श्रीक्षेत्र पैठण येथे मोठ्या उत्साहात शेकडो दिंड्यांसह वारकर्‍यांचे आगमन !

उत्साहपूर्व वातावरणात विविध फडात कीर्तन, प्रवचन चालू !

श्रीक्षेत्र पैठण (जिल्हा संभाजीनगर), २६ मार्च (वार्ता.) – २६ मार्चला नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळमृदंगाचा खणखणाट अन् ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष करत ऊन, वार्‍याची पर्वा न करता शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत दिंड्यांचे २५ मार्चपासून दुपारनंतर पैठण येथे आगमन झाले होते. २६ मार्चला शेकडो दिंड्यांसह आलेल्या लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीने पैठणनगरी गजबजून गेली. शहरात दाखल होताच संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत नाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून अनेक दिंड्या आपापल्या राहुट्यांमध्ये विसावल्या.

संत श्री एकनाथषष्ठीच्या निमित्ताने नामदिंडीच्या गजरात वारकर्‍यांचे आगमन

१. २६ मार्चला सकाळी ११ वाजता षष्ठीची नाथवंशजांची निर्याण दिंडी गावातील नाथ मंदिरातून निघाली. या दिंडीत अक्षत दिलेले सर्व मानकरी सहभागी झाले होते. दिंडी वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरात गेली. या ठिकाणी ‘अवघेचे त्रैलौक्य, आनंदाचे आता’ या अभंगावर कीर्तन झाले.

२. विशेष म्हणजे यंदाही यात्रा मैदानात नाथ मंदिरालगत असलेले रहाटपाळणे तेथून काढून तेथे प्राधान्याने वारकर्‍यांच्या दिंड्या आणि राहुट्या यांना भूमी देण्यात आली, तर रहाटपाळणे वाहनतळ मैदानात हलवण्यात आले आहेत.

३. २५ मार्चला दुपारी नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी नाथ मंदिराच्या गोदावरी प्रवेशद्वारास लागून असलेल्या लक्ष्मीमातेची परंपरेनुसार पूजा केली.

४. संत एकनाथ महाराज यांनी या लक्ष्मीमातेस बहिण मानले होते. ‘षष्ठीचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडू दे’, असे साकडे नाथवंशजांनी भगवान पांडुरंगासह लक्ष्मी देवीस घातले होते. लक्ष्मी आई माता यांची सर्व नाथवंशज मंडळींनी पूजा केली.

‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’च्या वतीने उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात कीर्तन, प्रवचन चालू !

श्रीक्षेत्र पैठण येथील श्री गाढेश्‍वर मंदिराजवळील माऊली स्थानिक भूमीत ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’च्या वतीने फड आणि राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. या फडात ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’च्या वतीने २५ मार्चपासून उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात कीर्तन, प्रवचन चालू झाले आहे, तसेच या वेळी श्री ज्ञानेश्‍वर माऊली जन्मस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्‍वर विष्णू महाराज कोल्हापूरकर (दादा) यांची वंदनीय उपस्थिती होती. या फडात ह.भ.प. विनायक महाराज अष्टेकर यांनी कीर्तन आणि प्रवचन केले. २८ मार्चपर्यंत कीर्तन, प्रवचन चालू असणार आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF