श्री काळभैरव पूजेच्या वेळी मारक रूपातील शक्तीची अनुभूती येऊन ‘श्री काळभैरव देव साधकांच्या साधनेतील वाईट शक्तींचे अडथळे दूर करून लोकांच्या मनात सकारात्मकता निर्माण करणार आहे’, असे जाणवणे

(सौ.) योया वाले

१. पूजेच्या वेळी देवाची मारक रूपातील शक्ती अधिक कार्यरत असणे आणि श्री काळभैरव देवाचे गण आश्रम अन् यज्ञवेदी यांच्याभोवती सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे दिसून त्यांची शक्ती वलयाकारात प्रवाहित होत असल्याचे दिसणे

‘१७.९.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री काळभैरव देवाची पूजा करण्यात आली. ‘पूजेच्या वेळी देवाची मारक रूपातील शक्ती अधिक कार्यरत आहे’, असे मला जाणवले. पूजेच्या ठिकाणी मला अनेक देवता सूक्ष्मातून प्रकट झाल्याचे दिसले, तसेच ‘श्री काळभैरव देवाचे गण आश्रम आणि यज्ञवेदी यांच्याभोवती सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे दिसले. त्यांची शक्ती संपूर्ण आश्रम आणि यज्ञवेदी यांच्याभोवती वलयाकारात प्रवाहित होत होती. पूजेतील अडथळे दूर करण्यासाठी, तसेच साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींशी युद्ध करण्यासाठी ती वातावरणात प्रवाहित होत होती.

२. साधक श्री काळभैरव देवाच्या चरणी प्रार्थना करत असतांना संतांच्या आसनाच्या मागे श्री काळभैरव देव नमस्काराच्या मुद्रेत उभा असल्याचे दिसून त्याच्या मुखावर भाव जाणवणे

थोड्या वेळाने एक संत यज्ञस्थळी आले. त्या वेळी आम्ही श्री काळभैरव देवाच्या चरणी ‘साधकांच्या साधनेतील अडथळे दूर कर. साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींशी युद्ध करून त्यांची शक्ती नष्ट कर आणि अनीतीपासून आमचे रक्षण कर’, अशी प्रार्थना करत होतो. प्रार्थना करतांना माझे लक्ष सहजच माझ्या उजव्या बाजूला गेले. तेथे संत आसंदीवर बसले होते. त्यांच्या मागे श्री काळभैरव देव नमस्काराच्या मुद्रेत उभा असल्याचे मला दिसले. श्री काळभैरवाची उंची ५ फूट ७ इंच असून त्वचा राखाडी रंगाची होती. त्याच्या मुखावर भाव जाणवत होता आणि त्याच्याभोवती लाल रंगाची मारक शक्ती होती.

३. संतांंचा हस्तस्पर्श झालेली आणि संकल्पित आहुती श्री काळभैरव देवाने स्वीकारल्याचे जाणवून ‘तो साधकांना साहाय्य, तसेच लोकांच्या मनातील नकारात्मकता न्यून करणार आहे’, असे जाणवणे

पूर्णाहुतीच्या वेळी संतांचा हस्तस्पर्श झालेली आणि संकल्पित आहुती यज्ञात अर्पण करण्यात आली. तेव्हा ही आहुती ‘श्री काळभैरव देवाने स्वीकारली असून त्याचा पुढील परिणाम होईल’, असे मला जाणवले. ‘ज्या ज्या वेळी साधकांच्या साधनेत अडथळे येतील, त्या त्या वेळी वाईट शक्तींशी युद्ध करून ते अडथळे दूर करण्यासाठी श्री काळभैरव देव साहाय्यासाठी येईल. त्यामुळे वाईट शक्तींचे अडथळे दूर होऊन साधकांचे संरक्षण होईल, तसेच लोकांचे मन आणि बुद्धी यांवरील आवरण दूर होऊन त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होईल. त्यांच्या मनातील नकारात्मकता न्यून झाल्याने ते धर्मानुसार आणि तत्त्वनिष्ठतेने वागतील. त्यामुळे अधर्माचे प्रमाण न्यून होईल !’

– सौ. योया वाले (१७.९.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now