केंद्र सरकारने निधी संमत न केल्यामुळे नवी मुंबईतील ‘नाला स्वच्छता योजना’ रखडली !

नवी मुंबई – येथील दिघा, ऐरोली, इंदिरानगरसह अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली होती. त्यासाठी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने’च्या अंतर्गत (जेएन्एन्यूआर्एम्) ‘नाला व्हिजन’ राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. (समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना वारंवार पाठपुरावा का घ्यावा लागतो ? ‘तात्काळ उपाययोजना काढणे, हे प्रशासनाला स्वत:चे दायित्व आहे’, असे वाटत नाही का ? – संपादक) यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या २९ नाल्यांची सुधारणा, साफसफाई आणि संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव सिद्ध करून केंद्राकडे पाठवला असून १० वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही तो प्रस्ताव संमत न झाल्यामुळे नाला व्हिजन रखडले आहे. ही कामे स्वखर्चाने करण्यासाठी महापालिकेला अनुमाने ७०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

शहरातील नाल्यांची साफसफाई केली जात नसल्यामुळे त्यामध्ये गाळ साचला आहे. दगड अस्ताव्यस्त स्वरूपात नाल्यात पडले आहेत. डेब्रिज माफियांनी बांधकामांचा कचरा टाकून नाल्यांचा आकार अल्प केला आहे. बोनसरी आणि दिघा परिसरामध्ये पावसाचे पाणी नागरी वस्तीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकला जात असून नाल्यांच्या काठावर झोपड्या आणि विविध बांधकामे बांधली आहेत. विकासासाठी अनेक ठिकाणी नाल्यांचा मार्ग पालटण्याचा प्रयत्न झाला आहे. (या समस्यांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई का केली नाही ? असे निष्क्रीय प्रशासन कधीतरी सुव्यवस्था निर्माण करू शकते का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF