गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विश्‍वासदर्शक ठराव २० विरुद्ध १५ मतांनी जिंकला

मंत्रीमंडळात भाजपच्या १२ पैकी केवळ ५ जणांना मंत्रीपद !

राज्यात सरकार भाजपचे असले, तरी घटक पक्ष आणि अपक्ष यांच्या आधारे ते उभे असल्याने केवळ मुख्यमंत्रीपद अन् अन्य ४ मंत्रीपदे भाजपच्या आमदारांना मिळाली आहेत. हे प्रमाण ५० टक्क्यांहून अल्प आहे.

पणजी, २० मार्च (वार्ता.) – गोव्यातील भाजपप्रणीत शासनाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २० मार्च या दिवशी विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकून बहुमत सिद्ध केले. ठरावाच्या वेळी त्यांना २० आमदारांची मते प्राप्त झाली, तर १५ जणांनी विरोधात मतदान केले.

प्रारंभी विधानसभेचे हंगामी सभापती मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारसाठीच्या विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान करण्याचे उपस्थित सदस्यांना आवाहन केले. ठरावाच्या बाजूने भाजपचे  ११ आणि गोवा फॉरवर्ड, मगोप आणि अपक्ष यांचे प्रत्येकी ३ मिळून एकूण २० मते पडली, तर ठरावाच्या विरोधात काँग्रेसचे १४ आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आमदार मिळून एकूण १५ मते पडली. मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर, तसेच सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी आमदारकीचे त्यागपत्र दिल्याने गोवा विधानसभेची सदस्यसंख्या ४० वरून आता ३६ वर आली आहे.

दिवंगत सदस्यांना विधानसभेने वाहिली श्रद्धांजली !

गोवा विधानसभेने सभागृहाचे दिवंगत सदस्य मनोहर पर्रीकर, फ्रान्सिस डिसोझा आणि विष्णु वाघ यांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना रडू कोसळले. भावूक झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, मी आमदार आणि मुख्यमंत्री झालो ते स्व. मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच ! दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या ४० जवानांनाही श्रद्धांजली वाहिली.

नवीन झुवारी पुलाला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देणार ! – सुदिन ढवळीकर, उपमुख्यमंत्री

नवीन झुवारी पुलाला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या वेळी केली. पुलाच्या दोन मोठ्या खांबांवर स्व. पर्रीकर यांची मोठी छायाचित्रेही लावण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले. विधानसभेत स्व. मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहतांना उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही घोषणा केली. केंद्रशासनाला याविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

मगोपचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याचा सरकारने जारी केला आदेश

मगोपचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश सरकारने २० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी जारी केला.

भाजपचे कुंभारजुवे येथील आमदार पांडुरंग मडकईकर यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर विधानसभेत लावली उपस्थिती

जून २०१८ मध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी असलेले भाजपचे कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर विधानसभेत २० मार्चला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावासाठी उपस्थिती लावली. हंगामी सभापती मायकल लोबो यांनी आमदार मडकडईकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानाच्या वेळी आसंदीवर बसूनच हात उंचावून मतदानात सहभागी होण्याची मुभा दिली. प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ मार्च या दिवशी रात्री आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष असूनही काँग्रेस पुन्हा सत्तेपासून दूर

सध्या विधानसभेत काँग्रेस पक्षाकडे सर्वांत अधिक म्हणजे १४ आमदार आहेत, तर भाजपकडे १२ आमदार आहेत. विधानसभेची सदस्यसंख्या आता ३६ असल्याने बहुमतासाठी १९ मते मिळणे आवश्यक आहे. आजच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी गोव्यातील प्रादेशिक पक्षांनी नेहमीप्रमाणे भाजपप्रणीत शासनाला पाठिंबा दिल्याने काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा राज्यात सर्वांत मोठा पक्ष असूनही सत्ता संपादन करू शकला नाही. यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये विधनासभा निवडणूक झाली, तेव्हाही काँग्रेस राज्यात सर्वांत मोठा पक्ष असूनही सरकार स्थापन करू शकला नव्हता. यामुळे पक्षावर नामुष्की ओढवली होती.


Multi Language |Offline reading | PDF