नवी मुंबईत बारच्या बाहेरील पदपथांवर बारचालकांचे अतिक्रमण !

लोक रस्त्यावर दारू प्यायला बसत असल्याने नागरिकांना पदपथावरून चालणेही कठीण होणार आहे, हे माहीत असूनही अशा प्रकारचे बारचालकांचे अतिक्रमण खपवून घेतले जात आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांच्या उदासीनतेमुळे किंवा भ्रष्टतेमुळेच हे चालू असल्याने आता नागरिकांनाच या विरोधात आवाज उठवल्याशिवाय पर्याय रहाणार नाही !

नवी मुंबई – शहरातील काही बिअर बारकडून बाहेर पदपथांवर ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे बार म्हणजे ‘उघड्यावर मद्यपान करणारी दुकाने (ओपन बार)’ बनले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था, वाहतूक, तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. स्थानिक राजकारण्यांसह पोलिसांना हाताशी धरून ‘अर्थपूर्ण’ हितसंबंध जोपासले जात असल्याने हे सर्रास चालू आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.

बहुतांश बार मालक हे आजी-माजी पोलीस अधिकारी किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारण्यांशी संबंध असणार्‍याचे आहेत. यामुळे सर्वच साध्य करून ठोस कारवाईकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. केवळ महसूल मिळवण्याच्या हव्यासापोटी उत्पादन शुल्क विभागाकडून बारचालकांना नियमांची पायमल्ली करण्यात सवलत मिळत असल्याचे दिसून येत आहे. या सदंर्भातील अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्यानंतरही संबंधित सर्वच प्रशासनांकडून कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. एखाद्याने तक्रारीत सातत्य ठेवल्यास त्याच्यापुढे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अशीही चर्चा आहे.

बारच्या बाहेरच तळीरामांच्या दारूच्या मेजवान्या रंगत आहेत. बारमध्ये बसून पिण्यावर होणारा पैसा वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारचालकांकडून ही क्लृप्ती लढवली जात आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now