रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना असुविधा !

गेल्या आठवड्यातील महाराष्ट्रात रेल्वेतील घटना पाहिल्या की, देशात रेल्वे प्रशासनाकडून कशाप्रकारे प्रवाशांना अयोग्य पद्धतीने सुविधा (?) देऊन त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ केला जात आहे, हे लक्षात येते. फलाट (प्लॅटफॉर्म) तिकीट घेऊन रेल्वे स्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना फलाट तिकिटाची वेळ संपल्याचे कारण देत रेल्वे प्रशासनाकडून २७० रुपये दंड आकारला गेला. फलाटाचे तिकीट काढल्यानंतर २ घंट्यांची मुदत असते. रेल्वे उशिरा आली, ही नातेवाइकांची चूक नसून ती रेल्वे प्रशासनाची आहे. एखादा नातेवाईक विनाकारण रेल्वे स्थानकावर कशासाठी अधिक वेळ थांबेल, याचा जराही विचार रेल्वे प्रशासनाने केलेला नाही. पुणे येथील शिवाजीनगर ते लोणावळा या स्थानिक (लोकल) रेल्वेला नोकरदार वर्गाचा चांगला प्रतिसाद होता; मात्र ही रेल्वे वेळेत येत नसल्याने प्रवाशांना अधिक पैसे मोजून खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. अशी परिस्थिती राज्यात इतर ठिकाणीही आढळून येते.

४ दिवसांपूर्वी थिरूवनंतपूरम्वरून गोरखपूरकडे जात असलेल्या ‘राप्तीसागर एक्सप्रेस’च्या प्रवाशांनी रेल्वेतील भोजनावळीतील अन्नातून विषबाधा झाली. रेल्वे मार्गात अनेकदा विनवणी करूनही प्रवाशांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आली नाही. नागपूर रेल्वे स्थानकावर या गाडीतील २५ प्रवाशांवर रेल्वेच्या वैद्यांनी उपचार केले. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर वैद्य न ठेवणे ही रेल्वे प्रशासनाची चूक असून ते प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत आहेत. आतापर्यंत रेल्वेतील निकृष्ट भोजन आणि अधिक प्रमाणात आकारण्यात येणारे दर यांविषयी प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाने वरवरच्या सुधारणा केलेल्या आहेत. रेल्वेतील भोजनालयाकडून दरपत्रकानुसार ५० रुपयांना येणारी भात-आमटी ८० अथवा ९० रुपयांना दिली जाते. ही प्रवाशांची लुबाडणूक आहे. तरीही याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. रेल्वेतील भिकार्‍यांची संख्याही प्रचंड आहे. अनेक भिकारी रेल्वे डब्यांतून फिरून भीक मागत असतात. याचाही प्रवाशांना त्रास होतो. तसेच गेल्या काही वर्षांपासून रेल्वेत तृतीयपंथियांकडून प्रवाशांकडे बळजोरीने पैसे मागणे, ते हिसकावून घेणे, पैसे न दिल्यास मोठ्यांनी टाळ्या वाजवून गोंधळ घालणे, अशा प्रकारांत वाढ झाली आहे. प्रतिदिन रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची लुबाडणूक आणि प्रवाशांना त्रास देण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. रेल्वेतील या समस्या असतांना शासनकर्ते मात्र प्रचंड खर्चिक ‘बुलेट ट्रेन’च्या मागे आहेत. त्याऐवजी प्रवाशांच्या समस्या गतीने सोडवल्यास जनता प्रशासनाचे आभार मानेल, हे मात्र निश्‍चित !

– श्री. सचिन कौलकर, देवद आश्रम, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF