(म्हणे) ‘काश्मिरी हिंदूंची घरवापसी होणे आवश्यक !’ – शाह फैजल, अध्यक्ष, जम्मू-कश्मीर पीपल्स मुव्हमेंट

  • फैजल यांच्या पक्षस्थापनेच्या वेळी आयोजित कार्यक्रमात ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा देणार्‍या टोळीतील शेहला रशीदही उपस्थित होत्या ! अशा राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी मानसिकता असलेल्या लोकांसमवेत राहून फैजल काश्मिरी हिंदूंना ‘घरवापसी’ची स्वप्ने दाखवत आहेत, हे हास्यास्पद आहे !
  • काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍या धर्मांधांविषयी कळवळा असणारे, तसेच पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना ‘आदर्श’ संबोधणारे शाह फैजल यांच्या या वक्तव्यावर हिंदू कसा विश्‍वास ठेवतील ?

श्रीनगर – काश्मिरी हिंदूंची घरवापसी हे आमच्यासाठी मोठे सूत्र आहे. त्या दिशेने आम्ही काम करणार आहोत. तेे पुन्हा काश्मीरमध्ये येणे अत्यंत आवश्यक आहे. काश्मिरी हिंदूंवर अत्याचार झाले आहेत. त्या वेळी अशी स्थिती निर्माण झाली होती की, त्यांना काश्मीर सोडून जावे लागले होते. आता त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना सन्मानाने काश्मीरमध्ये परत आणण्यासाठी माझा पक्ष काश्मीरमध्ये कार्य करील, असे वक्तव्य माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी (आयएएस्) शाह फैजल यांनी बीबीसी वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. शाह फैजल यांनी नुकताच काश्मीरमध्ये ‘जम्मू-कश्मीर पीपल्स मुव्हमेंट’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

शाह फैजल यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे

१. काश्मीरमध्ये प्रशासकीय संकट नाही, तर राजकीय संकट आले आहे आणि नागरिक ते सहन करत आले आहेत. राजकीय पक्षांच्या अवसानघातकी कारभारामुळे काश्मीरची स्थिती वाईट झाली आहे. याचा सामान्य नागरिक आणि विशेषतः युवक यांना त्रास होत आहे.

२. गेल्या ७१ वर्षांत राजकीय पक्ष काश्मीरच्या लोकांशी गुलामासारखे वागले आहेत. काही राजकीय पक्ष सातत्याने काश्मीरमध्ये सत्ता राबवत आले आहेत.

३. मतदारांना धार्मिक ग्रंथांवर हात ठेवून त्यांना ‘आम्ही काम केले नाही, तरीही तुम्हाला आमच्यासमवेतच रहायचे आहे’, अशी शपथ दिली जाते. धर्माच्या नावाखाली त्यांना जखडून ठेवण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी जी परंपरा निर्माण केली आहे, ती मोडणे आवश्यक आहे.

४. येथील लोक हे गुलाम यासाठी झाले आहेत की, त्यांच्याकडे दुसरा राजकीय पर्यायच उपलब्ध नाही.

५. मी विचार केला होता की, सर्वप्रथम संसदेपर्यंत जाऊन लोकांच्या समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष आकर्षित करीन; मात्र संसदेपर्यंत कसे जायचे ?, हा प्रश्‍न होता. त्यासाठी राजकीय पक्षांत सहभागी होऊन निवडणूक लढवून तेथे जावे लागणार होते. नंतर मी नोकरी सोडून लोकांशी संपर्क केल्यावर माझ्या लक्षात आले की, मी निवडणूक लढवून संसदेपर्यंत जावे.

६. मी राजकीय पक्ष स्थापन केल्यावर अन्य राजकीय पक्षांना भीती वाटू लागली; कारण मी काश्मीरमधील कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक नाही. त्यामुळे ते माझ्यावर संघ आणि केंद्र सरकार यांचा हस्तक म्हणून टीका करत आहेत. मला देवाने एक संधी दिली आहे. त्यामुळे मी त्याचाच हस्तक बनून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन.


Multi Language |Offline reading | PDF