जे.जे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या ‘विद्यार्थिनींनी तोकडे कपडे घालू नयेत’ या आदेशाविषयी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे ‘फतवा’ असा उल्लेख

  • स्त्रियांनी कपडे परिधान करतांना सृजनशीलतेच्या मर्यादा पाळणे, हे त्यांच्या शालीनतेला शोभणारे ठरते. युवतींनी तोकडे कपडे घालणे, हे समाजात व्यभिचाराला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
  • उद्या मद्यपान करणे, व्यभिचार करणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे या गोष्टीसुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खपवल्या जातील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणार्‍यांनी संस्कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांतील भेद समजून घ्यावा.
  • अशा घटनांमध्ये प्रसिद्धीमाध्यमांनी समाजाला योग्य दिशा देणे आवश्यक असतांना केवळ उथळ वृत्ते देऊन समाजाला भरकटवणारी पत्रकारिता लोकशाहीला निश्‍चितच शोभणारी नाही !

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – येथील जे.जे. वैद्यकिय महाविद्यालयातील एका कार्यक्रमाला येतांना विद्यार्थिनींनी तोकडे कपडे परिधान करू नयेत, असा संदेश भ्रमणभाषवरून पाठवण्यात आला आहे. हा संदेश महाविद्यालयाचे अधिष्ठाता चंदनवाले यांच्या नावे आहे. याविषयीचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करतांना हा आदेश म्हणजे विद्यार्थिनींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असल्याचे दर्शवण्यात आले असून याचा उल्लेख ‘फतवा’ असा करण्यात आला आहे.

या संदेशामध्ये महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्ये रहाणार्‍या विद्यार्थिनींनी रात्री १२ वाजेपर्यंत बाहेर रहाण्याची असलेली समयमर्यादा अल्प करून ती रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आदेशानंतर काही विद्यार्थिनी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र याविषयी महाविद्यालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य अजय चंदनवाले यांना वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘होळीनिमित्त महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर विद्यार्थिनींनी महाविद्यालयांतील कार्यक्रमांमध्ये योग्य पोषाख परिधान करून येण्याविषयी सूचना देण्यात आली’.

रुग्णालय प्रशासनाच्या निर्देशाच्या विरोधात विद्यार्थिनींची निदर्शने

भावी वैद्यांना ‘सभ्यतेने वागा’, असे सांगावे लागणे हे प्रारंभीपासून शालेय शिक्षणात नैतिक मूल्ये न शिकवल्याचाच परिपाक !

मुंबई – रुग्णालय प्रशासनाच्या निर्देशांचा निषेध नोंदवण्यासाठी विद्यार्थिनींनी स्कर्ट टॉप घालून आणि तोंडवळा स्कार्फने झाकून निदर्शने केली. या महाविद्यालयात होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांकडून कपडे फाडाफाडी तसेच काही विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे अधिष्ठाता आधुनिक वैद्य अजय चंदनवाले यांनी तात्काळ ‘कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कसे वागावे’ याविषयी कडक नियमावलीच सिद्ध केली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी होळीच्या कार्यक्रमात केलेल्या अयोग्य वर्तनाची चौकशी होणारच आहे. त्यांना घालून दिलेल्या निर्बंधात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन नाही; मात्र भावी आधुनिक वैद्य होणार असलेल्या विद्यार्थ्यांचा पोषाख तसेच वर्तन यांत सभ्यता असावी हाच हेतू आहे.


Multi Language |Offline reading | PDF