भाजपच्या पहिल्या सूचीमधील १८४ पैकी ३५ उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे !

भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारे पंतप्रधान मोदी हे स्वपक्षातील गुन्हे नोंद असणार्‍या उमेदवारांच्या विरोधात का बोलत नाहीत ? त्यांना लोकशाहीमध्ये गुन्हे नोंद असणारे लोकप्रतिनिधी अपेक्षित आहेत का ?

नवी देहली – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १८४ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली आहे. यांपैकी ३५ जणांवर गुन्हे प्रविष्ट आहेत; मात्र हे गुन्हे कोणत्या स्वरूपाचे म्हणजे राजकीय आहेत कि अन्य आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. या सूचीमधील ७८ जणांना वर्ष २०१४ मध्येही उमेदवारी देण्यात आली होती. याच ७८ जणांपैकी ३५ जणांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्यांच्या संदर्भातील माहिती दिली होती; मात्र पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये उभे रहाणार्‍या उर्वरित १०६ उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र याआधी सादर केले नसल्याने त्यांच्यावरील गुन्ह्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यावर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या पहिल्या सूचीमधील उमेदवारांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करणार्‍या ‘मायनेता डॉट इन्फो’ या संकेतस्थळाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

१. ७८ उमेदवारांमध्ये सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील खासदार हंसराज अहिर यांच्या नावावर आहेत. त्यांच्यावर ११ गुन्हे नोंद आहेत. सध्या ते केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत.

२. अहिर यांच्या खालोखाल ओडिशामधील प्रताप सारंगी यांच्या नावावर १० गुन्ह्यांची नोंद आहे.

३. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात एकूण ५ गुन्हे नोंद आहेत.

४. साक्षी महाराज यांच्या विरोधात ८ गुन्ह्यांची नोंद आहे.

५. वर्ष २०१४ च्या निवडणुकीनंतर ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने (‘एडीआर्’ने) निवडणूक जिंकणार्‍या ५४३ खासदारांपैकी ५४२ खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असणार्‍या निवडून आलेल्या खासदारांच्या सूचीमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत.

६. सध्याच्या लोकसभेतील भाजपच्या २८२ खासदारांपैकी ९८ खासदारांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद असल्याचे या प्रतिज्ञापत्रांमधून दिसून आले. म्हणजेच भाजपमध्ये ही टक्केवारी ३५ इतकी आहे.

७. दुसरीकडे काँग्रेसच्या ४४ खासदारांपैकी ८ खासदारांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे.

स्वच्छ प्रतिमेपेक्षा गुन्ह्यांची नोंद असणार्‍यांच्या विजयाची शक्यता अधिक !

देशातील लोकशाही निरर्थक ठरवणारे उमेदवार आणि त्यांना निवडून देणारी जनता !

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या उमेदवारांमध्ये स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांपेक्षा निवडणूक जिंकण्याची शक्यता दुप्पटीने अधिक असते, असे ‘एडीआर्’ने म्हटले आहे. गुन्ह्यांची नोंद असणार्‍या उमेदवारांच्या विजयाची शक्यता ही १३ टक्के असते, तर स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता अवघी ५ टक्के असते असे या संस्थेने केलेल्या अभ्यासानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now