६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नांदेड येथील कु. राधा रामचंद्र शेळके (वय १० वर्षे) !

कु. राधा रामचंद्र शेळके

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. राधा रामचंद्र शेळके ही एक आहे !

(‘वर्ष २०१५ मध्ये कु. राधा हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)

फाल्गुन शुक्ल पक्ष नवमी (१५.३.२०१९) या दिवशी कु. राधा रामचंद्र शेळके हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. उत्तम आकलनक्षमता

‘आम्ही नांदेड विद्यापिठात ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हे नाटक सादर केले होते. या नाटकाच्या सरावाला ती माझ्या समवेत येत होती. त्यामुळे तिला प्राचीन भारतातील सर्वच वैज्ञानिक आणि थोर ऋषि-मुनी, उदा. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, वराहमिहीर यांची माहिती झाली. आम्ही त्यांच्या ओव्या म्हणायचो. त्यामुळे तिलाही ओव्या पाठ झाल्या. तेव्हा राधाचे वय ८ वर्षे होते. आता राधा सर्वांना थोर ऋषि-मुनी आणि वैज्ञानिक यांचे कार्य अन् महत्त्व सांगते, तसेच त्यांच्या ओव्या गाऊन दाखवते.

२. ती नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, सात्त्विक चित्रांचे आणि मीठ-पाण्याचे उपाय करते.

३. शाळेतील आणि शेजारच्या मुलांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करणे

अ. शाळेतल्या किंवा शेजारच्या मुलांनी काही अयोग्य कृती केली, तर राधा त्यांना तिची जाणीव करून देते.

आ. ती उन्हाळ्याच्या सुट्टीत शेजारच्या मुलांना जमवून नामजप करायला शिकवते आणि नामजपाचे महत्त्व सांगते.

इ. ‘जेवतांना शाळेत शिकवलेली इंग्रजी प्रार्थना न म्हणता आपण श्रीकृष्णालाच मराठीत प्रार्थना केली पाहिजे’, असे ती मुलांना समजावून सांगते.

ई. ‘सर्व मुलांना घरी आईला साहाय्य करण्याची सवय लागावी’, यासाठी ती प्रयत्न करते.

४. सेवेची तळमळ

अ. १३.२.२०१८ या दिवशी महाशिवरात्र होती आणि तिला ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेला येण्यास उशीर झाला. त्या वेळी पाऊस पुष्कळ पडत होता. त्यामुळे ग्रंथप्रदर्शन बंद करावे लागले होते. आता आपल्याला सेवा करायला मिळणार नाही; म्हणून तिला रडू आले.

आ. ती शाळेत तिच्या मैत्रिणींना उटणे, कुंकू आणि कापूर या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगते अन् त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना सात्त्विक उत्पादने देते.

५. आश्रमात जाण्याची ओढ

ती एकदा रडत होती. ‘ती का रडत आहे ?’, हे मला कळेना; म्हणून मी तिला त्याविषयी विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला आश्रमाची पुष्कळ आठवण येत आहे. आपण लवकर तिकडे जाऊया.’’ त्या वेळी ‘आश्रमापासून दूर राहूनही तिची आश्रमाविषयीची ओढ अल्प झाली नाही’, हे माझ्या लक्षात आले.

६. मोठ्यांना योग्य दृष्टीकोन देऊन त्यांच्या अयोग्य कृतीची जाणीव करून देणे

राधा वर्षभर रामनाथी आश्रमात होती. नंतर ती एप्रिल २०१७ ते मे २०१८ या कालावधीत नांदेडला होती. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘ती आश्रमात राहिलेल्या कालावधीत पुष्कळ काही शिकली.’ ती आम्हाला कोणत्याही प्रसंंगात योग्य दृष्टीकोन देते, उदा. तिच्या बाबांनी एखादी वस्तू जागेवर ठेवली नाही किंवा स्वतःचा पसारा आवरला नाही, तर ती त्यांना त्याची जाणीव करून देते आणि ‘व्यवस्थितपणा आणि वेळच्या वेळी सर्व आवरणे’, हे गुण मला आश्रमात शिकायला मिळाले’, असे सांगते.

७. आई-वडिलांना त्यांच्यातील अहंची जाणीव करून देणे

अ. एकदा राधाचे बाबा म्हणाले, ‘‘मी आश्रमात गेल्यावर कोणतीही सेवा करू शकतो.’’ तेव्हा राधा म्हणाली, ‘‘बाबा, हा तुमचा अहं आहे. आश्रमात गेल्यावर प्रथम अहंनिर्मूलनासाठी स्वयंपाकघरातच सेवा करावी लागते. तुम्हालाही तिथेच सेवा देतील.’’ हे ऐकून मला आश्‍चर्य वाटले; कारण राधाला आश्रमात राहिल्याने कोणतेही विशेष प्रयत्न न करता बर्‍याच गोष्टी ठाऊक झाल्या आणि तो संस्कार तिच्या मनावर खोलवर रुजला.

आ. एकदा मी तिला म्हटले, ‘‘अगं, मी लहानपणापासून न भिता सर्वांशी बोलते. शाळेतही उत्स्फूर्तपणे भाषण करत होते.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘आई, हा अहं बरा नाही. त्यावर प्रयत्न करायला हवेत.’’

८. घरी येणार्‍या एका मुलीला आध्यात्मिक  त्रास असल्याचे कु. राधाच्या लक्षात येणे आणि तिने त्या मुलीपासून दूर राहून नामजप करणे

राधाचे बाबा श्री. रामचंद्र शेळके यांच्या समवेत नोकरी करणार्‍या एका अध्यापिकेला ५ वर्षांची एक मुलगी आहे. ती जेव्हा राधाच्या समवेत खेळते, तेव्हा तिची पुष्कळ चिडचिड होते. ती राधाला मारते, रागावते आणि कधी कधी तर पुष्कळ आक्रमकपणे वागते. राधाला पहिल्या भेटीतच लक्षात आले, ‘तिला वाईट शक्तींचा पुष्कळ त्रास आहे.’

त्या अध्यापिका काही कामासाठी आमच्याकडे येतात, तेव्हा समवेत त्या मुलीला घेऊन येतात. त्या वेळी ती खेळता-खेळताच दोन मिनिटांत आक्रमक होते. तेव्हा राधा तिच्यापासून दूर जाते आणि शांत बसते. ती कोणतीच प्रतिक्रिया देत नाही.

त्या मुलीच्या वागण्यावरून तिची आई तिला ओरडते; पण ती काहीच ऐकण्याच्या स्थितीत नसते. तिची स्थिती आवरण्यास कठीण जात असे. त्या वेळी आम्ही राधाला विचारले, ‘‘तू तिला का समजावत नाहीस ?’’ तेव्हा राधा म्हणते, ‘‘नाही. तिला समजावणे व्यर्थ आहे. ती पूर्णपणे रज-तमाच्या आवरणात असते; म्हणून आपण दूर राहून नामजप करायला हवा आणि अशा लोकांसाठी आपली ऊर्जा वाया घालवायला नको.’’

तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘राधावर आश्रमाचे खोलवर संस्कार झालेले आहेत.’ ‘मायेत असतांना कोणाला किती महत्त्व (साधनेच्या दृष्टीने) द्यायचे ?’, हे तिच्या लक्षात येते. मग आम्हीच राधाला त्या मुलीपासून दूर ठेवत होतो आणि ‘ती तिच्या सान्निध्यात रहाणार नाही’, याची कटाक्षाने काळजी घेत होतो.

९. श्रीकृष्णाप्रतीच्या भावामुळे रुग्णाईत असतांनाही शाळेतील वार्षिक उत्सवाच्या वेळी आत्मविश्‍वासाने नृत्य सादर करणारी कु. राधा !

९ अ. शाळेतील वार्षिक उत्सवाच्या वेळी कथ्थक नृत्य सादर करण्याच्या आदल्या रात्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती करण्यात येणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘हिच्यात मुळीच शक्ती नसल्याने ही नृत्य करू शकत नाही’, असे सांगणे : फेब्रुवारी २०१८ मध्ये राधाच्या शाळेत वार्षिक उत्सव होता. त्यात ती एक कथ्थक नृत्य करणार होती. ती कथ्थक शिकलेली नाही. ती केवळ बघूनच कथ्थक नृत्य करते. ज्या दिवशी तिच्या नृत्याचे सादरीकरण होते, त्याच्या आदल्या रात्रीपासून तिची प्रकृती बिघडली. तिला उलटी-जुलाब चालू झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी तिला रुग्णालयात भरती करावे लागले. आधुनिक वैद्यांनी सलाईन लावले आणि सांगितले, ‘‘ही नृत्य करू शकत नाही. हिच्यात मुळीच शक्ती नाही.’’

९ आ. राधा रडू लागल्यावर ‘आपण दोन घंट्यांनंतर तुझी स्थिती पाहून ठरवूया’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे, राधाने २ घंटे नामजप आणि प्रार्थना करणे अन् ‘मी नृत्य करते आणि पुन्हा रुग्णालयात भरती होते’, असे सांगणे : आधुनिक वैद्यांचे बोलणे ऐकून राधा रडू लागली. मग आधुनिक वैद्यांनी तिला सांगितले, ‘‘आपण दोन घंट्यांनंतर तुझी स्थिती पाहून ठरवूया.’’ राधा ते २ घंटे नामजप आणि प्रार्थना करत होती. २ घंट्यांनंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आता तुझी स्थिती स्थिर आहे; पण तुझ्यात पुष्कळ अशक्तपणा आहे. तू नृत्य करू शकत नाहीस.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मी नृत्य करते आणि पुन्हा रुग्णालयात भरती होते.’’ राधाचा हट्ट पाहून ते म्हणाले, ‘‘ठीक आहे; पण जास्त जोरात गिरक्या घेऊन नाचू नकोस.’’

९ इ. कथ्थकचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतांना आणि रुग्णाईत असतांनाही प्रामाणिकपणे अन् तन्मयतेने नृत्य करणे आणि त्याविषयी शिक्षकांनी आश्‍चर्य व्यक्त करणे : आम्ही तिला रुग्णालयातून थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेलो. तिच्या शाळेतील मुख्याध्यापिका पुष्कळ चांगल्या आहेत. त्यांनी राधाला प्रेमाने जवळ घेतले आणि सांगितले, ‘‘आम्ही तुझीच वाट बघत होतो. तू सरबत घे आणि नृत्यासाठी सिद्ध हो.’’ राधाला हे नृत्य पुष्कळ प्रिय आहे; कारण ते श्रीकृष्णासाठीचे आहे. त्यामुळे तिला ते करायचे होते. आम्ही तिला नृत्यासाठी सिद्ध केले आणि तिने नृत्य सादर केले. तिने कथ्थकचे कोणतेही प्रशिक्षण न घेता आणि रुग्णाईत स्थितीत केलेले नृत्य खरोखरच आश्‍चर्यकारक होते. ती रंगमंचावर गेल्यावर ‘ती रुग्णाईत आहे’, असे कुठेही जाणवले नाही. तिने एवढ्या प्रामाणिकपणे आणि तन्मयतेने नृत्य केले की, ‘तिची शारीरिक क्षमता अल्प आहे’, हे जाणवतच नव्हते, इतकी सहजता त्या नृत्यात होती. त्यामुळे शिक्षकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

९ ई. ‘हे नृत्य श्रीकृष्णानेच माझ्याकडून करवून घेतल्याने नृत्य करतांना मला थकवा जाणवला नाही’, असे राधाने सांगणे : तिचे नृत्य सादर होण्यापूर्वीच रंगमंचावरून तिच्या शिक्षकांनी ‘ती रुग्णाईत असूनही हे नृत्य करणार आहे’, अशी उद्घोषणा केली होती. त्यामुळे ‘तिचे नृत्य एवढे चांगले होईल’, असे कोणालाही वाटले नव्हते. मी राधाला विचारले, ‘‘तू एवढी ऊर्जा कुठून आणलीस ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी काहीच केले नाही. नृत्य करतांना मला काहीच थकवा जाणवला नाही; कारण हे नृत्य श्रीकृष्णानेच माझ्याकडून करवून घेतले.’’

या प्रसंगातून मला जाणवले, ‘तिचा नृत्याचा उद्देश ‘श्रीकृष्णभक्ती’ हा असल्याने तिला हे नृत्य आत्मविश्‍वासाने आणि सहजभावात करता आले.’

१०. जाणवलेला पालट

‘पूर्वी राधा अबोल होती. आता ती सर्वांशी बोलू लागली आहे. आता तिला कोणी काही प्रश्‍न विचारले, तर त्यांची उत्तरे ती लगेच देते.

११. अनुभूती

गोपीभावातील नृत्याचा सराव करतांना कु. राधाला तिच्या आईच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी श्री विठ्ठलाचे दर्शन होणे : गेल्या काही दिवसांपासून आम्ही दोघी कथ्थक नृत्यशैलीवर आधारित एका गोपीभावातील नृत्याचा सराव करत होतो. त्या नृत्यात गोपीचे श्रीकृष्णावर असलेले अनन्यसाधारण प्रेम आणि भक्तीचे दर्शन होते. नृत्याचा सराव करतांना राधाला माझ्या कपाळावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी श्री विठ्ठलाची मूर्ती दिसत होती. तिने मला सांगितले, ‘‘मला विठ्ठलाच्या मत्स्य-कर्णकुंडलांसकट त्याचा तोंडवळा आणि छातीपर्यंत हार घातलेला भाग दिसला.’’

१२. स्वभावदोष

वेळ वाया घालवणे आणि मनाने करणे’

– सौ. शुभांगी रामचंद्र शेळके (राधाची आई), नांदेड, महाराष्ट्र. (१५.६.२०१८)

 ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले          

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF