कर्करोगासारख्या दुर्धर आजारात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

आसंदीत बसलेले पू. पद्माकर होनप मागे उभे असलेले डावीकडून श्री. सुरेंद्र (मोठा मुलगा), कु. दीपाली (मुलगी) आणि श्री. राम (धाकटा मुलगा)

१. आजाराचा घटनाक्रम

१ अ. ५ – ६ दिवस शौचाला न होणे आणि अन्नाचे पचन होत नसल्याने पोट फुगणे : ‘मला बर्‍याच वर्षांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. त्यावर औषधे चालू होती. जुलै २०१८ मध्ये मला होणार्‍या त्रासाचे प्रमाण वाढले. मला सलग ५ – ६ दिवस शौचाला झाले नाही. मी घेेतलेल्या अन्नाचे पचन होत नसल्याने माझे पोट फुगत असे. त्यामुळे मी खाणे बंद केले.

१ आ. रुग्णालयात भरती होणे आणि आधुनिक वैद्यांनी औषधे देऊनही परिणाम न होता उलट त्रास वाढणे : आधुनिक वैद्य प्रवीण मेहता यांनी मला पुणे येथील एका रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. ३.८.२०१८ या दिवशी मी रुग्णालयात भरती झालो. तेथील आधुनिक वैद्यांनी मला शौच होण्यासाठी औषधे दिली; पण त्याचा उपयोग झाला नाही. उलट माझा त्रास वाढला.

१ इ. वैद्यकीय चाचणी केल्यावर आतड्याचा कर्करोग झाल्याचे निदान होणे : माझ्या वैद्यकीय चाचण्या झाल्या. त्यात काही आढळले नाही. नंतर ‘सिटी स्कॅन’ करण्याचा निर्णय झाला. ‘सिटी स्कॅन’चा अहवाल येण्यास विलंब होत होता. आधुनिक वैद्या ज्योती काळे यांच्या साहाय्याने अहवाल मिळाले. त्यानंतरच्या वैद्यकीय तपासणीत मला मोठ्या आतड्याचा कर्करोग झाल्याचे निदान झाले.

१ ई. दुसर्‍या रुग्णालयात शस्त्रकर्म होणे : आधुनिक वैद्य काळे, आधुनिक वैद्य मेहता आणि आधुनिक वैद्य मराठे यांच्या सांगण्यानुसार दुसर्‍या रुग्णालयात माझे शस्त्रकर्म करण्याचे ठरले. १७.८.२०१८ या दिवशी माझे शस्त्रकर्म झाले.

२. कर्करोग झाला असण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना !

३.८.२०१८ या दिवशी आधुनिक वैद्य मेहता यांनी मला रुग्णालयात भरती व्हायला सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘मला काहीतरी रोग झाला आहे.’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मला कर्करोग झाला आहे.’ ‘ईश्‍वराने मला ही पूर्वसूचना दिली होती’, हे माझ्या नंतर लक्षात आले.

३. आजारपणात देवाने विविध माध्यमांतून केलेले साहाय्य

३ अ. नातेवाइकांनी केलेले साहाय्य

१. शस्त्रकर्माच्या वेळी माझा मुलगा श्री. सुरेंद्र आणि बहीण सौ. मीनाक्षी देव यांनी माझ्यासाठी महामृत्युंजय जप केला.

२. एका पुतण्याने एकदा माझ्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. शस्त्रकर्मानंतर मी १५ दिवस दुसर्‍या पुतण्याकडे राहिलो. त्यानेही माझी चांगली सेवा केली.

३ आ. साधकांनी केलेले साहाय्य

१. मी पुणे येथील रुग्णालयात भरती झाल्याचे कुणालाही कळवले नव्हते. माझी मुलगी दीपाली आणि मुलगा राम यांनाही मी रुग्णालयात असल्याचे दोन दिवसांनी कळवले. त्यानंतर ते दोघेही लगेचच पुण्याला आले. त्या दोघांनी माझी चांगल्या प्रकारे सेवा केली.

२. पुण्याच्या जिल्हासेविका सौ. मनीषा पाठक यांनी चांगल्या प्रकारे साधकांचे नियोजन केले. त्यामुळे आम्हाला कसलीही अडचण आली नाही.

३. देवद आश्रमातून पुणे येथे बसने आल्यावर आम्ही लगेचच चारचाकी वाहनाने रुग्णालयात पोहोचलो. पुणे येथील साधक श्री. पाटील आम्ही पुणे येथे पोहोचण्यापूर्वीच चारचाकी घेऊन आले होते.

४. रुग्णालयात एक साधिका होती. तिने ‘आम्ही सनातनचे साधक आहोेत’, हे ओळखले. तिने माझा केसपेपर लवकर जमा करून घेतला. त्यामुळे मी रुग्णालयात लवकर भरती होऊ शकलो.

५. देवद आश्रमातून श्री. अंभोरेकाका मला साहाय्य करण्यासाठी आले होते. त्यांनी रात्री जागून माझी सेवा केली.

६. साधक प्रतिदिन रुग्णालयात जेवणाचा डबा आणत. ते मला प्रेमाने ‘आज काही खाल्ले का ?’, असे विचारत असत.

७. एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात जातांना देवद आश्रमातून श्री. उदय खानविलकरकाका माझ्या साहाय्यासाठी आले होते. त्यांनीही माझी प्रेमाने सेवा केली.

८. शस्त्रकर्म झाल्यानंतर मी साधक श्री. रवींद्र धांडे यांच्याकडे १५ दिवस राहिलो. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनीही प्रेमाने माझी सेवा केली.

३ इ. आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी केलेले साहाय्य

१. मी एका रुग्णालयात भरती झाल्यापासून ते दुसर्‍या रुग्णालयात जाईपर्यंत त्या प्रतिदिन मला भेटत होत्या. त्या तेथील आधुनिक वैद्यांच्या संपर्कात राहून ‘प्रकृती कशी आहे ?’, याविषयी विचारपूस करत. त्या मला ‘पुढील वैद्यकीय उपचार कसे असतील ?’, तेही सांगत. माझ्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्याचा अहवाल त्या प्रतिदिन पहात असत. माझा ‘सिटी स्कॅन’ चाचणीचा अहवाल ४- ५ दिवस होऊनही मिळत नव्हता. त्यांनी पाठपुरावा करून तो अहवाल मिळवून दिला. त्या अहवालानुसार रोगाचे निदान झाले. नंतर लवकर निर्णय घेऊन माझे शस्त्रकर्म करण्यात आले.

२. माझ्या शस्त्रकर्माच्या वेळी त्या उपस्थित होत्या. मला भूल दिल्यानंतर माझ्या नाकातून पोटात नळी घालायची होती; परंतु ती काही केल्या आत जात नव्हती. त्या तेथील आधुनिक वैद्यांना म्हणाल्या, ‘‘मी नळी घालते’’; परंतु तेथील आधुनिक वैद्यांनी त्यांना अनुमती दिली नाही. नंतर आधुनिक वैद्या काळे यांनी माझ्या हाताला स्पर्श करून संत भक्तराज महाराज यांना प्रार्थना केली. त्यानंतर नळी आत गेली.

३ ई. संतांचे लाभलेले साहाय्य

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी माझ्या आजारावर मला मंत्रजप सांगितले.

२. माझ्या शस्त्रकर्माच्या वेळी देवद आश्रमातील सर्व संतांनी माझ्यासाठी प्रार्थना केली.

४. आलेल्या अनुभूती

अ. १७.८.२०१८ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता आधुनिक वैद्यांनी मला शस्त्रकर्म करण्यासाठी पटलावर घेतले. त्यानंतर ‘शस्त्रकर्म कधी झाले ?’, ते मला समजलेच नाही.

आ. माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. माझ्यावर शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य मला म्हणालेे, ‘‘तुम्ही इतके स्थिर कसे ?’’

इ. माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर नातेवाइक मला भेटायला आले. त्यांना माझ्याकडे बघून ‘माझे शस्त्रकर्म झाले आहे’, असे वाटतच नव्हतेे.

ई. आधुनिक वैद्यांनी मला दोन वेळा पुणे येथे केमोथेरेपीचे उपचार घ्यायला सांगितले. हे उपचार केल्यावरही मला कोणताच त्रास झाला नाही. नंतर मी रामनाथी आश्रमात आलो. तेथे माझे केमोथेरेपीचे उपचार चालू आहेत; पण मला कोणताही त्रास होत नाही.

हे केवळ गुरुदेवांच्या कृपेने झाले. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– (पू.) श्री. पद्माकर होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF