स्वच्छता आणि संस्कार !

‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’ अशी वृत्ती असली की, पुढच्या काळात कशी वेळ येते, याचे उदाहरण पुणे महापालिकेच्या एका निर्णयाने पहायला मिळत आहे. ब्रिटनमधील बर्मिंगहॅम महापालिकेच्या सहकार्याने पुणे महापालिकेने ‘न्यूट्रीशियस फूड’ संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत साडे पाच सहस्र पथारी व्यावसायिकांचे समुपदेशन करण्याची आणि खाद्यपदार्थ बनवणार्‍या आचार्‍यांची आरोग्य पडताळणी करण्याची योजना आहे. खवय्यांचे शहर म्हणून पुणे शहराचा लौकिक आहे. शहरामध्ये शिक्षण आणि नोकरी यांच्या निमित्ताने येणार्‍यांची संख्याही लक्षणीय असल्याने शहराच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात गेलो, तरी किमान वडापावची एक गाडी तरी असतेच असते. या व्यवसायामध्ये असलेला आर्थिक लाभ लक्षात घेऊन अनेक उच्चशिक्षित युवकही यामध्ये उतरले आहे; पण या खाद्यसंस्कृतीला स्वयंपाकाची आणि खाण्याची जागा अस्वच्छ ठेवणार्‍यांचे अन् जिभेचे चोचले पुरवण्याच्या आहारी गेलेल्यांचे ग्रहण लागले आहे. त्यावर उपाययोजना काढणे आवश्यकच होते; पण त्यासाठी आपल्याकडील संकल्पना, सवयी, शास्त्र यांचा आधार न घेता थेट बर्मिंगहॅम महापालिकेपुढे हात पसरणे म्हणजे अब्जावधी संपत्तीचा मालक असलेल्याने जाणिवेच्या अभावी १०० रुपयांसाठी इतरांकडे हात पसरण्यासाखे आहे.

वास्तविक भारतियांएवढी शास्त्रशुद्ध, आरोग्यदायी आणि निसर्गपूरक खाद्यसंस्कृतीची देणगी अन्य कुणालाही नाही. अन्न कसे बनवावे ?, कधी आणि कोणी बनवू नये ?, कसे साठवावे ?, कसे ग्रहण करावे ?, याचे काही नियम हिंदु धर्माने सांगितले आहेत; त्याचा विसर पडल्याने आज विदेशी लोकांकडून स्वच्छतेचे धडे गिरवावे लागत आहेत. पूर्वीच्या काळी सोवळ्यामध्ये स्वयंपाक केला जात असे. आजही धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने का होईना, ती प्रथा काही ठिकाणी चालू आहे. केवळ स्वच्छता नाही, तर त्याही पुढे जाऊन हिंदु धर्माने पावित्र्याचा विचार केला आहे. भोजन हे हिंदु धर्मामध्ये यज्ञकर्मासमान असल्याचे सांगितले आहे. अन्न ग्रहण करण्यापूर्वी प्रार्थना करणे, झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे, ताटामध्ये अन्न न टाकणे, अन्नाला नावे न ठेवता ते प्रसाद म्हणून ग्रहण करणे, अशा कितीतरी गोष्टी हिंदु धर्मातील संस्कारांमध्ये आहेत. विदेशी महापालिकेसह करार करून लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा याच प्रकल्पांतर्गत किमान काही संस्कारांविषयी व्यावसायिकांसह नागरिकांमध्येही जागृती केली असती, तर ती अधिक फलदायी ठरली असती. खाद्यसंस्कृतीचा अमूल्य ठेवा आपल्याकडे असतांनाही त्याचे जतन आणि संवर्धन करण्याची बुद्धी बहुतेकांना होत नाही. कारण ‘जसे अन्न खाल्ले जाते, तशी बुद्धी होते’, या अर्थाचे संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF