‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन न्यायालयीन निकाल लागेपर्यंत रोखणार नाही !

शिक्षणमंत्र्यांचे शिक्षक परिषदेला आश्‍वासन

मुंबई – ‘टीईटी’(टीचर एलिजीबिलीटी टेस्ट) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत रोखणार नाही; परंतु या शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक परिषदेच्या मंडळाकडे स्पष्ट केले. शिक्षण हक्क कायदा वर्ष २००९ नुसार प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे. यानुसार वर्ष २०१५ मध्ये केंद्र सरकारने शिक्षकांना मार्च २०१९ पर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याची मुदत दिली होती; मात्र अजूनही शेकडो शिक्षक ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण झाले नसल्यामुळे त्यांचे वेतन थांबवले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. (शिक्षण हक्क कायद्यानुसार दिलेल्या मुदतीमध्ये शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यामध्ये काय अडचण आली, हे स्पष्ट व्हायला हवे. यामध्ये शिक्षकांची चूक असेल, तर त्यांना काय शिक्षा दिली जाणार, हेही शिक्षणमंत्र्यांनी सांगायला हवे. अन्यथा सरकारनेच नियम घालायचे आणि सरकारनेच नियम तोडायचे असे होईल. अजूनही ‘टीईटी’ उत्तीर्ण न होणार्‍या शिक्षकांनी कधीपर्यंत व्हायला हवे, अशी मुदत त्यांना घालून द्यायला हवी. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF