नैसर्गिक गुलाल हवेत उधळल्याने होणारे लाभ

  • नैसर्गिक गुलाल हवेत उधळल्याने नेमके काय होते ?

  • नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून केलेला रंग एकमेकांवर उडवल्याने काय होते ?

श्री. निषाद देशमुख

१. नैसर्गिक गुलाल उधळल्याने होणारे स्वास्थ लाभ

‘होलिकादहन केल्यामुळे निर्माण होणारी उष्णता आणि नैसर्गिक गुलालाच्या गंधामुळे शीतकाळात जन्माला आलेले रोगजंतू मरतात. गुलालाची उधळण केल्यास तो गळ्याच्या माध्यमातून फुप्फुसांमध्ये जाऊन साठलेल्या कफाला दूर करतो. यामुळे होलिकोत्सवाचा विधी आरोग्यदृष्ट्या योग्य ठरतो.’

संदर्भ : ‘वन इंडिया’ संकेतस्थळ

२. रंगपंचमीला नैसर्गिक गुलाल उधळल्याने होणारे आध्यात्मिक लाभ

२ अ. रंगपंचमी साजरी करण्यामागील अध्यात्मशास्त्र : होलिकादहन केल्याने वायूमंडलात सगुण आणि मारक तेजतत्त्व कार्यरत होते. यामुळे वायूमंडलात वाढलेल्या वाईट शक्तींचे त्रास अल्प होतात. होलिकादहनानंतर हळूहळू तेजतत्त्वाचे कार्य मारककडून तारक आणि सगुणाकडून निर्गुण होत जाते. निर्गुण स्थितीत असलेल्या तारक तेजतत्त्वाचा लाभ होण्यासाठी रंगपंचमी साजरी केली जाते. निर्गुण तेजतत्त्व ग्रहण करणे सर्वांना शक्य होत नाही. यामुळे विभूती, गुलाल यांसारख्या तेजतत्त्वयुक्त घटकांच्या माध्यमातून निर्गुण तेजतत्त्व ग्रहण करण्याचा प्रयत्न केला जातो. तेजतत्त्वाची तारकता कार्य समाप्तीचे प्रतीक असते. यामुळे रंगपंचमीला ‘विजयोत्सव’, असेही समजले जाते.

२ आ. रंगपंचमीला नैसर्गिक गुलालाची उधळण केल्याने होणारे लाभ : ‘तारक तेजतत्त्वाचे कार्य ‘संवर्धन करणे’, असे आहे. यामुळे तारक तेजतत्त्वाची मनुष्यासहित चराचर सृष्टीला आवश्यकता असते. होलिकादहनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तारक तेजतत्त्वाचा चराचर सृष्टीला लाभ होण्यासाठी रंगपंचमीला विभूती, नैसर्गिक गुलाल आणि रंग यांची उधळण करण्याची प्रथा आहे. विभूती, गुलाल आणि रंग यांच्यातील सूक्ष्मकणांच्या साहाय्याने निर्गुण तेजतत्त्वाचे सगुण स्वरूपात प्रकटीकरण होते. यामुळे त्यांची उधळण केल्याने वायूतत्त्वाच्या साहाय्याने तारक तेजतत्त्व सर्वत्र प्रक्षेपित होते. असे केल्याने जीव, वास्तू आणि वायूमंडल यांच्यात आवश्यक त्या प्रमाणात तेजतत्त्वाचे संवर्धन होऊन त्यांना कार्य करण्यासाठी बळ मिळते. यातून हिंदु धर्मातील कृतींमागे दडलेले अध्यात्मशास्त्र लक्षात येते.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०१९, संध्याकाळी ६.१९)

नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून केलेले रंगीत पाणी एकमेकांवर उडवल्याने होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

१. होळी खेळण्यासाठी वापरले जाणारे घटक, त्यांचा काळ, संबंधित पंचतत्त्व, सगुण-निर्गुण स्तर आणि त्यांची तेजतत्त्व ग्रहण करण्याची क्षमता

टीप १ – पुरातन काळात राख आणि गुलाल यांची उधळण केली जायची. काळानुसार समष्टीची आध्यात्मिक पातळी अल्प होत गेली. यामुळे द्वापरयुगापर्यंत त्या त्या काळाच्या उन्नतांनी समष्टीला अधिकाधिक लाभ होण्याच्या दृष्टीने घटकांमध्ये पालट केला.

२. नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून एकमेकांवर उधळल्याने होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

आपतत्त्व कनिष्ठ, तर त्या तुलनेत तेजतत्त्व उच्च तत्त्व आहे. यामुळे नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळल्यावर त्यातील तेजतत्त्वाचा परिणाम आपतत्त्वावर होतो. रंगपंचमीला नैसर्गिक गुलाल मिश्रित पाणी दुसर्‍या जिवावर उडवल्यावर त्यावर पुढील परिणाम होतात.

अ. नैसर्गिक गुलाल मिश्रित पाण्यामध्ये आप आणि तेज ही दोन्ही तत्त्वे कार्यरत असतात. आपतत्त्वामुळे जिवाचा देह संवेदनशील होतो, तर तेजतत्त्वामुळे त्यातील रोगजंतू अल्प होऊन जिवाच्या संवर्धनाची क्रिया आरंभ होते. यामुळे रंगपंचमीला वायूमंडलात कार्यरत तेजतत्त्व त्याला १० टक्के अधिक प्रमाणात ग्रहण करता येते.

आ. ५० टक्क्यांहून अल्प आध्यात्मिक पातळी असलेले जीव, वास्तू आणि वायूमंडल हे पृथ्वी अन् आप या तत्त्वांशी संबंधित असतात. या घटकांच्या शुद्धीसाठी आप आणि तेज या तत्त्वांची आवश्यकता असते. नैसर्गिक गुलाल मिसळलेले पाणी यांमध्ये आप आणि तेज तत्त्वे कार्यरत असतात. यामुळे दुसर्‍यांवर पाणी उधळल्यावर त्याचा परिणाम त्यांच्यावर होऊन त्यांची शुद्धी आणि संवर्धन सहजतेने होते. यामुळे पुरातन काळापासून समष्टी स्तरावर पिचकारीने पाणी दुसर्‍यांवर उधळून रंगपंचमी खेळली जाते.

इ. आपतत्त्व हे शुद्धीसाठी सर्वांत पूरक तत्त्व आहे. यामुळे नैसर्गिक गुलाल मिसळलेले पाणी दुसर्‍या जिवावर टाकल्यावर त्याच्यावर असलेले त्रासदायक आवरण अल्प होते. त्रासदायक आवरण अल्प झाल्यावर जिवाला वायूमंडलात कार्यरत चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण करणे शक्य होते. वर्तमान कलियुगात अधिकांश जिवांवर त्रासदायक आवरण असल्याने त्यांच्या शुद्धीसाठी ही कृती काही प्रमाणात पूरक ठरते.

ई. नैसर्गिक गुलाल मिश्रित पाणी उडवणे ही कृती आघातात्मक आहे. यामुळे दुसर्‍या जिवावर पाणी उडवल्याने होणार्‍या आघातामुळे त्याच्या देहातील स्पंदने अधिक कार्यरत होऊन प्रक्षेपित होतात. या कृतीचा उद्देश ‘जिवाची देहबुद्धी अल्प करून त्याचा भाव जागृत करणे’, असा असल्याने ही कृती मंद गतीत करणे अपेक्षित आहे. वर्तमानकाळात अनेक लोक पिचकारी न वापरता बादली, रबरी पाईप अशा माध्यमांतून दुसर्‍यांवर पाण्याचा तीव्र आघात करतात. यामुळे जिवाच्या देहबुद्धीत वाढ झाल्याने वाईट शक्तींना त्याचे नियंत्रण घेणे सहज शक्य होते.

३. साधना करणारे आणि उन्नत यांनी पाण्याद्वारे रंगपंचमी खेळणे अयोग्य असण्यामागील शास्त्र

अ. तेजतत्त्वाच्या तुलनेत आपतत्त्व सगुण आहे. यामुळे गुलाल मिश्रित पाणी उडवल्यावर साधना करणार्‍या जिवाची निर्गुण तत्त्व ग्रहण करण्याची सहज क्षमता अल्प होऊन तो सगुणात येतो. अध्यात्मात सगुणातून निर्गुणात जाणे महत्त्वाचे असल्याने आध्यात्मिकदृष्ट्या ६१ टक्क्यांहून अधिक पातळी असलेल्या जिवांसाठी असे करणे अयोग्य ठरते. या पातळीला ‘गुलालाची उधळण करणे’ अधिक श्रेष्ठ ठरते.

आ. रंगपंचमी साजरी करण्यामागील आध्यात्मिक उद्देश : रंगपंचमी साजरी करण्यामागील आध्यात्मिक उद्देश ‘व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर तेजतत्त्व ग्रहण करणे’, असा आहे. गुलाल मिश्रित पाणी उडवल्याने व्यक्ती आणि समष्टी दोन्ही आपतत्त्वप्रधान होतात. यामुळे त्यांना वायूमंडलात कार्यरत तेजतत्त्व तुलनेत अल्प प्रमाणात ग्रहण होते. असे असले, तरी समष्टीची शुद्धी आणि जिवांची भावजागृती यांसाठी काही उन्नत अशी कृती करतात.

या कारणामुळे साधना करणारे आणि उन्नत यांच्यासाठी नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून केलेला रंग एकमेकांवर उडवणे अयोग्य ठरते. या तुलनेत त्यांनी राख, गुलाल इत्यादींच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी करणे अधिक श्रेष्ठ ठरते.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०१९, रात्री ७.०४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF