शिक्षक तुम्हीसुद्धा…?

‘शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या वर्गांना शिकवणार्‍या शिक्षकांनी त्या-त्या राज्यातील ‘शिक्षक पात्रता परीक्षा’(टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाने १२ फेब्रुवारी २०१३ ला याविषयीचे परिपत्रक काढले. ही परीक्षा घेण्याचे दायित्व ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’ यांचेकडे सोपवण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने वर्ष २०१३ ते वर्ष २०१८ या कालावधीत पाच वेळा पात्रता परीक्षा घेण्यात आल्या. यात आतापर्यंत केवळ ६९ सहस्र ७०६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

राज्यातील काही शिक्षकांनी बनावट टीईटी प्रमाणपत्र बनवून नोकर्‍या प्राप्त केल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे आल्या आहेत. तसेच हे बनावट प्रमाणपत्र सिद्ध करून देणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी राज्यातील प्राथमिक अन् माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक यांना दोन मासांपूर्वी पाठवले होते. त्यानुसार प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेण्यास शाळा प्रशासन आणि शिक्षकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. मुंबई वगळता अन्य कुठल्याही शाळांमधील प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा स्मरणपत्र पाठवून याविषयी कार्यवाही करण्यास सांगितले जाईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

आतापर्यंत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणे, अधिकोषातून ऋण (कर्ज) घेणे, पदव्या प्राप्त करणे, बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणे यांसारख्या काही घटना घडल्याच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या आहेत. आज मात्र ‘शिक्षक पात्रता परीक्षे’ (टीईटी) ची बनावट प्रमाणपत्रे सिद्ध करून असंख्य शिक्षकांनी नोकरी प्राप्त करणे, हे धक्कादायक आहे. यामुळे जे गुणवत्ताधारक शिक्षक उमेदवार शिक्षक भरतीची वाट पहात आहेत त्यांचे काय ? बनावट प्रमाणपत्रे पडताळण्याची कोणतीही पद्धत शिक्षण प्रशासनाकडे नाही का ? की जाणीवपूर्वक असे प्रमाणपत्र धारण करणार्‍यांना संधी दिली गेली ? बनावट प्रमाणपत्रे सादर करूनही शिक्षकपदी नियुक्ती देणार्‍या अधिकार्‍यांवर शिक्षण आयुक्त कारवाई करणार का ? वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आलेल्या आदेशाचे कनिष्ठ अधिकारी पालन का करत नाहीत ? असे प्रश्‍न यातून निर्माण होतात. कुठे आदर्श पिढी निर्माण करणारी ‘गुरुकुल शिक्षण पद्धती’ आणि कुठे स्वत:च्या स्वार्थासाठी बनावट प्रमाणपत्रे सिद्ध करण्यास भाग पाडणारी ‘मेकॉले शिक्षण पद्धती’ ! चारित्र्यसंपन्न पिढी घडवायची असेल तर शिक्षकही चारित्र्यसंपन्न असायला हवेत. यासाठी लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती हद्दपार करून आदर्श अशी ‘गुरुकुल शिक्षण पद्धती’ अमलात आणायला हवी. त्यासाठी आवश्यकता आहे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची !’

– श्री. नीलेश पाटील, जळगाव


Multi Language |Offline reading | PDF