पाणीटंचाईचे संकट !

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून आतापासूनच काही जिल्ह्यांत पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सोलापूर येथील उजनी धरणातील पाण्याची पातळी गेल्या वर्षीपेक्षा ६८ दिवस आधीच खालावली आहे. यंदा समाधानकारक पाणीसाठा होऊनही केवळ ५ मासांत धरणाची पाणी पातळी खालावली. पाण्यासाठी आतापासूनच संघर्ष करावा लागत आहे. यावरून ऐन उन्हाळ्यात किती चिंताजनक स्थिती असेल, याची कल्पना येते. उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या ही नवीन नसून गेली कित्येक वर्षे नागरिक याला सामोरे जातात. असे असूनही आतापर्यंत या समस्येवर ठोस उपाययोजना काढण्यासाठी ना शासन झटते ना नागरिक प्रयत्न करतात ! गेल्या ७१ वर्षांत पाण्याचे सुनियोजन करण्यात सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचे योग्य प्रयत्न झाले नाहीत, हेच यातून लक्षात येते. तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यातही शासन यशस्वी झाले नाही, असेच चित्र दिसते. याचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवत आहेत.

औद्योगिक प्रदूषणामुळे नागरिकांसाठी हक्काचा असणारा पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा पर्याय निरुपयोगी ठरत आहे. रसायनमिश्रित पाणी विनाप्रक्रिया पाण्याच्या स्रोतांमध्ये सोडले जाते. सध्या महाड (रायगड) परिसरात औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिक स्रोतांमधील पाणी खराब झाले असून ते पिण्यायोग्य राहिले नसल्याचा नागरिक आरोप करत आहेत. अशीच स्थिती राज्यभरात ठिकठिकाणी आहे. एरव्ही हिंदूंच्या सणांच्या वेळी ओरड करणारे पुरो(अधो)गामी औद्योगिक प्रदूषण होत असतांना डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प बसलेले असतात. बदलापूर (ठाणे) येथे प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाच्या अशा निष्काळजीपणामुळे पाण्यासारख्या अत्यावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो. काही मासांपूर्वी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच मुठा नदीचा कालवा फुटून लक्षावधी लिटर पाणी वाया गेले होते. प्रशासनाचा सुस्तपणा हे पाणीटंचाईमागील प्रमुख कारण असले, तरी संभाव्य संकटाची जाण ठेवून नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरायला शिकणे अपेक्षित आहे.

आता आयपीएल् क्रिकेटचे सामने चालू होतील. या सामन्यांच्या वेळी मैदानावर लक्षावधी लिटर पाणी वापरण्यात येते. पाण्यासाठी वणवण करावी लागत असतांना क्रिकेटसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी व्यय करणे योग्य आहे का ? आजपर्यंत असे अनेक सामने खेळले गेले; मात्र किती नागरिकांनी याला विरोध केला ? नागरिक निष्क्रीय राहिले, तर समस्या कशा सुटणार ? निसर्गाची कृपा असलेला भारत हे एकेकाळी एक वैभवसंपन्न राष्ट्र होते; मात्र धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीचा उदोउदो केल्यामुळे ही दु:स्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाची कृपा अखंड रहाण्यासाठी आणि समस्यांच्या निराकरणासाठी सदोष लोकशाही नव्हे, तर धर्माधिष्ठित सुराज्याची आवश्यकता आहे, हे आतातरी राज्यकर्ते लक्षात घेतील का ?

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now