प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सूक्ष्म रूपाने असणारे आणि तेथील सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन अन् साधक यांचे रक्षण करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज

१. कुंभमेळ्याच्या सेवेतून परतल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी कुंभमेळ्याच्या ठिकाणी चैतन्य न जाणवण्यामागील कारण विशद करून सांगणे आणि प्रत्यक्षातही कुंभमेळ्याच्या ठिकाणी तसाच अनुभव आलेला असणे

श्री. सचिन कौलकर

‘प्रयागराज येथील कुंभमेळ्याची वार्ताहर सेवा करून मी १५.२.२०१९ या दिवशी मुंबई येथे आलो. त्यानंतर २३.२.२०१९ या दिवशी मी देवद आश्रमात आलो होतो. त्या वेळी दुपारी मला देवद आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ परात्पर गुरु पांडे महाराज काही साधकांसमवेत बोलत असल्याचे दिसले. मी तेथे जाऊन परात्पर गुरु पांडे महाराज यांना नमस्कार केला. त्यानंतर आमच्यात कुंभमेळ्याविषयी पुढील संवाद झाला.

१ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी कुंभमेळ्यातील सनातनचे ग्रंथप्रदर्शन आणि कुंभमेळ्यातील इतरत्रचे चैतन्य यांतील भेद विचारणे

परात्पर गुरु पांडे महाराज : तुम्ही प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाऊन वार्ता-संकलन करतांना काय काय अनुभवले ? तुम्हाला काय फरक जाणवला ?

मी : कुंभमेळ्यात अनेक संत आणि महंत आले होते. तेथे मोठमोठे आखाडेही होते.

परात्पर गुरु पांडे महाराज : कुंभमेळ्यातील चैतन्य आणि आपल्यातील (सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनातील) चैतन्य यांत काय भेद जाणवला ?

मी : इतर ठिकाणांपेक्षा सनातनचे ग्रंथ प्रदर्शन लावले होते, तेथे पुष्कळ चैतन्य होते. इतर ठिकाणी केवळ मोठमोठे आखाडे होते; मात्र तेथे चैतन्य नव्हते.

१ आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी कुंभमध्ये सर्व देवता येत असल्याने तेथे पुष्कळ चैतन्य असल्याचे सांगणे; मात्र भाव नसल्याने आणि आखाड्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे तेथील चैतन्याचा परिणाम कोणाला जाणवत नसल्याचे विशद करणे : परात्पर गुरु पांडे महाराज मला म्हणाले, ‘कुंभमध्ये सर्व देवता येत असल्याने तेथे पुष्कळ चैतन्य असतेच. या चैतन्याचा परिणाम इतरांना जाणवायला हवा. तसा तो परिणाम जाणवला की, पुष्कळ आनंद होतो आणि अनुभूती येतात. ‘चैतन्य कसे कार्य करत असते ?’, हेही जाणवते. त्या चैतन्याचा आपल्या साधनेच्या अनुषंगाने लाभ होतो; मात्र सध्याचा कुंभ हा नुसता ‘मेळा’ आहे. कुंभपर्व नाही. भाव नसल्याने त्यातील चैतन्याचा परिणाम कुणाला जाणवत नाही. विविध आखाडे आणि अन्नछत्रे असतात; मात्र जे मुबलक धन अर्पण करतात, त्यांच्यासाठीच ते आखाडे अन्नछत्र चालवतात. ‘केवळ धन मिळवून आपला आखाडा मोठा करणे’, हाच त्यांचा हेतू असतो.’

१ इ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे अन्नछत्र आणि आखाडे यांच्यासंदर्भात तंतोतंत अनुभव आलेला असणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी हे सूत्र अगदी तंतोतंत सांगितले होते; कारण कुंभमेळ्यात मला एका अन्नछत्राच्या ठिकाणी तसा अनुभव आला होता. अन्नछत्राला जे धन अर्पण करत होते, त्यांच्यासाठीच ते अन्नछत्र चालवत होते. धन अर्पण न करणार्‍या इतर भाविकांना ते महाप्रसाद देत नव्हते. त्याचप्रमाणे काही आखाडे ‘केवळ धन मिळवून स्वतःचा आखाडा कसा मोठा होईल ?’, हे पहात होते.

२. प्रयागराज येथे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वति यांनी ‘कुंभ हा कुंभपर्व असून तो कुंभमेळा नाही’, असे भाष्य करतांना सांगितलेली सूत्रेच परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याचे जाणवणे आणि परात्पर गुरु पांडे महाराज सूक्ष्मरूपाने कुंभमेळ्यात असल्याची तीव्रतेने जाणीव होणे

प्रयागराज येथे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वति यांनी ‘कुंभ’ हा ‘कुंभपर्व’ आहे, तो ‘कुंभमेळा’ नाही’, असे भाष्य केले होते. कुंभ असतो त्या ठिकाणी खेळण्याची दुकाने, विविध सजावटीच्या वस्तू, उपाहारगृहे इत्यादी असल्याने तो ‘मेळा’ झाला आहे. कुंभपर्वमध्ये खेळण्याची दुकाने, उपाहारगृहे आणि इतर वस्तू अशी साहित्य विक्रीची दुकाने नसतात. त्या अनुषंगाने शंकराचार्यांनी वरील विधान केले होते. ‘कुंभमेळा नसून कुंभपर्व आहे’, असे जे जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितले, तेच परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याचे मला जाणवले. मी त्यांना म्हणालो, ‘‘परात्पर गुरु पांडे बाबा, तुम्ही जसे आता सांगितले, अगदी तसेच कुंभमेळ्यात आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु पांडे बाबा हसत हसत म्हणाले, ‘‘मी तेथे (कुंभमध्ये) होतो. त्यामुळे मला ज्ञात आहे.’’ ‘परात्पर गुरु पांडे बाबा सूक्ष्मरूपाने कुंभमेळ्यात आणि सनातनच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रत्यक्षात होते’, याची त्यांनी सांगितल्यावर मला आणखी तीव्रतेने जाणीव झाली.

३. कुंभमेळ्यात मधे मधे पाऊस पडत असतांना सनातनचे प्रदर्शन आणि तंबू यांमध्ये पाणी येण्याची भीती साधकांना वाटणे, त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांना उपाय विचारल्यावर त्यांनी पावसाचे पाणी प्रदर्शनाच्या ठिकाणी येणार नसल्याचे सांगून आश्‍वस्त करणे आणि प्रत्यक्षातही तसेच होणे

कुंभमेळ्यात मधे मधे पाऊस पडत होता. त्या वेळी सनातनचे प्रदर्शन आणि तंबू यांमध्ये पाणी येण्याची भीती साधकांना वाटत होती. त्या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु चारुदत्त पिंगळे, पू. नीलेश सिंगबाळ आणि साधक परात्पर गुरु पांडे महाराज यांना उपाय विचारत होते. तेव्हा पनवेल येथील सनातनच्या देवद आश्रमातून परात्पर गुरु पांडे बाबा भ्रमणभाषवरून सांगायचे, ‘तुम्ही (साधकांनी) काही काळजी करू नका. पावसाचे पाणी प्रदर्शनाच्या ठिकाणी येणार नाही. तुम्हाला काही होणार नाही.’ प्रत्यक्षातही कुंभमेळ्यात पाऊस पडल्यानंतर सनातनच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आणि तंबूमध्ये पाणी शिरले नाही, तसेच मंडपही कोसळला नाही. कुंभमेळ्यात इतर ठिकाणी असलेल्या आखाड्यांचे मंडप कोसळले होते. त्यांच्या तंबूमध्ये पाणी शिरले होते. यावरून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सनातनचे साधक आणि ग्रंथ प्रदर्शन यांचे रक्षण केले होते’, असे मला जाणवले. देवद आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी माझी ही शेवटची भेट होती. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी मी अनंत पटीने कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सचिन कौलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.३.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF