भारतात पुन्हा आक्रमण केल्यास ते पाकला अडचणीचे ठरेल ! – अमेरिकेची पाकला चेतावणी

  • भारत नाही, तर अमेरिका अशी चेतावणी देत आहे, हे लक्षात घ्या !
  • पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून भारतावर पुन्हा आक्रमण होण्यापूर्वीच अमेरिका आतंकवाद्यांना नष्ट करण्यासाठी कृती का करत नाही ?

वॉशिंग्टन – पाक त्याच्या देशात सक्रीय असलेल्या जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांवर कारवाई करतो कि नाही, हे पहाणे आवश्यक आहे. स्वतःच्या क्षेत्रात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, असे पाकला वाटत असेल, तर त्याला पुन्हा कारवाई करावीच लागेल. भारतात पुन्हा आतंकवादी आक्रमण झाल्यास पाकला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत अमेरिकेने पाकला चेतावणी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका अधिकार्‍याने सांगितले की,

१. गेल्या काही दिवसांमध्ये पाकने काही आतंकवादी संघटनांची संपत्ती जप्त केली आहे. तसेच काहींना अटकही केली आहे. जैशची काही ठिकाणेही पाकने कह्यात घेतली आहेत; मात्र या व्यतिरिक्त पाकने आणखी बरेच काही करणे आवश्यक आहे.

२. हाफिज सईद आणि मसूद अझहर यांचा संदर्भ देत हा अधिकारी म्हणाला की, काही लोकांना अटक केली जाते; मात्र नंतर त्यांना सोडण्यात येते. हे आपण यापूर्वी पाहिले आहे. इतकेच नाही, तर त्यांना देशभरात उघडपणे फिरण्याची आणि देशभर सभा घेण्याची मुभा देण्यात येते. (हे माहिती आहे, तरी अमेरिका त्याविरोधात कृती का करत नाही ? – संपादक)

३. पाकने आतंकवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करावी, ही अमेरिकेची अपेक्षा आहे. अमेरिका तिच्या आंतरराष्ट्रीय सहकारी देशांना समवेत घेत आतंकवादाच्या प्रश्‍नावर पाकवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. (दबाव वाढवून पाकसारखा देश सुधारणार नाही, तर त्याला त्याच्याच भाषेत सांगण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF