हिंदु राष्ट्रातील भावी पिढीला घडवणारे आणि व्यापक स्तरावर कार्य करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

१. बालसाधिकेला आध्यात्मिक स्तरावर घडवणे

कु. ऐश्‍वर्या जोशी

१ अ. वळणदार अक्षरे काढायला आणि योग्य उच्चारांसह स्तोत्रे म्हणायला शिकवणे : ‘परात्पर गुरु पांडेबाबांनी मला लहानपणापासून घडवले. त्यांनी मला वळणदार अक्षरे काढायला शिकवली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करत असलेल्या काही कृती करण्यापूर्वी, उदा. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर म्हणावयाचे श्‍लोक त्यांनी माझ्याकडून मुखोद्गत करवून घेतले. श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि गणपति अथवशीर्ष, ही स्तोत्रे म्हणण्याचे महत्त्व त्यांनी माझ्या मनावर बिंबवले. त्यांनी मला ही स्तोत्रे योग्य उच्चारांसह म्हणायला शिकवली.

१ आ. अहंभावाची जाणीव करून देणे : माझा ‘मी’पणा वाढल्यावर त्यांनी मला त्याच क्षणी जाणीव करून देऊन माझ्या प्रयत्नांना दिशा दिली. ‘कर्ता-करविता भगवंतच आहे, तरीही आपण कर्तेपणा घेतो. भगवंताच्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही. असे असूनही आपण ‘आपल्या मनाप्रमाणे व्हावे’, अशी अपेक्षा करतो आणि तसे न झाल्यास आपण निराश होतो’, असे ते नेहमी सांगत.

२. परात्पर गुरु पांडे महाराज करत असलेले व्यापक स्तरावरील कार्य !

परात्पर गुरु बाबांनी साधकांना मंत्रोपाय सांगून त्यांचे दुर्धर रोग बरे केले आणि त्यांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले. परात्पर गुरु बाबा ‘राष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत. राष्ट्राचे आपत्तींपासून रक्षण व्हावे’, यासाठी मंत्र म्हणत. त्यांचे कार्य व्यापक आणि अमर्याद होते.

३. परात्पर गुरु पांडे महाराज यांना अतीदक्षता विभागात ठेवल्याचे समजल्यावर जाणवलेली सूत्रे

३ अ. ‘आपत्काळ चालू झाला आहे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी राष्ट्रावरचे संकट स्वतःवर घेतले आहे’, असे जाणवणे : परात्पर गुरु बाबांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवल्याचे समजल्यावर मला जाणवले, ‘त्यांनी राष्ट्रावरचे संकट स्वतःवर घेतले आहे. त्यांचे मंत्रसामर्थ्य आणि साधनाशक्ती यांमुळे आपण जिवंत आहोत. आपत्काळ आता चालू झाला आहे. संत साधकांवरील संकटे स्वतःवर घेत आहेत.’

३ आ. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला हातभार लावण्यासाठी साधनेची गती वाढवायला हवी’, असे वाटणे : द्वापरयुगात श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर गोप-गोपींनी त्याला काठ्या लावून हातभार लावला. तसे आता कलियुगात ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला हातभार लावण्यासाठी साधनेची गती वाढवायला हवी’, असे मला जाणवले.

३ इ. ‘परात्पर गुरु बाबांनी परात्पर गुरुदेवांवरील संकट स्वतःवर घेतले आहे’, असे वाटणे : परात्पर गुरु देशपांडेकाकांनी परात्पर गुरुदेवांचा मृत्युयोग स्वतःवर घेतला, तसे ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी परात्पर गुरुदेवांवरील संकट स्वतःवर घेतले आहे’, असे मला वाटले.’

– कु. ऐश्‍वर्या योगेश जोशी (वय १४ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (३.३.२०१९)

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाचे वृत्त समजल्यावर आलेली अनुभूती

श्री. योगेश जोशी

अग्निहोत्र करत असतांना ज्योतीत परात्पर गुरु पांडे महाराज यांचा हसरा तोंडवळा दिसणे आणि ते सर्व साधकांना आशीर्वाद देत असल्याचे जाणवणे : ‘३.३.२०१९ या दिवशी मला परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्याचे वृत्त समजले. मी अग्निहोत्र करत असतांना मला ज्योतीत परात्पर गुरु पांडे महाराज यांचा हसरा तोंडवळा दिसला. ‘ते सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसले.’

– श्री. योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज. (३.३.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक  


Multi Language |Offline reading | PDF