निवडणुकांतील आर्थिक व्यवहारांवर कारवाई करण्यासाठी प्राप्तीकर विभागाकडून कडक बंदोबस्त !

मुंबई/नागपूर – लोकसभा निवडणुकीत १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा रोख आर्थिक व्यवहार अनधिकृत पद्धतीने होत असल्यास प्राप्तीकर विभागाकडून त्यावर कारवाई केली जाणार आहे. काळ्या पैशांचा वापर होऊ नये, यासाठी प्राप्तीकर विभागाच्या ५० वरिष्ठ अधिकार्‍यांसह एकूण २०० अधिकारी मुंबईतील व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. विदर्भ आणि मराठवाडा यांसह इतर विभागांतील २४ जिल्ह्यांत ‘क्यूआरटी’ (क्विक रिस्पॉन्स टीम) सिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महासंचालक (अन्वेषण) किशोर व्यवहारे यांनी १८ मार्चला पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी एका नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती केली असून ते निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांसमवेत समन्वय साधतील. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल १, जुहू विमानतळ, पवनहंस हेलिपॅड येथे ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ कार्यरत करण्यात आले आहे. प्राप्तीकर विभागाच्या कार्यालयात २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे तक्रारकर्त्याला नाव देणे बंधनकारक नाही. आतापर्यंत दोन जणांनी दूरभाषद्वारे याविषयी तक्रार केली आहे.

निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहाराची कोणतीही तक्रार करण्यासाठी नागरिक टोल फ्री क्रमांक १८००२२१५१०, दूरभाष क्रमांक (०२२)२२८२०५६२ आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९३७२७२७८२३ किंवा ९३७२७२७८२४ यावर संपर्क साधू शकतात, असे कळवण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF