‘मी पण चौकीदार !’

संपादकीय

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते काही ना काही प्रयत्न करून स्वत:चे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी भाषणात ‘मी देशाचा चौकीदार आहे’, असे म्हटले होते. त्यानंतर राफेल विमाने खरेदी करण्यात घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर आहे’, असे त्यांच्या प्रत्येक भाषणात बोलण्यास प्रारंभ केला. आता नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या ‘ट्विटर हँडल’वर ‘नरेंद्र मोदी’ या नावाआधी ‘चौकीदार’ हा शब्द जोडून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असा पालट केला आहे आणि ‘भ्रष्टाचार, अस्वच्छता आणि सामाजिक दुष्प्रवृत्ती यांच्याशी लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे’, असे ट्वीट केले. राहुल गांधी यांच्या मोदी यांच्यावरील आरोपांना भाजपने एका ‘व्हिडिओ’द्वारे उत्तर दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ‘व्हिडिओ’ ट्विटरवरून प्रसारित केला आहे. या ‘व्हिडिओ’मध्ये भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास आणि सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील प्रत्येक भागातील नागरिक आणि त्यांच्या भावना ‘मै भी चौकीदार हूँ’ या ‘व्हिडिओ’मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या कृतीचे अनुकरण करत भाजपच्या अनेक नेत्यांनी स्वत:च्या ‘ट्विटर हँडल’मध्ये ‘चौकीदार’ हा शब्द जोडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक निवडणुकीला काहीतरी नवीन घोषणा करण्याचा प्रयत्न करतात आणि तिला अल्पावधीतच पुष्कळ प्रसिद्धी मिळते. ‘चौकीदार’ मोहिमेलाही पुष्कळ प्रतिसाद मिळाला आहे. चौकीदाराच्या कामाचा उल्लेख केल्यास देशाच्या संपत्तीत भ्रष्टाचार होऊ देणार नाही, हे येथे मुख्य सूत्र येते. मागील साडेचार वर्षांचा विचार करता भारतीय बँकांना सहस्रो कोटी रुपयांचा गंडा घालून विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोकसी हे आरोपी देशाबाहेर पळून गेले. त्यांचा थांगपत्ताही येथील शासनकर्त्यांना लागला नाही आणि ते पळून गेल्यावर त्यांच्या अटकेसाठी मुंगीच्या पावलांनी प्रयत्न चालू झाले. त्यामुळे हे सर्व आरोपी विदेशातही चैनीचे जीवन जगत आहेत. ‘अशाप्रसंगी चौकीदार बेसावध का रहातो ?’, ‘चोराला घर लुटून पळून द्यायचे आणि मग त्याला पकडण्यासाठी धडपड करायची, अशा चौकीदारांचा देशाला काय उपयोग ?’, ‘स्विस बँकां’मध्ये आणि अन्य विदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा आणण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. या आश्‍वासनानुसार ‘किती पैसा भारतात आणला ?’, या सूत्रांवर मौन बाळगण्यात येत आहे. भ्रष्टाचारविषयक देशातील प्रकरणांचा निकालही लवकर लागत नाही. शारदा चीटफंड घोटाळ्याचे अन्वेषण देशातील एक राज्य बंगालमध्ये करण्यास जावे, तर तेथील मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी या उपोषणाला बसून देशाच्या घटनेला वेठीस धरतात; मात्र त्यांच्याविरुद्ध सर्व अधिकार हातात असतांना कारवाई केली जात नाही. काळा पैसा नष्ट व्हावा म्हणून नोटाबंदी केली आणि नोटा पालटल्या; मात्र आता कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात वितरित होत आहेत. काही ठिकाणी त्या पकडल्या गेल्याची वृत्ते आहेत. न पकडल्या गेलेल्या किती असतील ? याला पायबंद घालता येणे शक्य झालेले नाही. अशा एक ना अनेक गोष्टींनी घर लुटले जात असतांना केवळ घोषणा देऊन, सामाजिक माध्यमांद्वारे मोहिमा राबवून खरेच काही साध्य होणार आहे का ? कि केवळ निवडणुकीपुरता ‘चमकोगिरी’चा प्रकार म्हणून याकडे पहायचे ? भ्रष्टाचार्‍यांना वठणीवर आणण्यात शासनकर्त्यांची इच्छाशक्ती अल्प पडत आहे, असे समजायचे का ? कि ते केवळ वरवरच्या उपाययोजना करून अल्पसंतुष्टतेत रममाण आहेत, असे मानायचे ? त्यामुळे केवळ दिखाऊपणापेक्षा शासनकर्ते वास्तवाला धरून राहिल्यास बर्‍याच समस्या सुटतील, हेच येथे सांगणे आहे.


Multi Language |Offline reading | PDF