(म्हणे) ‘भारतियांना आवडत नसले, तरी चीनच्या उत्पादनांचा वापर त्यांना करावाच लागेल !’ – चीनच्या सरकारी वर्तमानपत्राचा दावा

भारताकडे उत्पादन क्षमता नाही !

  • चीनच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या देशाला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर केल्याने चीन असे म्हणण्याचे दुःसाहस करतो. हा आतापर्यंतच्या भारतीय शासनकर्त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न आहे. याला कोणताही भारतीय नाकारू शकत नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !
  • भारतियांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती असती, तर चीनला असे बोलण्याचे धाडस करता आले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. भारतीय चीनच्या उत्पादनांवर १०० टक्के बहिष्कार घालून त्यांची देशभक्ती आणि देशासाठीचा त्याग दाखवून देऊ शकतात !
  • शत्रू कितीही प्रबळ असला, तरी प्रखर राष्ट्राभिमान आणि त्याच्या जोडीला आध्यात्मिक बळ असल्यास एखादे राष्ट्र अशा शत्रूंना तोंड देऊ शकते ! भारतीय समाजाने हे यापूर्वीही अनुभवले आहे ! चीनला धडा शिकवायचा असेल, तर शासनकर्ते आणि समाज या दोघांमध्ये राष्ट्राभिमान अन् आध्यात्मिक बळ असणे आवश्यक !

नवी देहली – काही भारतीय चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत. विशेषतः जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास चीनकडून नकार देण्यात आल्यावर ती मागणी जोर धरू लागली आहे; मात्र इतक्या वर्षांत भारतीय उत्पादन क्षेत्र अद्याप मागास आहे आणि त्याच्यात स्पर्धा करण्याची क्षमता नाही. आवडो अथवा न आवडो, चीनच्या उत्पादनांचा उपयोग भारतियांना करावाच लागेल; कारण अजूनही भारताकडे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमताच नाही. त्यामुळे भारतात चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन यशस्वी ठरलेले नाही, अशी टीका चीनचे सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात करण्यात आली आहे.

या लेखात पुढे म्हटले आहे की,

१. भारताच्या अंतर्गत असलेल्या काही शक्ती भारतातील विकासकामांना रोखत आहेत.

२. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानाचा उल्लेख करत यात म्हटले आहे की, भारतीय नेत्यांनी मतांसाठी चीनचा वापर करू नये. नवी देहलीने लक्षात घ्यायला हवे की, भारतीय लोकांचे लक्ष चीनच्या दिशेने नेल्याने भारतातील अंतर्गत समस्या अजून गंभीर होतील. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांत सुधारणा होत आहे अन् चीन व्यापारातील हानीवरही काम करत आहे.

३. जर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राष्ट्रवाद दाखवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी चीनची भीती दाखवत असतील, तर ते धोकादायक ठरेल. चीनविषयीच्या सूत्रांना चटपटीत करून राजकीय कारकीर्द चमकवण्यात येऊ शकते; मात्र त्यातून देशातील अर्थव्यवस्था, उत्पादन आणि लोकांचे जीवनमान उंचावू शकत नाहीत.

४. भारतीय नेत्यांनी ट्विटरवर घोषणाबाजी करण्यापेक्षा देशाला सशक्त करण्यासाठी प्रयत्न करावा.


Multi Language |Offline reading | PDF