(म्हणे) ‘कला अकादमीचे ‘शुद्धीकरण’, ही एक अंधश्रद्धा !’ – काँग्रेस

माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा मृतदेह ठेवलेल्या ‘कला अकादमी’चे ‘शुद्धीकरण’ केल्याचे प्रकरण

धर्मनिरपेक्ष अमेरिकेतील सिनेटच्या अधिवेशनाच्या प्रारंभी हिंदु धर्माचे पंडित राजन झेद यांना बोलावून वेदमंत्रपठण केले जाते. याउलट भारतात एका शासकीय कार्यालयात मृतदेह ठेवला होता म्हणून कर्मचार्‍यांच्या मागणीवरून त्याचे शुद्धीकरण केले, तर गदारोळ माजतो, यासारखे दुर्दैव नाही !

पणजी (गोवा) – माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव पणजी येथील कला अकादमीच्या ज्या जागेत अंत्यदर्शनासाठी ठेवले होते, त्या जागेचे कला अकादमीच्या काही कर्मचार्‍यांनी धार्मिक विधीद्वारे शुद्धीकरण केल्यानेे हा चर्चेचा विषय बनला आहे. याविषयी काँग्रेसचे गोव्यातील प्रवक्ते सुनील कवठणकर म्हणाले, ‘‘कला अकादमीचे ‘शुद्धीकरण’ करण्याची जी कृती झाली, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंधश्रद्धेवर आधारित विचारधारेने प्रेरित आहे.’’ (‘पिकते तेथे विकत नाही,’ ‘दिव्याखाली अंधार’ या म्हणी तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचारसरणीचे सार्थ करत आहेत. तेथे काम करणारे कर्मचारी म्हणजे जनता. त्यामुळे जनतेला जर शुद्धीकरण व्हायला हवे, असे वाटते तर जनतेच्या प्रतिनिधींना त्याविषयी आक्षेप का ? त्यांच्या मर्जीप्रमाणे जनतेने वागायचे का ? कर्मचार्‍यांनी संघटित राहून या विरोधाला तोंड द्यावे ! – संपादक)

ते पुढे म्हणाले, ‘‘कला अकादमीचे ‘शुद्धीकरण केल्याच्या प्रक्रियेमुळे आता शासकीय कार्यालयात आणि शासकीय कार्यक्रमात अशा तर्‍हेच्या कृती करण्यास चालना मिळणार.’’

केवळ ‘होम’ करण्यात आला, ‘शुद्धीकरण’केले नाही, त्यामुळे घटनेचे अन्वेषण करण्याची आवश्यकता नाही ! – गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री

पणजी – ‘‘माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव कला अकादमीच्या ज्या जागेत अंत्यदर्शनासाठी ठेवले होते, त्या जागेचे शुद्धीकरण झालेले नाही. या ठिकाणी केवळ ‘होम’ करण्यात आला होता. याविषयी मी कला अकादमीच्या अधिकार्‍यांकडे चर्चा केली आहे आणि याविषयी अधिकृतपणे या घटनेचे अन्वेषण करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. कला अकादमीत धार्मिक कृती होऊ नये, असे मला वाटते; मात्र लोकांच्या भावनांचाही आदर राखला पाहिजे. कला अकादमीत अनेक कर्मचारी आहेत. कला अकादमीच्या व्यवस्थापनाने जागेचे शुद्धीकरण केलेले नाही किंवा त्यासाठी शासकीय तिजोरीतून निधी खर्च केलेला नाही.’’ (शुद्धीकरण केले तरी त्यात अयोग्य काही नाही. मृतदेहाचे अंत्यदर्शन घेतल्यावरही आपण घरी येऊन अंघोळ करतो, किंवा १२ दिवसांनंतर उदकशांत करून घराची शुद्धी करतो. त्यामुळे काही त्या व्यक्तीचा अवमान होत नाही. अध्यात्माचा अभ्यास नसलेल्यांना सर्वच गोष्टी अंधश्रद्धा वाटतात. त्यामुळे शिक्षणातून धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. तसे झाले तर असे वाद उपस्थितच होणार नाहीत ! – संपादक) मंत्री गोविंद गावडे यांनी प्रारंभी या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला होता.

हा ‘शुद्धीकरण’ नव्हे, तर शांती विधी  ! – कला अकादमीचे कर्मचारी

कला अकादमीच्या काही कर्मचार्‍यांच्या मते हा ‘शुद्धीकरण विधी’ नव्हता, तर तो एक अन्य विधी होता. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव ठेवलेल्या जागेत काहीच केलेले नाही, तर अन्य ठिकाणी हा विधी पार पडला. अशा विधीला शासकीय मान्यता मिळणार नाही, म्हणून कर्मचार्‍यांनी स्वत:च्या खर्चातून हा शांती विधी केला. एका कर्मचार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही वास्तू अत्यंत पवित्र आहे. कला अकादमीच्या मागे देवीची घुमटी आहे. त्या ठिकाणी नित्यनेमाने दिवाबत्ती लावली जाते. येथील कर्मचारी या वास्तूचे पावित्र्य जपण्याकडे लक्ष देतात. मागील काही दिवसांत या वास्तूत ओल्या पार्ट्या रंगत होत्या. यासंदर्भातही कर्मचार्‍यांनी संबंधितांना सावधगिरीचा संदेश दिला होता. हा प्रकार काही जणांना बाधल्याचेही सांगण्यात येते. कला अकादमी येथे २०० कर्मचारी काम करतात. या वास्तूविषयी कर्मचार्‍यांचा भावनिक संबंध असल्याने आपल्या मनाच्या समाधानासाठी हा विधी करण्यात आला. या विधीचा शुद्धीकरणाशी कोणताच संबंध नाही आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचाही यात संबंध नाही.


Multi Language |Offline reading | PDF