२८.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज रुग्णालयात असतांना त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी झालेला शब्दातीत अन् भावस्पर्शी संवाद !

२५.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयातील अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यानंतर २८.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातून त्यांच्याशी दूरभाषद्वारे संवाद साधला. महाराजांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांच्या उजव्या बाजूला अर्धांग वायू झाला होता. त्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते, तरीही ते परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या बोलण्याला डोळ्यांची हालचाल करून, तसेच तोंडातून आवाज काढून प्रतिसाद देत होते. त्यांच्यातील हा शेवटचा शब्दातीत आणि भावस्पर्शी संवाद पुढे दिला आहे.

१. परात्पर गुरु पांडे महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात झालेला संवाद !

(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘लवकर या. मी तुमची वाट पहातो’, असे म्हटल्यावर परात्पर गुरु पांडे महाराजांचा गुरगुरण्याचा आवाज येणे आणि त्या माध्यमातून ते प्रतिसाद देत असल्याचे जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले : साष्टांग नमस्कार, महाराज ! आता लवकर या. तुमच्या हातात आहे. आम्ही तुमची वाट पहातो.

मी : परम पूज्य, मी त्यांच्या कानात मोठ्याने सांगते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : थांब. नको सांगूस. केवळ एवढेच सांग, ‘लवकर या. मी तुमची वाट पहातो.’

मी : गुरगुरण्याचा आवाज येत आहे. ते प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहेत.

१ आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचे ऑक्सिजन लावलेले छायाचित्र पाहून चांगली स्पंदने येत असून भाव जागृत होत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे आणि ते बोलणे ऐकून महाराजांनी अधून-मधून डोळे हलवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले : एवढीच प्रार्थना करतो. सविस्तर आपण आश्रमात आल्यावर बोलूया. आता विश्रांती घ्या. महाराज, आता ऑक्सिजन लावलेले तुमचे छायाचित्र पाहिले. ते पाहून भाव एवढा जागृत होतो, एवढी सात्त्विक स्पंदने जाणवतात की, एवढी चांगली स्पंदने कोणत्याही आजारी संतांची येणार नाहीत. ते छायाचित्र संग्राह्य झाले. आपल्याला असे कुठेच पहायला मिळाले नाही. ते छायाचित्र पाहून पुष्कळ आनंद वाटला.

मी : त्यांनी हे ऐकले. ते अधून-मधून डोळे हलवत आहेत.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढच्या बोलण्याची वाट पहातो’, असे सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले : बाबा, आपले दूरभाषवर बोलणे होते. त्या बोलण्यातून तुम्ही मला पुष्कळ शिकवता. मी त्या पुढच्या बोलण्याची वाट पहातो. गेल्या वाढदिवसाला बोलणे झाले होते. आता पुढचे बोलणे ! प.पू. दास महाराजांनी नमस्कार सांगितला आहे.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

२. परात्पर गुरु पांडे महाराज आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात झालेला संवाद !

२ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी बोलायला आरंभ केल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी डोळ्यांची हालचाल करून प्रतिसाद देणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ : बाबा, मी बिंदा बोलते. तुमच्याशी रामनाथीहून, वैकुंठातून बोलते. साष्टांग नमस्कार, बाबा !

मी : सद्गुरु ताई, ते ऐकत आहेत आणि डोळ्यांची हालचाल करत आहेत.

२ आ. ‘तुम्ही बोलू शकत नसलात, तरी तुम्ही सर्वांना आशीर्वाद देत आहात, तुमची सर्वांवर कृपा आहे आणि या स्थितीतही तुमचे पुष्कळ मोठे कार्य चालू आहे’, असे जाणवते’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ : बाबा, सर्व साधकांचा तुम्हाला साष्टांग नमस्कार ! तुम्ही आता बोलू शकत नाही, तर असे वाटते की, तुम्हाला सर्व ऐकू येत आहे आणि सर्व कळत आहे. आता या स्थितीतही तुम्ही सर्वांना आशीर्वाद देत आहात. ‘सर्वांवर तुमची कृपा आहे’, असे अनुभवता येत आहे. बाबा, ‘तुम्ही पुष्कळ आनंदाच्या स्थितीत आहात. आता या स्थितीतही तुमचे पुष्कळ मोठे कार्य चालू आहे’, असे जाणवते.

२ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सातत्याने तुमची आठवण काढतात’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी म्हटल्यावर महाराजांनी ‘हं’ असे म्हणून प्रतिसाद देणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ : परात्पर गुरु डॉक्टर सातत्याने तुमची आठवण काढतात. परम पूज्य म्हणतात, ‘‘बाबा आपल्यासाठी केवढा मोठा आधार आहे ना !’’

मी : ते ‘हं’ म्हणाले.

२ ई. ‘तुम्ही अत्युच्च आनंदाच्या टप्प्याला आहात आणि तुमच्याकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे, तसेच तुमच्या माध्यमातून मंत्रशक्ती सगळीकडे कार्यरत आहे’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यावर ‘खरखर’ आवाज काढून महाराजांनी प्रतिसाद देणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ : बाबा, तुम्हाला आता बोलायला त्रास होत आहे. तुम्ही बोलू नका. तुमच्यापर्यंत माझे बोलणे पोचत आहे. आतून तुम्ही प्रतिसाद देत आहात, तो जाणवतो. त्यामुळे बाह्य प्रतिसाद नाही दिला, तरी हरकत नाही. तुमच्या प्रकृतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आणि आतून जाणवते, ‘तुम्ही अत्युच्च आनंदाच्या टप्प्याला आहात आणि तुमच्याकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे.’ देश-विदेशात जवळपास सर्व साधकांच्या घरी, साधकांना होणार्‍या त्रासाच्या निवारणासाठी, वास्तूसाठी आणि विविध अडचणींसाठी तुमच्या आवाजातील मंत्र चालू आहेत. तुमच्या माध्यमातून मंत्रशक्ती सगळीकडे कार्यरत आहे.

मी : मधे-मधे ‘खरखर’ आवाज येत आहे, तो बाबांच्या प्रतिसादाचा आहे.

२ उ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी शब्दातीत संवाद चालू असल्याने एरव्हीपेक्षा त्यांच्याशी बोलतांना अधिक आनंद वाटत असल्याचे (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ : अश्‍विनी, एरव्हीपेक्षा आता बाबांशी बोलतांना जास्त चांगले वाटत आहे. आतापर्यंत आपण बाबांशी शब्दांच्या माध्यमातून संवाद साधत होतो. आता चालू असलेल्या शब्दातीत संवादातून अधिक आनंद वाटत आहे.

मी : हो, सद्गुरु ताई.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ : पुन्हा एकदा शिरसाष्टांग नमस्कार ! सर्व साधकांचा आपल्या चरणी भावपूर्ण नमस्कार ! पुन्हा दूरभाष करीन.’

– (पू.) सौ. अश्‍विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF