होळीमागील धर्मशास्त्र आणि आयुर्वेद

आज फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्दशी (२० मार्च २०१९) या दिवशी असलेल्या होळीच्या निमित्ताने…

हिंदूंनो, होळीच्या दिवशी केल्या जाणार्‍या शिवीगाळाला कोणताही धर्मशास्त्रीय आधार नसल्याचे जाणा आणि शास्त्रानुसार होळी साजरी करा !

१. होळीच्या दिवशी शिवीगाळ करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे !

‘होळीच्या दिवशी अश्‍लील शब्द उच्चारणे, शिवीगाळ करणे आदी कृती परंपरा म्हणून केल्या जातात. याला धर्मशास्त्रात आधार नाही. मुळात संस्कृत भाषेत एकही शिवी नाही. असे असतांना ‘शिवीगाळ करणे’ हा हिंदूंच्या सणाचा भाग कसा होऊ शकेल ? ‘स्मृतिकौस्तुभ’ नावाच्या धर्मग्रंथात फाल्गुन मासाच्या कृत्यांमध्ये होलिकोत्सवाविषयी पुढील माहिती आहे. हे श्‍लोक भविष्योत्तर पुराणातील आहेत. ‘भविष्योत्तर पुराण’ म्हणजे ‘भविष्य पुराणातील उत्तर पर्व’. याला स्वतंत्र पुराण म्हणून मान्यता आहे.

१ अ. मूळ संस्कृत संदर्भांमध्ये कुठेही शिवीगाळ करण्यासंबंधी उल्लेख नसणे : ‘नगरातील मुलांना त्रास देणार्‍या ‘ढुंढा’ नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा ?’, याविषयी नारद मुनि सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात. ते युधिष्ठिराला म्हणतात, ‘नगरातील सर्व लोकांना तू अभय दे. त्यामुळे ते आनंदित होतील. त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत. त्यानंतर –

सञ्चयं शुष्ककाष्ठानाम् उपलानां च कारयेत् ।
तत्राग्निं विधिवत् बुद्ध्वा रक्षोघ्नैः मन्त्रविस्तरैः ॥

ततः किलकिलाशब्दैः तालशब्दैः मनोरमैः ।
तम् अग्निं त्रिः परिक्रम्य गायन्तु च हसन्तु च ॥

जल्पन्तु स्वेच्छया लोकाः निःशङ्का यस्य यन्मनः ।
तेन शब्देन सा पापा होमेन च निराकृता ॥

अदृष्टिघातैः डिम्भानां राक्षसी क्षयम् एष्यति ।
सर्वदुष्टापहो होमः सर्वरोगोपशान्तिदः ॥
क्रियतेऽस्यां द्विजैः पार्थ तेन सा होलिका स्मृता । – भविष्योत्तरपुराण

अर्थ : वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या यांचा ढीग रचावा. तेथे रक्षोघ्न (राक्षसांना नष्ट करणार्‍या) मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करावा. त्यानंतर लहान मुलांप्रमाणे हर्षभरित शब्द करत (किलकिलाशब्दैः), मनोरम अशा टाळ्या वाजवत (तालशब्दैः मनोरमैः) अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून गाणे गावे आणि आनंदाने हसावे. लोकांनी निःशंकपणे आणि स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढे बोलावे. अशा आनंदी शब्दांनी आणि (रक्षोघ्न) होमाने लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल. हे राजा ! फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात; म्हणून या तिथीला विद्वानांनी ‘होलिका’ असे म्हटले आहे.

या श्‍लोकांत अग्नीला प्रदक्षिणा घालतांना कुठेही शिवीगाळ करावी, असा उल्लेख नाही. याउलट ‘किलकिल’, ‘मनोरम तालशब्द’ असे शब्द आले आहेत. यांचे अर्थ वर दिले आहेत.

२. ‘होळीची पूजा करावी’, असे सांगणारे संदर्भ

प्रदीपानन्तरं च होलिकायै नमः इति मन्त्रेण पूजाद्रव्य-प्रक्षेकात्मकः होमः कार्यः । – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : अग्नी प्रज्वलित केल्यावर ‘होलिकायै नमः’ या मंत्राने पूजाद्रव्ये वाहून होम करावा.

निशागमे तु पूज्येयं होलिका सर्वतोमुखैः । – पृथ्वीचंद्रोदय

अर्थ : रात्र झाल्यावर सर्वांनी होलिकेचे (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्नीचे) पूजन करावे.

३. होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र

अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।
अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती, तू आम्हाला वैभव देणारी हो.

४. होळीच्या दुसर्‍या दिवशी करायच्या धार्मिक कृती

प्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपत्सु विभूतये ।
कृत्वा चावश्यकार्याणि सन्तर्प्य पितृदेवताः ॥
वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे.

(काही पंचांगांनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी येणार्‍या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला आरंभ होतो.)

५. होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र

वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेवही वंदन करतात. त्यामुळे हे देवी, तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला वैभव देणारी हो.

६. होळीच्या दिवशीची ‘होलिका’ ही ‘होलिका’ राक्षसीण नव्हे !

भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली ‘होलिका’ ही राक्षसीण होती. होळीच्या दिवशी म्हटल्या जाणार्‍या मंत्रांमध्ये जो ‘होलिका’ असा उल्लेख येतो, तो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहे; त्या राक्षसिणीला उद्देशून नव्हे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतात; म्हणून त्या तिथीला ‘होलिका’ म्हणतात, असे वरील श्‍लोकांत आलेच आहे.

७. आयुर्वेदानुसार होळीचे लाभ

थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात. होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते. गाणे, हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF