वडिलांच्या आजारपणाच्या कालावधीत साधक आणि संत यांच्या माध्यमातून पदोपदी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१८ या कालावधीत बाबा आजारी असल्याने आम्ही पुण्याला होतो. बाबांचे आजारपण, त्यांच्या वैद्यकीय उपचारांत आलेल्या अडचणी, त्या वेळी आलेल्या अनुभूती, साधकांनी केलेले साहाय्य आणि संतांची अनुभवलेली प्रीती यांविषयी पुढे दिले आहे.’ – कु. दीपाली आणि श्री. राम होनप

आसंदीत बसलेले पू. पद्माकर होनप मागे उभे असलेले डावीकडून श्री. सुरेंद्र (मोठा मुलगा), कु. दीपाली (मुलगी) आणि श्री. राम (धाकटा मुलगा)

१. वडिलांची प्रकृती बरी नसल्याचे कळल्यावर ‘त्यांना काहीतरी गंभीर आजार झाला असावा आणि त्यांच्या सेवेसाठी आपल्याला जायला लागेल’, असे विचार मनात येणे आणि दुसर्‍या दिवशीच पुणे येथे जाण्यास निघणे

‘५.८.२०१८ या दिवशी बाबांची प्रकृती बरी नसून त्यांना पुणे येथील रुग्णालयात भरती केले असल्याचे मला रामकडून कळले. बाबा आतापर्यंत कधीही आजारी पडले नव्हते. या वेळी ‘त्यांना काहीतरी गंभीर आजार झाला असावा आणि त्यांच्या सेवेसाठी आपल्याला जायला लागेल’, असे विचार माझ्या मनात येत होते. त्याप्रमाणे ६.८.२०१८ या दिवशी आम्ही (मी आणि राम) रामनाथीहून पुण्याला जायला निघालो.’ – कु. दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. वडील वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती असतांना त्यांच्या सेवेसाठी पुणे येथे जाण्यापूर्वी साधिका आणि तिचा भाऊ तापातून बरे होणे

‘३.८.२०१८ या दिवशी बाबा पुणे येथील रुग्णालयात उपाचारासाठी भरती झाले होतेे. हे आम्हाला दोन दिवसांनी समजले. त्या आधी दीपालीताई आणि मी तापाने रुग्णाईत होतो. बाबांकडून ते रुग्णाईत असल्याचे आम्हाला समजले. त्या वेळी आम्ही दोघेही तापातून बरे झालो होतो. त्यामुळे दोघांना बाबांच्या सेवेसाठी गोव्याहून पुण्याला लगेच जाता आले.’ – श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. वैद्यकीय उपचारांच्या वेळी आलेल्या अडचणी आणि देवाने केलेले साहाय्य

३ अ. वडिलांच्या बर्‍याच वैद्यकीय तपासण्या करण्यात येणे, पुष्कळ पाठपुरावा करूनही ‘सिटी स्कॅन’चा अहवाल न मिळणे आणि आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी प्रयत्न केल्यावर अहवाल मिळणे : ‘एका रुग्णालयात बाबांच्या बर्‍याच वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे ‘सिटी स्कॅन’ केले; पण पुष्कळ पाठपुरावा करूनही त्याचा अहवाल लवकर मिळत नव्हता. शेवटी आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी प्रयत्न केल्यावर अहवाल मिळाला. जो अहवाल २ दिवसांनी मिळायला हवा होता, तो ५ दिवसांनी मिळाला.

३ आ. शरिराचा जो भाग ‘सिटी स्कॅन’मध्ये येणे अपेक्षित होते, तो भाग आलेला नसल्याने पुन्हा ‘सिटी स्कॅन’ करावे लागणे आणि त्याच्या अहवालावरून ‘कोलोनोस्कोपी’ करण्याचा समादेश देण्यात येणे : तोपर्यंत बाबांचा त्रास वाढत चालला होता. तो अहवाल मिळाल्यावर ‘शरिराचा जो भाग ‘सिटी स्कॅन’मध्ये येणे अपेक्षित होते, तो भाग आलेला नाही. त्यामुळे ‘सिटी स्कॅन’ परत करावे लागेल’, असे आम्हाला समजले. बाबांचे पोट पुष्कळ मोठे झालेले असल्याने त्यांना हालचाल करायलाही त्रास होत होता. त्या अवस्थेत त्यांचे पुन्हा ‘सिटी स्कॅन’ केले आणि आधुनिक वैद्या काळे यांनी प्रयत्न केल्यावर त्याचा अहवाल मिळाला. त्यात ‘कोलोनोस्कोपी’ करण्याचा समादेश दिला होता.

३ इ. ‘कोलोनोस्कोपी’ करण्याची सुविधा रुग्णालयात नसल्याने त्यासाठी दुसर्‍या आधुनिक वैद्यांकडे जावे लागणे आणि देवाच्या कृपेने त्यासाठी चुलत भावाने त्याचे वाहन उपलब्ध करून देणे : ‘कोलोनोस्कोपी’ करण्याची सुविधा त्या रुग्णालयात नव्हती. त्यामुळे त्यांनी आम्हाला ती चाचणी करण्यासाठी एका आधुनिक वैद्यांकडे जाण्यास सांगितले. त्या आधुनिक वैद्यांचे चिकित्सालय बाबा होते त्या रुग्णालयापासून साधारण १० कि.मी. दूर होते. बाबांना त्या अवस्थेत दुसरीकडे घेऊन जाणे अवघड होते. देवाच्या कृपेने चुलत भावाने त्याचे वाहन उपलब्ध करून दिले.

३ ई. वडिलांच्या मोठ्या आतड्याच्या मध्ये एक गाठ झाली असल्याचे कळणे आणि रोगाचे निदान होण्यास आधुनिक वैद्यांनी ‘बायॉप्सी’ करण्यास सांगणे : आधुनिक वैद्यांकडे जाऊन ‘कोलोनोस्कोपी’ केल्यावर त्यांनी ‘बाबांच्या मोठ्या आतड्याच्या मध्ये एक गाठ झाली असून त्या गाठीमुळे त्यांच्या शौचाच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे’, असे सांगितले. ‘ती गाठ कशाची आहे ?’, हे कळण्यासाठी त्यांनी ‘बायॉप्सी’ करण्यास सांगितले.

३ उ. ‘बायॉप्सी’ करण्यासाठी दुसर्‍या रुग्णालयात जाणे, ‘त्याचा अहवाल ४ – ५ दिवसांनी मिळेल’, असे त्यांनी सांगणे आणि देवाला ‘तुला अपेक्षित असे होऊ दे’, अशी प्रार्थना होणे : बाबांच्या आतड्यात झालेल्या गाठीचा नमुना घेऊन आम्ही तेथून निघालो. बाबांना रुग्णालयात नेऊन सोडले आणि तो नमुना घेऊन आम्ही दुसर्‍या एका रुग्णालयात गेलो. ते रुग्णालयही ८ ते १० कि.मी. दूर होते. तेथे आम्ही तो नमुना तपासणीसाठी दिला. त्यांनी ‘त्याचा अहवाल ४ – ५ दिवसांनी मिळेल’, असे सांगितले. बाबांचा वाढत चाललेला त्रास पहाता त्यांच्या रोगाचे निदान लवकर होऊन त्यांच्यावर लगेच उपचार होणे आवश्यक होते. आम्ही ‘तुला अपेक्षित असे होऊ दे’, अशी देवाला प्रार्थना करत होतो. त्यानंतर ‘बायॉप्सी’चा अहवाल ४ – ५ दिवसांनी मिळेल’, असे आम्ही आधुनिक वैद्या काळे यांना सांगितले. त्यावर त्यांनी त्यांच्या ओळखीने त्या रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना अहवाल लवकर देण्यास सांगितले.

३ ऊ. रुग्णालयातील आधुनिक वैद्यांची दायित्वशून्यता ! : रुग्णालयातील प्रमुख आधुनिक वैद्यांनी ‘मी सकाळी राउंडला येईल, तेव्हा रुग्णाच्या नातेवाइकांना मला भेटायला सांगा’, असा निरोप आम्हाला दिला. त्याप्रमाणे आम्ही सकाळी त्यांची वाट पाहिली. ते आले आणि निघून जात होते. आम्ही त्यांच्या मागे पळत जाऊन त्यांना बाबांविषयी विचारले. तेव्हा त्यांनी ‘त्यांना ९० टक्के कर्करोग झाला आहे. त्यामुळे त्यांचे दोन दिवसांनी शस्त्रकर्म करू; पण ‘बायॉप्सी’चा अहवाल आल्यावर खरे काय, ते कळेल’, असे आम्हाला सांगितले. प्रमुख आधुनिक वैद्यांनी वरीलप्रमाणे सांगूनही तेथील निवासी आधुनिक वैद्य ‘बाबांना जंतूसंसर्गामुळे गाठ झाली आहे’, असे उडवाउडवीचे उत्तर देत होते.

३ ए. रुग्णालयातील ढिसाळ कारभार पाहून वडिलांना दुसर्‍या रुग्णालयात हालवण्यात येणे आणि सुटीचा दिवस असूनही त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळणे : या रुग्णालयातील ढिसाळ कारभार पाहून आधुनिक वैद्या काळे, आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे आणि आधुनिक वैद्य प्रवीण मेहता यांच्या समादेशाने बाबांना दुसर्‍या दिवशीच दुसर्‍या रुग्णालयात हालवले. ‘त्या दिवशी १५ ऑगस्ट असल्याने त्या रुग्णालयात बाबांना भरती करवून घेतील कि नाही ?’, असे वाटले; पण देवाच्या कृपेने बाबांना रुग्णालयात भरती करवून घेतले.

३ ऐ. मोठ्या आतड्याचा कर्करोग झाल्याचे निदान होणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘परवाच बाबांचे शस्त्रकर्म करू’, असे सांगणे : तोपर्यंत ‘बायॉप्सी’चा अहवाल मिळाला आणि बाबांना मोठ्या आतड्याचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेथे आधुनिक वैद्या ज्योती काळे यांच्या ओळखीचे तज्ञ आधुनिक वैद्य मिळाले. त्यांनी बाबांना तपासून ‘परवाच (१७.८.२०१८ या दिवशी) बाबांचे शस्त्रकर्म करू’, असे सांगितले.

४. वडिलांनी स्वतःला झालेल्या आजाराविषयी साधक आणि नातेवाईक यांना कळवायला सांगणे, ते स्वतःकडे साक्षीभावाने पहात असल्याचे जाणवणे आणि भेटायला आलेल्या नातेवाइकांना त्यांनी साधना सांगणे

बाबांनी स्वतःला झालेल्या आजाराविषयी साधक आणि नातेवाईक यांना कळवायला सांगितले. त्या वेळी ‘ते स्वतःकडे साक्षीभावाने पहात आहेत’, असे आम्हाला जाणवले. ‘ते आजारी आहेत’, असे त्यांच्याकडे पाहून वाटत नव्हते. ते आनंदी असलेले पाहून नातेवाइकांना आश्‍चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘त्यांना काय झाले आहे ?’, हे तुम्ही त्यांना सांगितले आहे का ? ते इतके आनंदी कसे ?’’ मग बाबांनी त्यांना साधनेचे महत्त्व सांगितले आणि नामजप करायला सांगितला.

५. दुसर्‍या रुग्णालयात भरती केल्यावर शस्त्रकर्मासाठी वडिलांच्या तपासण्या करण्यात येणे आणि त्यांनी शस्त्रकर्मासाठी शस्त्रक्रियागारात हसत-हसत जाणे

१५.८.२०१८ या दिवशी बाबांना दुसर्‍या रुग्णालयात भरती केले. त्या दिवशी आणि दुसर्‍या दिवशी शस्त्रकर्मासाठी त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. १७.८.२०१८ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता बाबांना शस्त्रकर्मासाठी शस्त्रक्रियागारात नेण्यात आले. त्या वेळी बाबा स्थिर होते. ‘त्यांचे शस्त्रकर्म होणार आहे’, असे त्यांच्या तोंडवळ्यावरून वाटत नव्हते. ते नेहमीप्रमाणे हसत-हसत शस्त्रक्रियागारात गेले.

६. शस्त्रकर्माच्या वेळी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

६ अ. शस्त्रकर्माच्या वेळी साधिका आधुनिक वैद्या ज्योती काळे यांना शस्त्रक्रियागारात उपस्थित रहाण्याची अनुमती मिळणे, त्रास जाणवल्यास त्यांनी प्रार्थना करणे आणि त्यानंतर तो त्रास दूर झाल्याची अनुभूती येणे : शस्त्रकर्माच्या वेळी साधिका आधुनिक वैद्या ज्योती काळे यांना शस्त्रक्रियागारात उपस्थित रहाण्याची अनुमती मिळाली. ज्या वेळी त्रास जाणवत होता, त्या वेळी आधुनिक वैद्या काळे प्रार्थना करत होत्या आणि त्यानंतर त्यांना तो त्रास दूर झाल्याची अनुभूती येत होती. शस्त्रकर्म चालू असतांना आधुनिक वैद्यांनी डॉ. ज्योती काळे यांना विचारले, ‘‘यांना एवढा त्रास असूनही हे शांत कसे ?’’ यावरून साधनेचे आणि गुरुकृपेचे महत्त्व लक्षात आले.

६ आ. शस्त्रकर्माच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे आणि शस्त्रकर्मातील अडथळे दूर होण्यासाठी आपोआप प्रार्थना होणे : शस्त्रकर्माच्या कालावधीत मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते. शस्त्रकर्माच्या कालावधीत बाबांवर वाईट शक्तींची आक्रमणे होत होती; पण तेथे त्यांचे अस्तित्व असल्यामुळे वाईट शक्तींचा जोर न्यून होत होता. शस्त्रकर्मातील अडथळे दूर होण्यासाठी माझ्याकडून अधून-मधून आपोआप प्रार्थना होत होत्या. – राम

६ इ. महामृत्युंजय मंत्राचा जप करतांना मधेच डोक्यावर पुष्कळ दाब जाणवणे, काही वेळ चांगले जाणवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे आणि आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी ‘पुष्कळ अडथळे येत होते आणि देवाच्या कृपेने ते दूर होत होते’, असे सांगणे : बाबांचे शस्त्रकर्म चालू असतांना मला त्यांच्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यास सांगितले होते. मंत्रजप करतांना मधेच माझ्या डोक्यावर पुष्कळ दाब जाणवत होता. नंतर काही वेळ मला चांगले वाटत होते. त्यानंतर काही वेळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी मोठे युद्ध चालू असून युद्धातील स्थितीनुसार ‘चांगले वाटणे किंवा डोक्यावर दाब जाणवणे’, अशा अनुभूती मला येत होत्या. बाबांचे शस्त्रकर्म ३.१५ घंटे चालू होते. त्या कालावधीत मला सतत वरीलप्रमाणे जाणवत होते.

त्यानंतर शस्त्रकर्माच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी सांगितले, ‘‘पू. काकांच्या शस्त्रकर्माच्या वेळी पुष्कळ अडथळे येत होते; पण देवाच्या कृपेने ते दूर होत होते.’’

– कु. दीपाली होनप

६ ई. देवीने कमळ उमलल्याचे दृश्य दाखवून वडिलांचे शस्त्रकर्म यशस्वी होणार असल्याचा संकेत देणे आणि प्रत्यक्षातही शस्त्रकर्म यशस्वी होणे : ‘बाबांचे शस्त्रकर्म गुंतागुंतीचे होते. शस्त्रकर्म चालू झाल्यावर अडीच ते तीन घंट्यांनी मला सूक्ष्मातून देवीचे कमळ उमलतांना दिसले. ‘त्याद्वारे देवीने शस्त्रकर्माला यश येणार असल्याचे संकेत मला दिले आहेत’, असे मला जाणवले. प्रत्यक्षातही देवाच्या कृपेने बाबांचे शस्त्रकर्म यशस्वी झाले.’ – श्री. राम होनप

६ उ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘शस्त्रकर्म झाले का ?’, असे विचारले असल्याचे साधिकेने भ्रमणभाषवरून सांगणे आणि त्यानंतर ५ मिनिटांनी शस्त्रकर्म पूर्ण झाल्याचे समजणे : ‘सायं. ७.१० वाजता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘शस्त्रकर्म झाले का ?’, असे विचारले असल्याचे साधिकेने भ्रमणभाषवरून सांगितले आणि सायं. ७.१५ वाजता शस्त्रकर्म पूर्ण झाल्याचे समजले, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर शस्त्रकर्माच्या वेळी सूक्ष्मातून उपस्थित होते आणि त्यांच्या कृपेनेच शस्त्रकर्म यशस्वी झाल्याचे आम्हाला जाणवले. शस्त्रकर्म चांगले झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

७. शस्त्रकर्मानंतर ‘बाबा एका आनंदी लहान बाळासारखे झोपलेले आहेत’, असे जाणवणे आणि ते एकदम ताजेतवाने वाटणे

शस्त्रकर्मानंतर आम्ही बाबांना बघायला अतीदक्षता विभागात गेलो. त्या वेळी ‘ते एखाद्या आनंदी लहान बाळासारखे झोपलेले आहेत’, असे आम्हाला जाणवले. शस्त्रकर्म झाल्यानंतरचा थकवा त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवत नव्हता. ते एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यानंतर त्यांना रात्री अतीदक्षता विभागात नेण्यात आले आणि त्यांच्यात सुधारणा लवकर झाल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांना परत नेहमीच्या खोलीत हालवण्यात आले.

८. शस्त्रकर्मानंतर १५ दिवस आधुनिक वैद्य असलेल्या पुतण्याच्या घरी राहिल्यावर त्याने चांगले साहाय्य करणे

पू. बाबांच्या शस्त्रकर्मानंतर ते ११ दिवस रुग्णालयात होते. त्यानंतरचे १५ दिवस पू. बाबांसमवेत आम्ही आमच्या चुलत भावाच्या घरी राहिलो. तो आणि त्याची पत्नी आधुनिक वैद्य असल्याने आम्हाला त्यांचे साहाय्य झाले. ‘त्यांच्या माध्यमातून देवच साहाय्याला आला’, असे आम्हाला जाणवले. त्या दोघांनी आमचे सर्व प्रेमाने केले.

९. ‘सनातन हे एक कुटुंब आहे’, हे देवाच्या कृपेने अनुभवता येणे

९ अ. आधुनिक वैद्यांनी ‘बाबांच्या दोन केमो पुण्यातच करा’, असे सांगितल्यावर श्री. रवींद्र अन् सौ. राजश्री धांडे यांच्या घरी रहाण्याचे नियोजन करण्यात येणे आणि त्यांनी प्रेमाने आदरातिथ्य करणे : त्यानंतर पू. बाबांचे टाके काढल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘त्यांच्या दोन केमो पुण्यातच करा’, असे सांगितले. त्यामुळे पुढे २० दिवस तरी पुण्याला रहावे लागणार होते. त्या वेळी श्री. रवींद्र आणि सौ. राजश्री धांडे या साधकांच्या घरी आमची रहाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी आणि त्यांची दोन मुले श्री. अनिकेत अन् कु. भाग्यश्री यांनी आमचे सर्वकाही पुष्कळ प्रेमाने केले. राजश्रीताईंनी पू. बाबांचे पथ्य सांभाळून त्यांची काळजी घेतली.

९ आ. पुण्याला गेल्यापासून जेवण, अल्पाहार, रहाण्याची व्यवस्था, तसेच वाहनाची सोय साधकांनी करणे : आम्ही पुण्याला गेल्यापासून आमचे जेवण, अल्पाहार आणि रहाण्याची व्यवस्था सर्वकाही साधकांनी प्रेमाने केले. पू. बाबांना रुग्णालयात नेणे-आणणे, यासाठी वाहनाची सोय साधकांनीच केली. साधकांनी आम्हाला कशाचीच उणीव जाणवू दिली नाही.

साधकांचे हे प्रेम बघून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या रूपाने सर्व ठिकाणी साहाय्य करत आहेत’, असे जाणवून भरून आले आणि ‘सनातन हे एक कुटुंब आहे’, याची प्रचीती आली.

९ इ. आधुनिक वैद्या काळे यांनीही वेळोवेळी साहाय्य केले.

१०. संतांची अनुभवलेली प्रीती !

बाबा आजारी असतांना रामनाथी आश्रमातून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आणि देवद आश्रमातील पू. रमेश गडकरीकाका, पू. भाऊ (सदाशिव) परबकाका, सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी वेळोवेळी बाबांची प्रेमाने विचारपूस केली. परात्पर गुरु पांडे महाराजही साधकांच्या माध्यमातून वेळोवेळी बाबांची प्रेमाने विचारपूस करत होते आणि त्यांना मंत्रजपही सांगत होते. या संतांच्या सत्संगाने आणि प्रीतीमुळे आम्हाला बाबांची सेवा करण्याचे बळ मिळत होते.’ – कु. दीपाली

११. वडिलांच्या सेवेत असतांना आलेल्या अनुभूती

११ अ. वडिलांच्या वैद्यकीय उपचारांतील सेवेची व्याप्ती मोठी आणि अनेक अडचणींची असूनही देवाच्या कृपेमुळे आध्यात्मिक त्रासातही सेवा करता येणे : ‘बाबांच्या उपाचारासाठी दीपालीताईला आणि मला २ मास पुणे येथे रहावे लागले. मला आध्यात्मिक त्रास असल्याने पुष्कळ थकवा असणे, प्राणशक्ती अल्प असणे, एकाग्रता अल्प असणे, धाप लागणे इत्यादी त्रास होत असतात. बाबांच्या वैद्यकीय उपचारांतील सेवेची व्याप्ती मोठी होती आणि त्यात बर्‍याच अडचणीही येत होत्या. त्यात माझी धावपळही पुष्कळ प्रमाणात झाली. असे असले तरीही देव ‘योग्य वेळी काय करायचे ?’, हे सुचवत होता, सेवा करण्यासाठी शक्ती देत होता आणि पुढील मार्ग दाखवत होता.

११ आ. सेवा करतांना स्वतःच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवणे : बाबांच्या सेवेत असतांना मला चैतन्य मिळत होते. त्यामुळे सेवा करतांना मला उत्साह जाणवत होता. सेवा करतांना अधून-मधून माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवून मला ध्यान लागल्याप्रमाणे जाणवत होते.’

– श्री. राम होनप

११ इ. ‘बाबांची सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता. ‘आपण गुरूंचीच सेवा करत आहोत’, असे मला वाटत होते.’ – कु. दीपाली होनप

१२. वडिलांच्या सेवेमुळे साधकाला झालेला आध्यात्मिक लाभ

‘दीपालीताईने परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, ‘‘आम्ही पुण्याला असतांना भाऊ नाशिकला रुग्णाईत होता. त्यासाठी मला काही दिवस नाशिकला जावे लागले. त्या कालावधीत रामने बाबांची सर्व सेवा केली.’’ हे ऐकून परात्पर गुुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘रामने शरिराने बाबांची सेवा केली आणि बाबांनी त्याला चैतन्य दिले. त्यामुळे त्यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब पूर्ण झाला आहे आणि या सेवेमुळे रामवरील त्रासदायक शक्तीचे आवरण निघून गेले आहे.’’ – श्री. राम होनप

१३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘परात्पर गुरु डॉक्टर, बाबांच्या मोठ्या आजारपणात तुम्हीच आम्हाला शारीरिक आणि मानसिक बळ दिले. तुमच्या कृपेनेच आम्ही स्थिर राहून बाबांची सेवा करू शकलो. तुमच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता !’

– कु. दीपाली आणि श्री. राम होनप (१६.१२.२०१८)

(समाप्त)


Multi Language |Offline reading | PDF