घरगुती कामांतून व्यायाम !

घरगुती कामे करणे म्हणजे पुष्कळ कष्टाचे काम करणे, असा समज झाला आहे. शरिराला कष्ट न पडता आराम मिळावा आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे वेळेची बचत व्हावी, म्हणून विशेषत: कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्राचा (वॉशिंग मशीन) उपयोग होण्याचे प्रमाण शहरी भागात अधिक आहे, तसेच लादी पुसणे, भांडी धुणे आदी गोष्टींसाठीही यंत्राचा उपयोग होऊ लागला आहे. येथे पाणी-वीज यांचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्यय विचारात घेतला जात नाही. यंत्रासह याही गोष्टींचा हिशेब पैशांनी चुकता करता येतो. त्यामुळे पैसे व्यय करावे लागले, तरी या गोष्टीच्या उपयोगामुळे लाभच होतो, अशी मानसिकता मनावर बिंबली आहे. शहरी भागात पाण्याचा उपसा होण्याचा भाग सर्वाधिक आहे. आर्थिक बचतीसाठी काय केले पाहिजे ?, दुप्पट-तिप्पट अथवा अल्प कालावधीत पैसे वाढण्यासाठी योजना कोणत्या ?, नोकरी-व्यवसाय-शिक्षण यांत प्रगती होण्यासाठी काय केले पाहिजे ?, आरोग्य विम्याच्या योजना कोणत्या ?, अशा अनेक गोष्टींची बित्तंबातमी ठेवणारा माणूस ‘जलसंचय, वीज बचत, आरोग्य सुदृढ राखणे यांसाठी उपाययोजना शोधणे आणि त्याप्रमाणे कृती करणे हा माझा विषय नाही’, अशा प्रकारे वागत आहे. धुलाई यंत्राचा उपयोग थांबवल्यास पाणी-वीज यांची बचत होईल. यासह कपडे धुणे, लादी पुसणे यांतील प्रत्येक कृतीतून शरिराचा व्यायामही होईल; मात्र या लाभाकडे दुर्लक्ष केले जाते आणि घरगुती कामांतूनच होणारा व्यायाम सोडून वाढलेले वजन घटवण्यासाठी व्यायाम शाळांकडे (जिम) धाव घेतली जाते.

जे काम माणसाने स्वतः केले पाहिजे, ते यंत्राकडून करवून घेतले जात आहे. त्याच्याप्रमाणे वेग गाठणे शक्य नाही; पण स्वतः झिजल्यावर स्वतःलाच होणारा शारीरिक लाभ विचारात घेतला पाहिजे. वयस्कर, आजारी यांना अशा यंत्राचा उपयोग करावा लागणे, ही त्यांची शारीरिक आवश्यकता असते; मात्र ज्यांचे शरीर धडधाकट आहे, त्यांच्याकडून यंत्राचा उपयोग चालू रहाणे म्हणजे धडधाकट शरिराला आळशी, सुस्त आणि रोगी बनवण्याकडे फरफटत घेऊन जाणे होय. त्यामुळे घरगुती कामांत यंत्राचा उपयोग करण्यापूर्वी आपण वयस्कर, आजारी आहोत का ?, याचा विचार करावा.

‘मी उच्चशिक्षित आहे. अमुक आस्थापनात तमुक पदावर सेवारत आहे, मला वेळ नाही, असे असतांना घरातील कृती करणे मला जमणार नाही. या सर्व गोष्टी करणारी कोणी व्यक्ती असेल, तर त्याला मी त्याचे वेतन देईन’, अशी पैशांची खुमखुमी असणार्‍या मंडळींची संख्या अधिक आहे. आस्थापनात अनेक घंटे संगणकासमोर बसून काम करावे लागल्यामुळे शरिराला व्यायाम मिळत नाही. ‘मला वेळ नाही’, असे म्हणणार्‍या मंडळींना कालांतराने कुठल्या तरी आजारपणामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागल्यावर तेथे सक्तीने वेळ देण्याची सिद्धता असते. त्यामुळे नियमित थोडा वेळ काढून आवश्यक ती घरगुती कामे केली, तरी शरीर स्वस्थ रहाण्यास साहाय्य होणार आहे, हे लक्षात घेऊया !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF