यवतमाळ येथे आचारसंहिता भंगप्रकरणी प्रेमासाई महाराज यांच्यावर गुन्हा नोंद !

सुनील नटराजन नायर उपाख्य प्रेमासाई महाराज

यवतमाळ – निवडणूक विभागाची अनुमती न घेता फेरी काढून, वाहनावर स्वत:चे छायाचित्र असलेले फलक आणि ५०-६० चारचाकी वाहने भाड्याने करून अनधिकृतपणे पैसे व्यय करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक विभागाने सुनील नटराजन नायर उपाख्य प्रेमासाई महाराज यांच्यावर १८ मार्चला रात्री ९ वाजता लोहारा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. प्रेमासाई महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून यवतमाळ-वाशीम लोकसभेसाठी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जात असतांना त्यांनी फेरी काढली.

याविषयी प्रेमासाई महाराज म्हणाले, ‘‘मी अपक्ष उमेदवारी आवेदन भरणार असल्याने कार्यकर्ते स्वत:हून समर्थनासाठी आले होते. मी त्यांच्या वाहनांवर कोणताही व्यय केला नाही. एका अपक्ष उमेदवाराच्या मागे लोकांचे मोठ्या प्रमाणात पाठबळ दिसल्याने मी निवडणूक लढू नये, यासाठी दबाब आणला जात आहे. उमेदवारी आवेदन प्रविष्ट करण्यासाठी समूहाने जाण्याविषयी पोलिसांना अनुमती मागितली होती. सकाळपासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या अनुमतीनेच उमेदवारी आवेदन भरण्यासाठी गेलो होतो.’’


Multi Language |Offline reading | PDF