हिंदु धर्मविरोधी पुरोगामी विचारांची होळी करा आणि सात्त्विक धर्माचरण करून होळीचा आनंद घ्या ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

नागपूर आणि जळगाव येथे पत्रकार परिषदेतील आवाहन

नागपूर

डावीकडून अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे, सौ. मंगला पागनीस, श्री. सुनील घनवट, श्री. अतुल अर्वेन्ला आणि  श्री. रमेश अग्रवाल

जळगाव

डावीकडून श्री. कपिल ठाकूर, श्री. मोहन तिवारी, श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. दत्तात्रय वाघुळदे

नागपूर – होळी म्हणजे अमंगल विचार दूर करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा सण ! पण सध्या हिंदूंचे कोणतेही सण-उत्सव आले की, काहींना पर्यावरणप्रेम अथवा प्राणीप्रेम यांचा पुळका येतो. गणेशोत्सव आला की, ‘मूर्तीदान करा’; महाशिवरात्र आली की, ‘शिवपिंडीवर दूध वाहू नका, ते गरिबांना द्या’, अशा प्रकारचा प्रचार करून स्वतःला विवेकवादी म्हणवणार्‍या ‘अंनिस’सारख्या तथाकथित पुरोगामी संघटना भोळ्या हिंदु समाजाचा बुद्धीभेद करतात. आता होळी येत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, असा अपप्रचार चालू झाला आहे. त्याला न भुलता सतत हिंदु धर्माला विरोध करणार्‍या तथाकथित पुरोगामी विचारांची होळी करा आणि धर्मशास्त्रसंमत असे सात्त्विक धर्माचरण करून होळीचा आनंद घ्या, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी १९ मार्चला पत्रकार परिषदेमध्ये केले. या वेळी धर्मजागरण मंचाचे प्रशासकीय विभागाचे महानगरप्रमुख श्री. रमेश अग्रवाल, सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे आणि नागपूर समन्वयक श्री. अतुल अर्वेन्ला हेही उपस्थित होते. जळगाव येथेही पत्रकार परिषद घेण्यात आली.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले…

१. आज मुसलमान आणि ख्रिस्ती यांना इस्लाम आणि बायबल यांची शिकवण मिळते; मात्र दुर्दैवाने बहुसंख्य हिंदु समाजाला कोणत्याही शाळा-महाविद्यालयांतच नव्हे, तर मंदिरांतही धर्माची शिकवण दिली जात नाही. परिणामी हिंदूंना हिंदु धर्मशास्त्रानुसार करावयाच्या कृतींविषयी अज्ञान असते. त्याचा अपलाभ निरीश्‍वरवादी अर्थात नास्तिकतावादी लोक घेतात आणि हिंदु समाजात गोंधळ निर्माण करतात.

२. ‘कचर्‍याची होळी करा’, अशीही बांग ते देतात; मात्र प्रत्यक्षात कचर्‍यात असणारे प्लास्टिक आदी विविध घटकांच्या ज्वलनाने किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, याचे भान विवेकवादाचा बुरखा घातलेल्यांना नसते.

३. हिंदु धर्मशास्त्र हे मुळातच पर्यावरणपूरक आहे. ‘होळीसाठी कोणतेही बहरलेले झाड तोडा’, असे कुठेही लिहलेले नाही. वाळलेल्या झाडाच्या काटक्या होळीसाठी वापराव्यात, असे धर्मात सांगितले आहे. तसेच त्या घेतांनाही झाडाला इजा होणार नाही, याची काळजी घेत झाडाची क्षमायाचना करावी, असेही धर्म सांगतो. इतका पर्यावरणाचा विचार अन्य कोणता धर्म करतो, याविषयी पुरोगाम्यांनी अभ्यास करावा !

४. ‘ख्रिसमस ट्री बनवण्यासाठी झाडे तोडू नका’, ‘चर्चबाहेर अनावश्यक मेणबत्त्या न जाळता गरिबांच्या घरात दिवे लावा’, ‘३१ डिसेंबरला दारू पिऊ नका, ते पैसे गरिबांना द्या’, ‘थडग्यांवर चादरी चढवू नका, त्या भिकार्‍यांच्या अंगावर चढवा’, ‘ईदला मातीचा बकरा करा, त्याची कत्तल करा’, ‘बकर्‍या आणि गायी यांची होणारी कत्तल थांबवा’, ‘हजयात्रेचे पैसे गरिबाला दान द्या’ अशी एकतरी चळवळ एकातरी पुरोगाम्याने कधीतरी केल्याचे ऐकिवात आहे का ?

५. हा प्रकार केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करण्याचा असून तो पुरोगाम्यांचा दांभिकपणा आहे. ‘आम्ही हिंदु आहोत, म्हणून आम्ही हिंदु धर्मातील प्रथांविषयी बोलतो’, असे म्हणणार्‍यांना मुसलमान-ख्रिस्ती हे त्यांना स्वतःचे बांधव वाटत नाहीत का ? एरव्ही सर्वधर्मसमभावाची बांग देणारे येथे का दुजाभाव करतात ? असे प्रश्‍न हिंदूंनी आता या पुरोगाम्यांना केले पाहिजेत.


Multi Language |Offline reading | PDF