६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. जिज्ञासा पाटील !

कु. जिज्ञासा जितेंद्रकुमार पाटील हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. जिज्ञासा पाटील

१. वय १ ते ६ मास

‘बाळाची त्वचा चैतन्यमय आणि गुलाबी दिसत असे. बाळाकडे पाहून आनंद जाणवत असे.

२. वय ६ मास ते १ वर्ष

अ. जिज्ञासा सर्व कृती पटपट करायला शिकली, उदा. एका कुशीवर होणे, पालथे होणे, रांगणे, बसणे, चालणे, बोलणे इत्यादी.

आ. बोलायला लागल्यावर तिने प्रथम ‘गँ’, ‘गणपति’, आणि ‘विठ्ठल’ हे शब्द उच्चारले.

इ. परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या) छायाचित्राकडे पाहून ती ‘ओपाचे (बाप्पाचे) आजोबाबा’ असे म्हणायची.

३. वय १ वर्ष ते आतापर्यंत जाणवलेली सूत्रे

३ अ. व्यवस्थितपणा : जिज्ञासा आपल्या सर्व वस्तू जागच्या जागी ठेवते. तिचे अक्षर सुवाच्य आहे.

३ आ. चिकाटी : ती शाळेतील सर्व अभ्यास प्रतिदिन चिकाटीने पूर्ण करते.

३ इ. सहनशीलता

१. ती दीड वर्षाची असतांना तिची मांडी भाजली होती, तरी ती हसत-खेळत रहात असे.

२. ती आजारी असतांनासुद्धा तिचा तोंडवळा आनंदी असतो.

३ ई. पेटी वादनाची आवड : शाळेतील एका कार्यक्रमात पेटीवादन ऐकल्यानंतर जिज्ञासाला पेटीवादनाची आवड निर्माण झाली आहे. आता गेले २ मास ती पेटीवादन शिकत आहे.

३ उ.  समंजस

१. मी सेवा करून आल्यानंतर जिज्ञासा आणि तिची धाकटी बहीण सात्त्विका दोघी मला कसलाही त्रास देत नाहीत. त्या ‘भूक लागली’ इत्यादी तक्रारी करत नाहीत.

२. खेळतांना मुलांची भांडणे होत असल्यास जिज्ञासा भांडणे सोडवते आणि ‘कोणाची काय चूक झाली ?’, हे सांगून एकमेकांची क्षमा मागायला सांगते.

३ ऊ. आईला सेवेत साहाय्य करणे

१. माझे यजमान परदेशी असतात आणि मी (सौ. सुषमा) अन् माझ्या दोन मुली (कु. जिज्ञासा आणि कु. सात्त्विका) आम्ही तिघीच येथे रहातो. जिज्ञासा मला म्हणते, ‘‘आई, तू सेवेला जा. मी सात्त्विकाला सांभाळते.’’ मी सात्त्विकाला तिच्यावर सोपवून प्रासंगिक सेवेला जाते. ती सात्त्विकाला फार चांगले सांभाळते.

२. मला सेवेला जायला मिळावे; म्हणून ती स्वतः खेळायला न जाता घरात थांबून तिच्या लहान बहिणीला सांभाळते.

३. मी सेवा करून येईपर्यंत जिज्ञासा तिची छोटी बहीण सात्त्विकाचा अभ्यास दायित्व घेऊन पूर्ण करवून घेते.

३ ए. स्थिर : तिच्या आवडीची वस्तू हरवली, तरीही ती स्थिर रहाते.

३ ऐ. सात्त्विक गोष्टींची आवड

१. तिला स्वतःला आणि इतरांना कुंकू लावायला आवडतेे.

२. ती अगदी लहान असतांना दैनिक सनातन प्रभात, देवतांची आणि संतांची छायाचित्रे, सनातनचे ग्रंथ, कापूर, पंचांग, उदबत्ती इत्यादी सात्त्विक उत्पादने गोळा करून बसायची; पण तिने कधी काहीही फाडले नाही.

३. तिला सात्त्विक रंग आणि सात्त्विक पोशाख आवडतो.

४. साधक घरी आल्यावर तिला पुष्कळ आनंद होतो. ‘साधकांनी नेहमी घरी यावे’, असे तिला वाटते. ती सर्वांना वाकून नमस्कार करते.

५. ती दूरचित्रवाणीवर कार्टून पहात नाही. ‘जय मल्हार’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ अशा मालिका तिला आवडतात आणि त्या ती पहाते.

३ ओ. देवाची आवड

१. अगदी लहान असतांना जिज्ञासा दिवसातून पुष्कळ वेळा देवघरासमोर जाऊन नमस्कार करत असे.

२. ती एक वर्षाची असल्यापासून ‘शुभं करोति’ म्हणते.

३. जिज्ञासा लहान असतांना दिवसातून ३ – ४ वेळा घंटी वाजवून देवाला नमस्कार करत असे.

४. तिला भक्तीगीते आणि भजने आवडतात.

५. जिज्ञासा लहान असतांना मंदिरात गेल्यावर मंदिराचा कळस आणि भगवा झेंडा दिसला की, हात वर करून ‘मोरया’ म्हणत असेे.

३ औ. जिज्ञासा करत असलेली साधना

१. ती लहान असल्यापासूनच ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हे नामजप करतेे.

२. सकाळी उठल्यावर अंथरुणावर नियमितपणे श्‍लोक आणि प्रार्थना म्हणून श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

३. जिज्ञासा ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन व्हावे’, यासाठी प्रार्थना करते.

३ अं. दीपावलीत ती मुलांना, ‘देवतांची चित्रे असणारे फटाके घेऊन वाजवू नका. त्याने पाप लागते’, असे सांगते.

३ क. भाव

१. ‘तिच्यासाठी पेटी आणली, तेव्हा ‘तिचे पूजन साधकांकडून करवून घ्यायचे’, असे तिने ठरवले होते आणि त्याप्रमाणे सौ. नीला देसाईकाकू घरी आल्या, तेव्हा त्यांच्याकडून आणि इतर साधकांकडून तिने पेटीचे पूजन करवून घेतले.

२. ‘ही पेटी मला परात्पर गुरुदेवांनीच दिली आहे’, असेही ती सांगते. ‘प्रत्येक वस्तू परात्पर गुरुदेवांमुळेच मिळते’, असा तिचा भाव असतो.

३. पेटीवादनाचा सराव करतांना ‘परात्पर गुरुदेव माझ्या समोर बसले आहेत. तेच मला पेटीवादन शिकवत आहेत आणि त्यामुळेच त्यात मी तल्लीन होते’, असे ती सांगते.

४. ‘सर्व साधक परात्पर गुरुदेवांचेच आहेत’, असे ती म्हणते.

४. जिज्ञासाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

अ. नामजप करतांना तिला श्रीकृष्णाचे चरण दिसतात.

आ. तिला ‘परात्पर गुरुदेव तिला आशीर्वाद देत आहेत’, असे दृश्य वरचेवर दिसते. तेव्हा परात्पर गुरुदेव तिला म्हणतात, ‘तू सेवा कर, तुला फळ मिळेल.’

५. स्वभावदोष

राग येणे, ऐकण्याची वृत्ती नसणे आणि चिडचिडेपणा.’

– सौ. सुषमा जितेंद्रकुमार पाटील (आई), कराड, जि. सातारा. (२६.९.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF