु धर्मरक्षणासाठी संघटित होणारे वारकरी ही हिंदूंची शक्ती !

व्यासपिठावर (डावीकडून) ह.भ.प. रामदास महाराज चौधरी (मुंबई), ह.भ.प. संदीप महाराज जाधव (नेवासा), ह.भ.प. अमृतानंद महाराज कांकरिया (नगर), श्री. पराग गोखले, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णू महाराज कोल्हापूरकर (दादा), मागे ह.भ.प. बापू महाराज रावकर आणि अन्य

श्रीक्षेत्र पैठण (जिल्हा संभाजीनगर), २७ मार्च (वार्ता.) – संत, वाङ्मय यांच्या विरोधात कोणी बोलल्यास त्याच्या विरोधात वारकरी पेटून उठतील. संत, देवता, वाङ्मय यांच्यावर जर कोणी टीकास्त्र सोडत असेल, तर अशा लोकांच्या विरोधात सरकारने कठोर कायदा केलाच पाहिजे, अन्यथा यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चेतावणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी येथे दिली. येथील संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज जन्मसंस्थान (आपेगाव) फड येथे, श्री गाढेश्‍वर मंदिराजवळील माऊली स्थानिक भूमीत २६ मार्चला दुपारी ४ वाजता संत श्री एकनाथषष्ठी सोहळ्याच्या निमित्ताने ‘भव्य वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा’ मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते होते.

मान्यवरांना सन्मानपत्रे देऊन सत्कार !

(डावीकडे) अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करतांना ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्‍वर विष्णू महाराज कोल्हापूरकर (दादा)
श्री. नागेश गाडे यांच्या वतीने श्री. रामेश्‍वर भुकन (डावीकडे) यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करतांना ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्‍वर विष्णू महाराज कोल्हापूकर (दादा)

या अधिवेशनात श्री ज्ञानेश्‍वर माऊली जन्मस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्‍वर विष्णू महाराज कोल्हापूरकर (दादा) यांच्या हस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, ‘सनातन प्रभात’चे श्री. रामेश्‍वर भुकन आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’च्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक-समूहाचे समूह संपादक श्री. नागेश गाडे हे काही कारणास्तव या महाअधिवेशनाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या वतीने सनातनचे श्री. रामेश्‍वर भुकन यांनी सन्मानपत्र स्वीकारले.

सनातन हे वैदिक धर्म शिकवते म्हणून धर्मद्रोह्यांकडून सनातनला विरोध ! – गुरुवर्य ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

धर्माचार्य गुरुवर्य ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते म्हणाले, ‘‘सनातन हे वैदिक धर्म शिकवते, हे धर्मद्रोह्यांना माहीत आहे, त्यामुळे ते सनातनला विरोध करत आहेत. विद्वत्ता खोटी असते, तर अनुभव खरा असतो. संत एकनाथ महाराज यांच्या भारूडात अध्यात्म आहे; मात्र ते आपल्याला कळत नाही. नाथांची अक्षरे ही ब्रह्मक्षरे आहेत. ‘प्राण गेला, तरी धर्म सोडणार नाही, त्याला साधू म्हणावे’, असे संस्कृत वचन आहे. वेदांना सोडू नये. वेदांच्या मागे जावे. जातीयवाद अजून गेलेला नाही, तो गेला पाहिजे. मी, माझे काहीच नाही. ते सर्व संतांचे आहे. संतांनी सांगितलेल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे. देशात हिंदूंचा जन्मदर आज ३.५ टक्के असून मुसलमानांचा हा जन्मदर २८.५ टक्के इतका आहे. मुसलमानांची संख्या वेगाने वाढत आहे. देशाच्या इतिहासाची माहिती ग्रंथात असल्याने ती नवीन पिढीला शिकवली पाहिजे. रामायण, महाभारत, वेद, पुराण हा आपला खरा इतिहास आहे. उर्वरित सर्व व्यर्थ आहे.’’

हज हाऊस बांधायला शेकडो एकर भूमी देणार्‍या सरकारने देवस्थानाच्या भूमीत वारकर्‍यांना सुविधा द्याव्यात ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘आतापर्यंत वेद आणि भागवत या धार्मिक ग्रंथांत एका शब्दाचाही पालट झालेला नाही; मात्र संविधानात १०० हून अधिक पालट झाले आहेत. जिथे वेदोपनिषद आहेत, त्यावर देशाची राज्यघटना बनेल, असे ‘हिंदु राष्ट्र’ आम्हाला हवे आहे. हज हाऊस बांधण्यासाठी सरकार शेकडो एकर भूमी मुसलमानांना देते, त्याप्रमाणे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या ८५० एकर भूमीत सरकारने वारकर्‍यांसाठी शैक्षणिक संस्था आणि गोशाळा, अशा सुविधा चालू कराव्यात. गेल्या ५ वर्षांत अगदी गडबड करून सरकारने मंदिरे पाडली; मात्र जेव्हा मशिदींचा प्रश्‍न येतो, तेव्हा सगळेच गप्प असतात. हा दुटप्पीपणा खपवून घेतला जाणार नाही. देव, धर्म यांच्या विरोधात जे वक्तव्य करतात आणि निरपराध्यांना जे अडकवतात, त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.’’

गोरक्षा, राष्ट्ररक्षा आणि धर्मरक्षा यांसाठी सर्वांनी संघटित व्हावे ! – ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री, अध्यक्ष, वारकरी प्रबोधन समिती

ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री म्हणाले, ‘‘वारकर्‍यांच्या समस्या सोडवण्याचे केंद्र म्हणजे ‘वारकरी महाअधिवेशन’ आहे. माझ्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर २ दिवसांत मी वृत्तवाहिन्यांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात मत मांडण्यासाठी गेलो होतो. आम्ही कडाडून विरोध केला होता. ‘ज्ञानोबांची ज्ञानेश्‍वरी, तुकोबांची गाथा अन्य भाषांत अनुवादित करा. त्यातून आम्हाला आमच्या प्रवचनातून भारतभर प्रचार करता येईल. अन्य भाषिकांनाही ती वाचता येईल’, असे मला हरिद्वार येथील संतांनी सांगितले आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. धर्माच्याविषयी ढवळाढवळ करत असेल, तर त्या सरकारला जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. गोरक्षा, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा यांसाठी सर्वांनी संघटित व्हावे, ही विनंती.’’

जो धर्मासाठी लढणार आहे, त्याला आपण साथ दिली पाहिजे ! – ह.भ.प. ज्ञानेश्‍वर विष्णू महाराज कोल्हापूरकर (दादा)

ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज कोल्हापूरकर (दादा) म्हणाले, ‘‘धर्मासाठी जो लढून कार्य करणार आहे, त्याला आपण साथ दिली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्ष अथवा संघटना यांचा असला, तरी चालेल. संत तुकाराम यांची अवहेलना करणारे लिखाण तहकीक नावाच्या धर्मांधाने प्रसिद्ध केले होते. त्या वेळी त्याला १ लाख लोकांनी भ्रमणभाषद्वारे संपर्क करून याचा जाब विचारला होता. संतांविषयी कोणी अवहेलना करत असेल, तर आपण त्याविषयी सावध असले पाहिजे. संत तुकाराम महाराज यांना वैकुंठाला नेण्यासाठी विमान आल्याविषयी काहीजण टीका करतात. रामायणाच्या काळात विमानांचा उल्लेख आढळतो, मग तसा उल्लेख संत तुकाराम महाराजांच्या काळातही आहे. भगवंताने १२ वर्षे नाथांच्या घरी भांडी घासली. नाथांचा सेवक झाला. तुकोबांना वैकुंठात घेऊन जाण्यासाठी भगवंत विमान घेऊन येऊ शकत नाही का ? सनातनचे कार्य चांगले असून नको त्या तथ्यहीन आरोपाखाली सनातनला अडकवले जात आहे.’’

वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. पराग गोखले म्हणाले, ‘‘ हिंदू हिंदूंमध्येच फूट पाडण्याचे षड्यंत्र चालू आहे. श्रीरामाने रावणाचा वध करून ते अयोध्येत परत आल्यानंतर त्या दिवशी लोकांनी विजयाचे प्रतिक म्हणून घरासमोर गुढी उभी केली होती. असा इतिहास असतांना ‘गुढीपाडव्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना संपवण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूंनी गुढीपाडवा सण साजरा करू नये’, असा खोटा प्रचार करण्यात येतो. खरा इतिहास आपल्याला माहीत असल्याने आपण त्यांचा कुटील हेतू यशस्वी होऊ द्यायचा नाही. लव्ह जिहाद, धर्मांतर अशा अनेक समस्या हिंदूंसमोर असल्याने त्या सोडवण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र बनवणे हा एकमेव पर्याय आहे. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे. त्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊया.’’

‘सनातन प्रभात’ हे केवळ नियतकालिक नसून ती एक धर्मरक्षणाची चळवळ आहे ! – रामेश्‍वर भुकन, सनातन प्रभात

‘सनातन प्रभात’ हे केवळ नियतकालिक नसून ती एक धर्मरक्षणाची चळवळ आहे. ‘सनातन प्रभात’ हासुद्धा एक वारकरीच आहे. वारकरी विठ्ठलभक्ती करतांना ‘रामकृष्णहरि’ चा जप करतात, तर ‘सनातन प्रभात’ही त्याच भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्यास शिकवते. वारकरी हे संत ज्ञानेश्‍वरांच्या भागवत धर्माचा प्रसार करतात, त्याप्रमाणे ‘सनातन प्रभात’हे धर्मग्रंथांतील लिखाण छापून धर्मप्रसारच करते. धर्मावर आघात करणार्‍या धर्मद्रोह्यांना उघडे पाडून त्याचे खंडन करत असते. धर्मद्रोह्यांना तीक्ष्ण उत्तरे देऊन निर्भीडपणे धर्मरक्षण करते. ‘सनातन प्रभात’ ही कोणत्याही सरकारी साहायय्याविना प्रसंगी धर्मांधांच्या धमक्या, पुरो(अधो)गाम्यांचे आरोप झेलत हिंदु राष्ट्राची वाटचाल निःस्वार्थीपणे करत आहे.

वक्त्यांच्या भाषणातील खालील सूत्रांना वारकर्‍यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला !

१. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर – देवस्थानांच्या निधीचा अपहार करण्यासाठी कोणाचेही हात पडत असतील, तर ते हात छाटले पाहिजेत. तसा कायदा नसेल, तर तो कायदा बनला पाहिजे, कारण कायद्यासाठी आम्ही नसून आमच्यासाठी कायदा आहे. ‘जो जो भगव्याखाली आहे, त्याला संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे. तुमचे हे षड्यंत्र हाणून पाडू, तरच आम्ही वारकरी आहोत.’

२. श्री. पराग गोखले – ‘शास्त्रानुसार आम्ही प्रत्येक सण साजरा करणार आहोत’, असे हिंदूंनी ठणकावून सांगितले पाहिजे. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे.

क्षणचित्रे

१. ह.भ.प. निवृत्ती वक्ते महाराज यांची प्रकृती खालावल्याने ते ‘अधिवेशनात केवळ ५ मिनिटांसाठी येतो’, असे म्हणाले होते. प्रत्यक्षात ते अधिवेशन संपेपर्यंत थांबून त्यांनी क्षात्रवृत्तीने मार्गदर्शनही केले.

२. महाअधिवेशनाच्या स्थळी कडक ऊन असतांनाही शेकडो वारकर्‍यांनी अधिवेशन संपेपर्यंत उभे राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

३. अधिवेशन चालू असतांना शेकडो पक्षी अधिवेशनस्थळी घिरट्या घालत होते. पक्षी जात असतांना पक्षांच्या थव्याचा आकार धनुष्याप्रमाणे झाला होता.

४. भर उन्हात वारकरी सनातनने लावलेले ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ यांविषयीचे फ्लेक्स पहात होते.

५. या महाअधिवेशनात ह.भ.प. उपाधी प्राप्त तरुणांची संख्या लक्षणीय होती. असे प्रथमच घडले आहे.

६. अधिवेशनात विश्‍वकल्याणासाठी भागवताचार्य त्रिवेणीताई देशमुख यांनी पसायदान म्हटले.

उपस्थित मान्यवर…

विहिंपचे श्री. बहिरत (नगर), राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. एकनाथ महाराज पठाडे (बीड), राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या मुंबईच्या अध्यक्षा कु. वैष्णवीताई शर्मा, ह.भ.प. सोपान महाराज भोसले (आपेगाव), ह.भ.प. राजू ज्ञानदेव बाबर, ह.भ.प. प्रल्हादबुवा रानडे (हिंगोली), ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज तारे (पंढरपूर), ह.भ.प. रमेश महाराज जाधव (संभाजीनगर), ह.भ.प. संदीप महाराज जाधव (नेवासा), ह.भ.प. आकार महाराज हारपे (राहुरी), ह.भ.प. संतोष महाराज पावसे, ह.भ.प. माधव डाके, ह.भ.प. तुळशीदास शिंदे, ह.भ.प. अनिल महाराज कासकर.

अधिवेशनात मान्यवर आणि वारकरी यांनी हात उंचावून संमत केलेले ठराव…

अधिवेशनातील ठरावांना हात उंच करून पाठिंबा देतांना वारकरी

१. हिंदु धर्म, देवता, संत, धर्मग्रंथ, प्रथा, परंपरा आदींचा अवमान करणार्‍यांविरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा.

२. महाराष्ट्र राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा.

३. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ आणि ‘परिवर्तन’ या २ ‘ट्रस्ट’मधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

४. शिर्डी येथील ‘श्री साईबाबा संस्थाना’मध्ये वर्ष २०१५ च्या कुंभमेळ्यासाठीच्या साहित्य-खरेदी प्रकरणात झालेल्या ६६ लाख रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करावी.

५. तुळजापूर येथील श्री भवानी मंदिरातील दानपेटी, तसेच भूमी यांच्या घोटाळ्याची ‘सी.बी.आय’ चौकशी आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळ्याची ‘सी.आय.डी.’ चौकशी यांचे अहवाल उघड करावेत.

६. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या देवनिधीत भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

७. सर्व मंदिरे सरकारमुक्त करून भक्तांच्या कह्यात द्यावीत.

८. मंदिरातील धर्मप्रथांच्या रक्षणासाठी विशेष कायदा करावा. हिंदूंच्या मंदिरातील भक्तांनी अर्पण केलेला निधी सरकारी कामासाठी नव्हे, तर धर्मकार्यासाठी वापरण्यात यावा.

९. सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य अन् मांस विक्री यांवर बंदी घालण्यात यावी.

१०. अवैध गोवंशहत्या करणार्‍या कसायांवर कठोर कारवाईसाठी ‘गोवंश हत्याबंदी कायद्या’ची कठोर कार्यवाही करावी.

११. ‘बीअर बार’ आणि मद्याची दुकाने यांना देवता, राष्ट्रपुरुष गडकिल्ले आदींची नावे देण्यात येऊ नयेत’, या शासनाच्या निर्णयाची कठोर कार्यवाही करावी.

१२. निरपराध हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाई थांबवावी.

गुरुवर्य ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि पराग गोखले यांना आशीर्वाद देऊन त्यांचे कौतुक करणे !

१. ह.भ.प. पू. निवृत्ती वक्ते महाराज यांनी अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य यशस्वी होणार आहे’, असे सांगून त्यांनी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. पराग गोखले यांना ३ वेळा आशीर्वाद दिला.

२. ‘अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. पराग गोखले या दोघांचेच मार्गदर्शन अधिवेशनासाठी अनुरूप झाले’, अशा शब्दांत ह.भ.प. पू. वक्ते महाराज यांनी या दोघांचे कौतुक केले, तसेच अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ते म्हणाले, ‘‘तुमच्यासारखे सिंह घडवले पाहिजेत.’’

विशेष नोंद

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची लवकर निर्दोष मुक्तता होण्यासाठी अखिल भारतीय संत समिती आणि वारकरी संप्रदाय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार !

१. हिंदु विधीज्ञ परिषद पाठीशी असल्याने आता वारकरी संप्रदाय कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आम्ही आता ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सिद्ध आहोत, अशी गर्जना अधिवेशनात वारकर्‍यांनी केली.

२. ‘डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना लवकरात लवकर निर्दोष मुक्त करावे’, यासाठी अखिल भारतीय संत समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहोत, अशी घोषणा सूत्रसंचालक आणि राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या सामाजिक संकेतस्थळाचे प्रमुख श्री. अरुण महाराज पिंपळे यांनी केली.

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात ‘सनातन प्रभात’मध्ये परखडपणे विचार मांडण्यात येतात ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले, ‘‘कोणत्याही स्थितीत हिंदु धर्मावर आघात होतात, तेव्हा कशाचीही पर्वा न करता परखड आणि निर्भीडपणे लेखणीतून जाज्ज्वल्य विचार केवळ ‘सनातन प्रभात’ नियतकालिकामधून मांडण्यात येतात. याचा सर्व हिंदू, वारकरी संप्रदाय आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे. ‘सनातन प्रभात’ला आमचे पूर्ण पाठबळ आणि आशीर्वाद आहेत. ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती’ यांचे कार्य पुष्कळ चांगले आणि आदर्श आहे. देव, देश अन् धर्म यांसाठी आयुष्याचा त्याग करणारे ‘सनातनचे साधक’ आहेत. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यामुळेच आम्ही धर्मकार्याकडे वळलो. डॉ. तावडे हे पुष्कळ संयमी व्यक्ती आहेत.’’


Multi Language |Offline reading | PDF