पूर्वीच्या लढाया आणि स्मारके यांचा सैनिकी दृष्टीने अभ्यास करा ! – विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक

पुणे, १८ मार्च (वार्ता.) – ‘धूर्त युद्धतंत्र’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य होते. विश्‍वभरातील इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युद्धतंत्राला गौरवले आहे. भारतामध्ये लक्षावधींच्या संख्येने स्मारके आहेत. निवृत्त सैनिकी अधिकार्‍यांनी या लढाया अन् स्मारके यांचा सैनिकी दृष्टीने अभ्यास करावा आणि तंत्रकुशल युवकांची साथ घेऊन तो समाजापुढे मांडावा, असे प्रतिपादन विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक यांनी केले. १७ मार्च या दिवशी भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये ‘सिंहगडाची शौर्यगाथा’ या संदर्भाने त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. श्री. शशिकांत ओक यांनी ‘सिंहगडावर तानाजी मालुसरे आणि मावळे यांनी केलेली लढाई सैनिकी दृष्टीने कशी लढली असावी’, ‘त्या वेळी कुठल्या युद्धतंत्राचा वापर करण्यात आला’ आदी माहिती ‘पॉवरपाईंट प्रेझेंटेशन’च्या आधारे  सांगितली.

‘युद्धामध्ये शत्रूचा चेहरा माहीत असणे आणि त्याला ओळखता येणे आवश्यक असते. तानाजी मालुसरे यांना कोंढाण्याचा तत्कालीन किल्लेदार उदयभान राठोड कसा दिसतो, हे ठाऊक होते. तसेच कोंढाण्याचीही संपूर्ण माहिती होती. त्यामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांची या मोहिमेसाठी निवड केली’, असे श्री. ओक यांनी सांगितले.

तानाजी मालुसरे आणि मावळे यांनी या स्वारीसाठी कोणकोणती सिद्धता केली असावी, छत्रपती शिवाजी महाराजांनी याची आखणी कशी केली असावी आदी विस्तृत माहिती त्यांनी दिली. पॉवरपाईंटच्या आधारे केलेले वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीच्या बारकाव्यांवर प्रकाश टाकणारे आणि प्रेरणादायी ठरले. या वेळी ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्री. पांडुरंग बलकवडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.


Multi Language |Offline reading | PDF