परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाच्या कालावधीत कोल्हापूर येथे सेवा करणारे साधक श्री. संतोष गावडे यांना आलेल्या अनुभूती

१. ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’ या ग्रंथाचे मुद्रण आरंभ झाल्यावर मनाच्या पालटणार्‍या अवस्था परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाशी संबंधित असणे

श्री. संतोष गावडे

१ अ. ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’ या ग्रंथाच्या मुद्रणाला आरंभ झाल्यावर मुद्रणालयात जातांना वाटेत महादेवाचे मंदिर लागणे, त्याचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होणे आणि दर्शन सहजतेने घेता येऊन मनाला शांत वाटणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी संकलित केलेल्या ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’ या ग्रंथाचे मुद्रण कोल्हापूर येथे करण्याचे निश्‍चित झाले. त्यानुसार २.३.२०१९ पासून ग्रंथ मुद्रण करण्याची प्रक्रिया चालू झाली. ३.३.२०१९ या दिवशी या ग्रंथाची बांधणी पहाण्यासाठी मी सायंकाळी ५.१५ वाजता मुद्रणालयात जाण्यासाठी निघालो. मुद्रणालयाच्या वाटेतच मला श्री उत्तरेश्‍वराचे (महादेवाचे) मंदिर लागले. तत्क्षणी माझ्या मनात ‘श्री महादेवाचे दर्शन घ्यावे’, असा विचार आला. हा विचार येताक्षणी मी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे या कालावधीत मंदिरात कुणीही नव्हते आणि मलाही अत्यंत शांत वाटत होते.

१ आ. मुद्रणसेवेला जातांना  ‘ॐ नम: शिवाय ।’ हा जप चालू होणे आणि मनाला अस्वस्थता आल्याने मुद्रण सेवेतील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करणे : दर्शन घेऊन मी मुद्रणसेवेसाठी जाण्यास निघालो. त्या वेळी दुचाकी चालू केल्यावर अचानक माझा ‘ॐ नम: शिवाय ।’ हा जप चालू झाला. हा जप मुद्रणालयात पोचेपर्यंत चालू होता. हा जप चालू असतांना ‘काही तरी वेगळे घडेल’, असे मला वाटत होते, तसेच माझ्या मनाची स्थितीही चलबिचल झाली होती. त्यामुळे माझ्याकडून ‘ग्रंथ मुद्रण सेवेत येणारे अडथळे दूर होऊ दे’, अशी प्रार्थना झाली.

१ इ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्याचे कळल्यावर अस्वस्थतेचे कारण लक्षात येणे आणि त्यानंतर मन शांत होऊन एका लयीत नामजप चालू होणे : हे सर्व होईपर्यंत सायंकाळी ५.४५ झाले होते. त्या वेळी मला कोल्हापूर येथे मुद्रणाशी संबंधित सेवा करणारे साधक श्री. हेमंत सातपुतेकाका यांच्याकडून ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केला आहे’, असा दूरभाष आला. त्या वेळी ‘अचानक मंदिरात जावेसे वाटणे आणि मनाची चलबिचल होणे’, या गोष्टी का होत आहेत ?, ते माझ्या लक्षात आले. यानंतर माझे मन शांत झाले आणि माझा नामजप एका लयीत चालू झाला.

२. ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’ या ग्रंथाच्या २५ प्रती देण्याचे आधी ठरलेले असतांना ऐन वेळी १०० प्रतीची मागणी करूनही त्या मिळणे !

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग करण्यापूर्वी २.३.२०१९ या दिवशी सकाळी ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’ या ग्रंथाच्या २५ प्रतींची मागणी संबंधित मुद्रणालयाकडे केली होती. ३.३.२०१९ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्याचा निरोप मला मिळाल्यावर मी मुद्रणालयाच्या मालकांना ऐन वेळी सायंकाळी ६ वाजता ‘आम्हाला रात्री ८ वाजेपर्यंत किमान १०० प्रती अत्यावश्यक आहेत’, असे सांगितले. वास्तविक सायंकाळी ६ वाजता मुद्रणसेवा बंद होते. असे असतांना मुद्रणालयाच्या मालकांनी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता मुद्रणाची वाढीव मागणी त्वरित स्वीकारली. यानंतर रात्री ८.१५ पर्यंत या मुद्रणालयाने आम्हाला १०० ग्रंथ उलब्ध करून दिले. हे ग्रंथ आम्ही त्याच रात्री देवद, पनवेल आश्रमात पाठवू शकलो आणि ४ मार्च या दिवशी सकाळी कोणताही अडथळा न येता तेथील साधकांना ते मिळाले.

– श्री. संतोष गावडे, कोल्हापूर सेवाकेंद्र (४.३.२०१९)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF