हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूर्णवेळ देऊन अथवा आहे त्या स्थितीत झोकून देऊन प्रयत्न करा ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’ची भावपूर्ण वातावरणात सांगता !

डावीकडून श्री. नागेश गाडे, मार्गदर्शन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री. संदीप शिंदे

गोवा – धर्मप्रसार करण्यासाठी जे प्रयत्न करणार ते झोकून देऊन आणि मनापासून करा. आपले प्रयत्न भगवंतापर्यंत पोचलेच पाहिजेत, असा भाव ठेवून करा. मी करतो, ते देवाला कळते का, ही शंका मनात न ठेवता हिंंदु राष्ट्र-स्थापनेसाठी पूर्णवेळ देऊन अथवा आहे त्या स्थितीत झोकून देऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करा. हे प्रयत्न आपली साधना म्हणून करा. धर्मकार्य करण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने वेळ काढूनच धर्मकार्य आणि साधना करावी लागते, असे मार्गदर्शन सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केले. त्या तीन दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’च्या समारोपीय सत्रात बोलत होत्या. संतांच्या मार्गदर्शनाने या कार्यशाळेची सांगता भावपूर्ण वातावरणात झाली.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनातील महत्त्वाची सूत्रे

१. धर्मप्रसार करतांना किती संख्येने लोक आपल्यासमवेत येत आहे, याकडे न पहाता जे आले त्यांना घेऊन पुढे जाऊया. धर्मकार्यात अधिक जण सहभागी होतील हे ध्येय ठेवून त्यासाठी प्रयत्न निश्‍चितपणे करा; पण त्यातून जे येतील, ती ईश्‍वरेच्छा समजून त्यांना घेऊन पुढे कार्य करा. आपला उत्साह संख्येवर अवलंबून असायला नको. संख्या वाढली की उत्साह आणि संख्या कमी आली की निरुत्साह असे असायला नको. प्रत्येक सेवा झोकून देऊन करा आणि आनंद मिळवा. संख्येच्या विचाराने आनंद गमावू नका.

२. साधनेची ऊर्जा अनुभवा. आश्रमात कार्यरत असलेले चैतन्य ग्रहण करून लगेच कृतीला आरंभ करा. कृती करतांना ती उतावळेपणाने नको, तर तळमळीने करा. देवाने आपल्यात धर्मकार्यासाठीची तळमळ जागृत केली आहे. लवकर कृतीला आरंभ केला की, हीच तळमळ वाढत जाईल.

३. काही जणांना धर्मप्रसार जमणार नाही, असे वाटून ताण येतो. त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, जोपर्यंत कृती करत नाही, तोपर्यंत मनावर ताण असतो. उदा. वाहन चालवायला शिकण्यापूर्वी ताण असतो; पण चालवायला शिकलो की ताण नसतो. तसेच धर्मप्रसार करण्यासाठी कसे बोलायचे ते शिका, बोलण्याचा सराव करा आणि बोलण्याची कृती करा. आपल्या वाणीतून भगवंतच बोलतो, याची अनुभूती घ्या.

४. शिबिरात शिकण्याला केवळ २ टक्के महत्त्व आहे आणि ९८ टक्के महत्त्व कृतीला आहे. नियोजन करणे आणि परिपूर्ण कृती करणे, यासाठी प्रयत्न करा.

५. ‘सनातन प्रभात’मधून प्रतिदिन समाजाला दिशा मिळते. ‘सनातन प्रभात’चा अंक जे कार्य करू शकतो, ते आपण करू शकत नाही. यासाठी घरोघरी सनातन प्रभात पोहोचला पाहिजे, याचे ध्येय ठेवा. ‘सनातन प्रभात’चे अधिकाधिक वाचक बनवण्यासाठी प्रयत्न करा.

६. आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे, हे ठाऊक नाही. आपला मिनिटही वाया जायला नको. त्यामुळे ज्या वेळी समष्टी धर्मप्रसार करू शकत नाही, त्या वेळी व्यष्टी साधना करा.

७. प्रांजळपणे मनातील सांगणे, ही देखील साधनाच आहे. प्रयत्न करणे, धडपड करणे हे देवाला आवडते.

८. नामजप म्हणजे श्‍वास व्हायला हवा. श्‍वासामुळे जिवंत आहोत, तसे नामामुळे जिवंत आहोत, असे व्हायला हवे. उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक कृती करतांना नाम घ्या. असे केले की, काही काळाने मनात नामाचा संस्कार होईल. नामाने साधनेसाठी ऊर्जा मिळते. समाजात कितीही रज-तम असले, तरी या ऊर्जेमुळे आपल्याला कार्य आणि साधना करता येईल. या कृतींना प्रार्थना आणि कृतज्ञता यांची जोड द्या. याचा साधनावृद्धीसाठी लाभ होईल. केवळ कार्य नाही, तर साधना म्हणून कार्य करायचे आहे. अनेक जण साधना म्हणून कार्य करत नसल्याने कार्याला यश न मिळणे, जीवाला धोका निर्माण होणे, अशा अनेक अडचणी येतात.

९. सध्या रज-तमाचे प्रमाण अधिक आहे, म्हणून रज-तमप्रधान कृती आपण लवकर आत्मसात करतो. नाम घेऊनच मनावर नामाचा संस्कार निर्माण होतो. अमृताची गोडी एकदा चाखली की, नंतर अन्य काहीही दिले, तरी ते गोड लागत नाही. एकदा का सत्त्वगुणाचा, नामाचा आनंद अनुभवला की, रज-तमप्रधान कृतींमधील आनंद घ्यावा, असे वाटत नाही.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

श्री. गोविंद धर्मे, सांगली : आश्रमात आल्यानंतर भावजागृती सहजतेने होत होती. मंदिरामध्ये जशी सात्त्विकता अनुभवता येते, त्याहूनही अधिक सात्विकता आश्रमामध्ये अनुभवली.

श्री. सौरभ पंडित, नंदुरबार : अध्यात्म हेच खरे जीवन आहे. येथून गेल्यावर श्रीगुरूंना अपेक्षित असा साधक बनण्यासाठी प्रयत्न करेन.

सौ. पूजा राऊळ, सिंधुदुर्ग : साधना करण्यासाठी येणार्‍या अडचणींवर मात करून अधिकाधिक साधना करण्याचा प्रयत्न करेन. आश्रमात साधकांनी जे मार्गदर्शन केले, जे प्रेम दिले, तो एक प्रकारे माझ्यासाठी साक्षात्कारच आहे.

श्री. प्रकाश देशमुख, केडगाव, पुणे : आयुष्यात परमोच्च सेवाभाव आणि निस्वार्थी भाव काय असतो, हे मी सनातन आश्रमात येऊन प्रथमच अनुभवले. मी माझ्यामध्येही पालट घडवेन. माझ्या घरातील आणि समाजातील व्यक्तींनाही माझ्यातील पालट जाणवेल, असे प्रयत्न करीन. स्वतःविषयी सत्य सांगण्याचे धाडस मला या कार्यशाळेतून मिळाले. मी येथे येऊन स्वतःला धन्य समजतो. अशा कार्यशाळा या निश्‍चितच साधना करण्यासाठी प्रवृत्त करतात.

सौ. अनुजा धर्मे, सांगली : माझे एकत्र कुटुंब आहे. आश्रमात जसे शिकायला मिळाले, तसे मी माझ्या कुटुंबामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करेन. घराला आश्रम करण्याचा प्रयत्न करेन. अधिकाधिक महिलांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी वर्ग चालू करण्याचा प्रयत्न करेन, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा आणि अन्यांना शिकवण्याचा प्रयत्न करेन.

श्री. अवधूत सावंत, सिंधुदुर्ग : येथे येऊन मी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकलो. ही प्रक्रिया म्हणजे प्रारब्ध भोगण्याऐवजी ते सुलभ करणे आहे. मी लोकांसमोर येऊन प्रथमच बोलत आहे. ही स्फूर्ती मला या कार्यशाळेतून मिळाली. येथून गेल्यानंतर मी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचा प्रयत्न करेन.

श्री. नागेश गंजी, सोलापूर : आश्रमातील स्वच्छता आणि नियोजन अप्रतिम आहे. आश्रमात शेकडो साधक राहत असूनही गोंधळ नाही. येथे मी शांती अनुभवली. साधकांच्या चेहर्‍यावरील प्रसन्नता पाहून ‘आपल्यालाही असे बनायचे आहे’, असे वाटू लागले आहे. येथे येऊन दैवी अनुभूती घेतली, त्यामुळे अंतर्मुखता वाढली आहे, असे जाणवते.

श्री. प्रवीण नराल, सोलापूर : ‘सनातन आश्रमा’मध्ये आलो, हा माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’ आहे. यापूर्वी मी व्यसने करत होतो. माझ्या गावामध्ये माझे नाव वाईट म्हणून घेतले जात होते. मागील वेळी मी सनातन आश्रमात येऊन गेल्यानंतर माझ्यात आमूलाग्र पालट झाला. मी व्यसने पूर्णतः बंद केली आणि साधना करू लागलो. मी माझ्या चार-पाच मित्रांनाही साधना सांगून त्यांना साधक बनवले आहे.

श्री. रवींद्र पाटील, मुंबई : आमच्या भागातील धर्मशिक्षणवर्ग बंद झाला होता. या कार्यशाळेतून मला खूप शिकायला मिळाले, प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी गेल्यानंतर लगेच तो वर्ग पुन्हा चालू करणार आहे. कोणी आले नाही, तरी मी एकटाच तो वर्ग चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करेन.

तीन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अनेक धर्मप्रेमींनी मनोगत व्यक्त केले. ‘सनातन संस्थेवर झालेले आरोप आणि त्यांचे खंडन’, ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’, ‘वाईट शक्तींचे त्रास आणि त्यांवरील उपाय’, ‘वेळेचा वापर कसा करावा ?’, ‘बातमी कशी बनवावी?’, ‘धर्मप्रसार साहित्याचा वापर आणि व्याप्ती’ आदी अनेक विषय कार्यशाळेच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी घेण्यात आले. या कार्यशाळेत श्री. नागेश गाडे, श्री. संदीप शिंदे, कु. वृषाली कुंभार, कु. योगिता पालन, कु. सायली डिंगरे, कु. ऋतुजा शिंदे, सौ. नंदिनी चितळे आदींनी मार्गदर्शन केले.


Multi Language |Offline reading | PDF