भ्रमणभाषवर सलग तीन दिवस ‘पबजी’ खेळ खेळल्याने २४ वर्षीय युवक बेशुद्ध !

‘पबजी’ या खेळाचे घातक परिणाम पहाता शासनाने यावर त्वरित बंदी घालणे आवश्यक आहे !

कोल्हापूर, १९ मार्च (वार्ता.) – ‘पबजी’ हा भ्रमणभाषवरील खेळ सतत तीन दिवस खेळल्याने गोंडोली (ता. शाहूवाडी) येथील पंकज लक्ष्मण पाटील (वय २४ वर्षे) हा युवक बेशुद्ध पडला. त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ कोकरूड (ता. शिराळा) येथील रुग्णालयात भरती केल्यावर काही कालावधीनंतर तो शुद्धीवर आला. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत लोकप्रिय झालेल्या आणि तरुणाईला विळखा घातलेल्या ‘पबजी’ या खेळाचेे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत.

‘पोकेमॅन गो’, ‘ब्लू व्हेल’ यांसारख्या भ्रमणभाष खेळांनी काही दिवसांपूर्वी मुलांना वेड लावले होते. त्यात आता ‘पबजी’ची भर पडली आहे. पंकज हा या खेळाच्या इतका आहारी गेला की, सलग तीन दिवस सकाळपासून ते रात्री एक ते दोन वाजेपर्यंत तो ‘पबजी’च खेळत होता. त्याला खाण्या-पिण्याचीही शुद्ध राहिली नाही. भ्रमणभाषवर खेळता-खेळता अशक्तपणा येऊन बेशुद्ध पडला.

त्याच्यावर उपचार चालू केले असता तो खेळाप्रमाणे हातवारे करत असे. एका दिवसाने त्याच्या मनावरील खेळाचा परिणाम अल्प झाल्यावर पंकज भानावर आला. खेळतांना पंकजच्या शरिरातील साखर झपाट्याने अल्प झाल्याने तो बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले.


Multi Language |Offline reading | PDF